घटमुठ बाई – श्वेतल अनिल परब

घटमुठ बाई – श्वेतल अनिल परब

साक्षी झपाट्याने पावलं टाकत रेल्वे फाटकांजवळ पोहोचली. तिला पांच मिनिटांत रेल्वे पकडायची होती. फाटकाच्या दरवाजाजवळ नेहमीपेक्षा खूपच गर्दी असल्याने तिला गर्दीतून वाट काढत जाणं मुश्किल झालं. त्यात तो अचानक उद्भवलेला प्रसंग! तसे प्रसंग तर वारंवार तिच्या वाट्याला येतात. आपणच ह्या भोवऱ्यात का अडकतो, दुसऱ्या कुणाला माझ्यासारख्या अडचणी का येत नाहीत? असं तिला राहून राहून वाटतं.

अडचणी संकटं आणि प्रसंगं यावरून मला माझी आजी आठवली. ती आपल्या जावा आणि सुनांना घेऊन डोंगरात लाकडं आणायला जात असे. तेव्हा गावात गोबरगॅस किंवा सीलिंडर वापरात नव्हते. जंगलातून किंवा बागेतून गोळा केलेल्या लाकडांवर चुली पेटत असंत. बहुधा ती लाकडं गोळा करून आणण्याचं काम बायकाच करत असंत.

डोंगरात गेल्यावर जंगली प्राण्यांची भीती असते म्हणून सर्वात पुढे आजी चालत असे. तिच्या हातात भली मोठी काठी आणि कमरेला कोयता अडकवलेला असे. तिच्या पाठोपाठ बाकी सगळ्या कमरेवर हात घेऊन चालत. मी गंमत म्हणून सुट्टीच्या दिवशी त्यांच्यासोबत जात असे. माझे पाय दुखले म्हटलं की आजी म्हणायची, “बाईच्या जाती न कसा घटमुठ होया, बापयाच्या दुप्पट तिका काम करुचा लागता. कुणब्याकुळवाड्या बाईक असा मेसी रवान चलना नाय.” डोंगर माथ्यावर जाईपर्यंत आजीचा उपदेश सुरूच रहात असे. कुणीतरी एखादी सूनबाय वाटेतच खाली बसली तर, आजी खेकसत असे. “गो तुका दुकना इला ता हय खय बसलं. आता वायच चल आणि वर जावन बस.” चढण चढताना आजी कमरेला लावलेला कोयता काढून वाटेवरचं गवत साफ करत पुढे जात असे. जणू काय सगळ्यांना पायवाट मोकळी करून देण्याची जबाबदारी तिचीच असे.

घटमुठ बाई - श्वेतल अनिल परब
घटमुठ बाई – श्वेतल अनिल परब

एकदा तिच्या पाठीमागून अचानक वाघ आला , आणि त्यांची डरकाळी ऐकून आजी सावध झाली, हा आता आपल्यावर उडी मारील म्हणून, तिने हातातला कोयता त्यांच्यावर भिरकावला. कोयता त्याच्या पायला लागला. जखमी वाघ डरकाळ्या फोडत जंगलात नाहीसा झाला. थोड्यावेळाने तिच्या पाठीमागून येणाऱ्या सुनांनी तो कोयता उचलून आजीकडे आणून दिला. त्या कोयत्याला ताज्या रक्ताचा डाग होता. तो बघून तिची मधली सून म्हणजे माझी काकी चक्कर येऊन पडली. आजी मात्र न घाबरता झऱ्याचं पाणी घेऊन आली. त्या दिवशी आजीने नेहमीपेक्षा जास्त लाकडं गोळा केली.

आजी आपल्या अनुभवांची शिदोरी सोडताना एक दमदार संघर्ष कथा पुन्हा पुन्हा सांगत असे. तिनं एकदा गावच्या खोताला चांगलाच हिसका दाखवला. आजी आणि आमच्या घरातल्या बायका नेहमीप्रमणे जंगलात लाकडं गोळा करण्यासाठी गेल्या होत्या.  त्या दिवशी तो खोत आपली माणसं घेऊन झाडं बेनायला गेला होता. त्या खोताने ह्या सगळ्या बायकांना बघितलं. गुडघ्यापर्यंत साड्या खोचून कमरेला साडीचा वेढा बांधून बायका डोंगरात लाकडं शोधत फिरत होत्या. त्या खोताची नजर त्या बायकांवर पडली. “तुमची म्होरकी कोण?”  असं त्याने आजीच्या धाकट्या जावेला विचारलं. दहा फुट दूर उभ्या असलेल्या आजीकडे तिने बोट दाखवले. खोत जाड चामद्याच्या चपलांचा करमकुर असा आवाज करत आजीच्या दिशेने चालत गेला. आजी झाडांवरची लाकडं गळ घेऊन ओढत होती. खोतानं आजीच्या कमरेला लावलेल्या पानाच्या बटव्याला हात लावला आणि म्हणाला, “ गावकारनी माका याक पान करून दी.”  आजीने त्याची नजर ओळखली आणि त्याला धारदार कोयता मानेवर कसा फिरेल हे दाखवलं. नुसत्या प्रात्यक्षिकाने तो घाबरला. आजीकडे गयावया करू लागला, “गावात कोणाक ह्या सांगा नको, माझी अब्रू जायत.” आजी म्हणाली, “अब्रू आसली तर जातली.” खोत धोतर हातात धरून झपाझप डोंगर उतरून गेला. आजीला हायसं वाटलं. पुन्हा कधीच तो बायकांच्या वाट्याला गेला नाही.बाई गावठाण्यात राहणारी असो की शहरातली तिला सिक्सथ सेन्स असतो असे म्हणतात, तो हा असा. (घटमुठ बाई)

साक्षी रेल्वेफाटकाडे आल्यावर दोघाचौघांनी तिला अडवलं, कारण एकंच होतं, तिने त्या मिटिंगला हजर राहू नये. ती एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करत  होती. त्या संस्थेमार्फत स्त्रियांना न्याय मिळवून दिला जात असे. प्रत्यक्षात ती स्वत: घटस्फोटीता होती. काहीही कारण नसताना लग्न झाल्यावर नवरा तिला मारझोड करत असे. तिची सासू तोंडातून ब्र देखील काढत नसे. धडधाकट असलेली साक्षी माडाचा कवाथा उभ्या उभ्या सुकून जावा तशी सुकून गेली. शेवटी काडीमोड केल्याशिवाय पर्याय नाही, हे तिच्या बापाने ओळखले. पदवीधर असलेली आपली मुलगी कोणतंही काम जिद्दीने करेल हे त्याला माहीत होते. समाजाच्या रोषाची पर्वा न करता त्याने तिला माहेरी आणलं. तेव्हापासून तिने त्या संस्थेत काम करायला सुरुवात केली. ती स्त्रियांसाठी काम करते म्हणून गावातले काही विघ्नसंतोषी लोक तिची टवाळकी करत, तिच्याबद्दल अश्लील बोलत. त्यांच्याकडे कानाडोळा करत ती काम करत राहिली. एकदा तर तिच्यावर मारेकरी घालण्यात आला. सुदैवाने त्यावेळी गावातल्या बायकांना ही बातमी कळली. त्यांनी पोलिसांना बोलावून ते प्रकरण धसास लावले. तेव्हापासून पुढे गावात तिला कुणी त्रास दिला नाही.

तिला रेल्वे फाटकाकडे अडवणारे ते धनदांडगे शेजारच्या गावातील होते. त्या गावातील बाई अचानक गायब झाली होती. तिचा शोध घेण्याचे काम ती संस्था करत होती. साक्षी त्या प्रकरणात अधिकच लक्ष घालते, हे त्या लोकांना कुणीतरी सांगितलं असावं. गर्दीतून वाट काढणाऱ्या साक्षीला त्या गुंडांनी पुढे जाऊ न देता वाट अडवत अडवत बाजूला नेलं. बाजूच्या चिंचोळया रस्त्यावर  गाडी  होती. त्यात तिला घालून नेण्याचा त्यांचा डाव होता, तेवढ्यात साक्षीनं आपल्या जवळच्या पर्समधील मिर्चीपूड हळूच बाहेर काढली.  छाती पुढे काढून अंगावर येणाऱ्या त्या गुंडांच्या डोळ्यांवर मारताच ते पळून गेले.

जुन्या काळातली माझी आजी आणि आजची उच्चशिक्षित साक्षी यांच्यात फरक फक्त शिक्षणाचा. गावपातळीवर राहाणाऱ्या, स्वत:ची इज्जत राखून असणाऱ्या या बायकांना स्वत:बरोबर इतर स्त्रियांच्या इज्जतीलाही हात लावू देत नाहीत. ‘स्त्री स्त्रीची शत्रू आहे’, असे म्हणणाऱ्यांनी गावखेड्यात राहाणाऱ्या या स्त्रियांची एकी बघावी. अत्यंत काबाडकष्ट करणाऱ्या, शेती आणि जंगल प्रदेशात काम करणाऱ्या या बायका आपलं स्त्रीत्व अबाधित ठेवतात. त्यांच्यावर नजर वर करून बघण्याची हिम्मत करणाऱ्याला जमीनदोस्त करतात. त्यांच्याकडे शिक्षण असलं तर असतं. पण स्वसंरक्षणाचे धडे त्यांच्या आईने त्यांना बाळपणीच दिलेले असतात. स्वयंपाक घरातील मिर्चीपूड आणि विळी कोयते हीच त्यांची स्वसंरक्षणाची हत्यारं. या ग्रामीण बायकांपासून शहरी आणि आधुनिक स्त्रिया जेव्हा धडा घेतील तेव्हा स्त्रिया गायब होण्याचं प्रमाण नक्की कमी होईल. कोर्टकचेऱ्या आणि कायदेकानून यांची गरज भासावी अशी वेळ स्त्रियांवर येणार नाही.

आपल्या मुलीच्या दफ्तरात रोजच्या रोज पाण्याच्या बाटलीबरोबर मिरची पूड घालायला न विसरणारी गावखेड्यातील आई सामाजिक सुरक्षततेमध्ये घरी राहून का होईना खारीचा वाटा उचलते. हेही नसे थोडके.   (घटमुठ बाई)

श्वेतल अनिल परब
सावंतवाडी
9423301892

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *