कृतज्ञ मी, कृतार्थ मी – बळवंत मगदूम

कृतज्ञ मी, कृतार्थ मी

        साडेपाच फूट ऊंची, सडपातळ प्रकृती अन चेहऱ्यावरील हास्य, हास्यात भर घालणारी  काळीकरंद दाढी. जोडीला कमालीची स्मरणशक्ती आणि डोळ्यात बुद्धाची करुणा.  भोळ्या सांबाचा राग आणि पंढरीच्या विठ्ठलाचा सहिष्णूभाव हे दोन्ही त्याच्या प्रकृतीचे स्थायीभाव. पण दाढी आणि कुश देह हीच त्याच्या व्यक्तिमत्त्वाची संस्था आणि इतरत्र ओळख. संस्थेतील अनेकांचे दादा तर अनेकांसाठी ते दाढी दादा होते.  समतेचे पाईकत्व, अखंड उत्साह, कमालीच्या संयम, ध्येयावरील अढळ निष्ठा अशा अनेक संज्ञेने ज्यांचे व्यक्तिमत्त्व अधोरेखित करावे अशी व्यक्ती म्हणजे कला,  विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा, जि. पालघर. चे प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव सर. जवळपास ४२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहे. त्यांच्या कार्याला हा आढावा.

कृतज्ञ मी, कृतार्थ मी - बळवंत मगदूम
कृतज्ञ मी, कृतार्थ मी – बळवंत मगदूम                      (प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव)

     माण नदीकाठी बसलेल्या सिद्धेवाडी, ता. पंढरपूर येथील एका शेतकरी कुटुंबात जन्म.  वडील विठ्ठल भक्त. परिसरात बुवा नावाने परिचित. घरचे सर्व नाना म्हणत. त्यांचे शिक्षण इ. पहिली पर्यंतचे. नाना कमालीचे कष्टाळू आणि स्वाभिमानी. वडिलांची ही स्वाभिमानी वृत्ती लहानग्या जनार्धनमध्ये रुजलेली. मोठे कुटुंब, घरची गरिबी ८ भावंडे, १५ एकर कोरडवाहू शेती अन दुष्काळ पाचवीला पुजलेला. अशा अवस्थेत आपण शिकावं  व कुटुंबाच्या पाचवीला पुजलेले दारिद्र्य नष्ट करावं वाटलं. असे त्यांना वाटले. गावी सातवीपर्यंतचे शिक्षण झालेले. पुढील शिक्षणाचा प्रश्न होताच. त्याच गावीही हायस्कूल निघाले होते. पण त्यावर्षी कसोटी पाहणारा १९७३ चा दुष्काळ होतो. १९६९ ते १९७२ अशी चार वर्षे एकूण महाराष्ट्रात पाऊसमान कमी झालं. आधीची चार वर्षे पाऊसमान कमी आणि आणि त्यात कसोटी पाहणारा दुष्काळ १९७३ चा दुष्काळ.  ह्या दुष्काळात जे. जी. सारे कुटुंब अन्नाच्या शोधात खदाळी (ता. माळशिरज) येथे आपल्या मावशीच्या गावी आले.

येथे आल्यावर जे. जी. ची दुष्काळाशी दोन हात करत शिक्षणाची धडपड सुरू राहिली. जे. जी. च्या मोठ्या भावाने त्याच्या  शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले.  सारे पर्याय तपासून वाखरीला मामाच्या गावी ठेवण्यात आले. वाखरीला मामाच्या गावी राहून नव्याने गादेगाव सुरू झालेल्या रयतच्या हायस्कूलमध्ये आठवीचे शिक्षण ते ही वाखरी ते गादेगाव हा साडेसात कि.मी. चा पायी प्रवास करून पूर्ण केले. पुढे ९ ते ११वी पर्यंतचे शिक्षण वेळापूर येथे.  हे ही शिक्षण ६ कि.मी. पायी प्रवास करून पूर्ण केले. पुढे अकलूजला पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षांला शिकायला गेल्यावर ह्या काळात एक अपघातग्रस्त सायकल त्यांच्या मदतीला मिळाली. जी अर्धी अधिक नादुरुस्त असे, त्यावरून प्रवास करीत पदवीची दोन वर्ष पूर्ण केली. दुष्काळी वातावरण निवळले. हळूहळू कुटुंब वाखारीहून पुन्हा सिद्धेवाडीला आले. वडिलांनी गावी विहीर काढली, बैल जोडी घेतली. थोडी बागायती सुरू केली.  ते पदवीचे तिसरे वर्ष. त्यावर्षी पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय प्रवेश घेतला. अर्थशास्त्र विषयात प्रथम क्रमांक मिळविला. आता पुढे काय ? हा प्रश्न पुन्हा उभा राहिला. पदव्युत्तर शिक्षण घेवून प्राध्यापक होण्याचं स्वप्न उराशी होतं. आपण शिवाजी विद्यापीठाच्या कमवा आणि शिका योजनेत प्रवेश घेवून शिक्षण करावे वाटले. यापूर्वी अकलूज येथे पदवीच्या पहिल्या दुसऱ्या वर्षाला शिक्षक असताना मधुकर केचे ह्या भूगोलाचे प्राध्यापक जे. जी. च्या मनात रुजविले पदव्युत्तर शिक्षणाचा विचार रुजविले होतेच. पण  विद्यापीठाची कमवा आणि शिका योजनेत काम करून तुला शिकता येईल हा आत्मविश्वासही दिला होता.  एनसीसी कॅपच्या निमित्ताने पाहिलेला विद्यापीठाचा परिसर पहिल्यामुळे आपण  पदव्युत्तर शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठात जायचं हा निग्रह केला. त्याकरिता १९७७ च्या उन्हाळ्यात  कामाला जाऊन १५० रुपये जमविले व जून १९७७ रोजी विद्यापीठात एम. ए. च्या प्रवेशासाठी वाटचाल केली. सोबत केवळ कपडे वाहण्यासाठी पंढरपूरच्या बाजारातून जुन्या कपड्याची कोंबडा छाप पिशवी,  व घरात जळण वाहण्यासाठी वापरलेला कच्च्या सुताचा सुतडा. जो झोपण्यासाठी म्हणून सोबत घेतलेला. अशा दोन वस्तूवर पंढरपूर ते कोल्हापूर रेल्वे प्रवास. कोल्हापूरला पोहचल्यावर पायी पायी विद्यापीठाचे आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन. येथे  गुणवत्ता असणाऱ्या, गरीब मुलांना प्रवेश मिळतो इतकीच केचे सरांनी माहिती. ह्या माहितीवर  भवनच्या २९ नंबरच्या खोलीत आसरा मिळविला. पुढे गुणवत्तेवर भवनला प्रवेश मिळाला.

भवनला प्रवेश मिळेपर्यंत २९ नंबर खोलीचा आसरा अन सोबत आणलेल्या दीडशे रुपयात केवळ रात्रीचे एक वेळचे जेवण.  प्रारंभी शेतीत काम व शेतीतील कामाचे सहा महिने निरीक्षण करून मग मॉनिटर म्हणून नेमणूक होई. जे. जी. चे  प्रामाणिक काम पाहून सहा महिन्यानंतर त्यांना मॉनिटर बनविले गेले.  विद्यापीठाच्या हायवे कॅटिंगचे प्रमुखपद दिले . त्या काळात त्यांनी हायवे कॅटिंगला अतिउच्च नफा मिळवून दिला.  तत्कालीन कुलसचिव उषा इथापे यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला. १९७७ ते ७९ असे पदवीव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. पण निकाल हाती नाही . प्राध्यापकांच्या संपामुळे एम. ए. च्या शेवटच्या वर्षांचे निकाल लांबले. दरम्यान चिपळूण येथे कनिष्ठ महाविद्यालयाची जाहिरात पाहून मुलाखतीला गेले.   सिलेक्शन झाले ऑर्डर ही निघाली. खरतर जे. जी. ना नोकरीही रयत  किंवा स्वामी मध्येच करायची होती.  पण पहिल्याच घासाला खडा नको म्हणून त्यांनी ही नोकरी स्वीकारली. दरम्यान रयत कडून नोकरीचा कॉल आला. पुढे चिपळूणची अवघ्या तीन महिन्याची नोकरी सोडून १ सप्टेंबर १९७९ रोजी जो रयत शिक्षण संस्थेत रुजू झाले. प्रारंभीचे एक वर्ष  कर्जत येथील महाविद्यालयात कनिष्ठ विभागाकडे ज्यु. टीचर म्हणून नोकरी. पुढे प्रमोट होऊन बदलीने संस्थेच्या पनवेल महाविद्यालयात ११ ऑगस्ट १९८० पासून अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू.  पनवेल आणि वाशी महाविद्यालयात जवळपास वीस वर्षाची सेवा बजावल्यानंतर आदरणीय एन. डी. पाटील साहेबांनी चेअरमन असताना रायगड निधीच्या निमित्ताने  जे. जी. चे काम हेरले आणि त्यांना मोखाडा येथे प्राचार्य पदाची संधी दिली. खरतर ते या काळात अभ्यास रजेवर मुबई विद्यापीठात पीएच. डीचे संशोधन करीत होते. एकीकडे सेवेला १० वर्ष पूर्ण व्हायची बाकी असतानाच पहिल्यांदा प्राचार्य पदाची संधी आली होती.  आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांनीही त्यांच्या महाविद्यालयातही प्राचार्य होण्याची विनंती केली होती. पण रयत च्या प्रेमापोटी त्यांनी नम्रतेने प्राचार्य होण्यास  नकार दिला.  यावेळीही प्राचार्य व्हावं की न व्हावं ही द्विधा मनस्थिती. मित्रवर्य थोराताची जे. जी. नी मोखाड्यात प्राचार्य व्हावं. ही इच्छा. शेवटी पीएच. डीचे संशोधन बाजूला सारून प्राचार्य होणे पसंद केले. यापूर्वी आपण प्राध्यापक म्हणून रयतची सेवा करीत आलोच आहोत प्राचार्य झाल्यावर आणखी सेवा करता येईल हा त्यांचा मानस.

मोखाडा ही रयत शिक्षण संस्थेची सर्वात दुर्गम शाखा. संपूर्ण आदिवासी बांधवाचा प्रदेश, मुबलक पाऊसमान असणारा प्रदेश.  लहानपणापासून गांधीवादी विचारांचे संस्कार अन तळागाळातील लोकांच्यासाठी काम करायचे असे ओरीन्टेशन असल्याने जे. जी . मोठ्या आनंदाने ही मोखाड्याचे प्राचार्यपदाची जबाबदारी केवळ स्वीकारली नाही तर प्राचार्य म्हणून आश्रमशाळा विभागाचे प्रकल्प प्रमुख म्हणून पुढील काही प्राचार्यांच्या, प्रकल्प प्रमुखांच्या पिढ्या आदर्श घेतील असे काम उभे केले. मोखाडा येथे प्राचार्य म्हणून संधी मिळाल्यानंतर आपल्याला साक्षात परमेश्वराची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे समाधान त्यांना झाले. प्रारंभी केवळ प्राचार्य होते. पण इथला लोकांच्या मनात आश्रमशाळेच्या कारभाराविषयी असणारा असंतोष पाहून त्यांनी २ मे २००२ साली आश्रम शाळेचे प्रकल्पप्रमुखपद मागून घेतले.

जे. जी. केवळ स्वप्न पाहणारे प्रशासक नव्हते तर ते स्वप्न साकार करण्यासाठी स्वप्नाच्या दिशेने एक एक पाऊल टाकणारे होते. कच्च्या इमारतीत होणारी आश्रमीय विद्यार्थ्यांची आबाळ त्यांनी पाहावली नाही. जीवघेण्या पावसात शिक्षणासाठी येणारी ही मुलं पाहून त्यांना या विद्यार्थ्यांच्या पक्क्या इमारती उभ्या राहाव्या वाटल्या. त्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे तात्कालीन चेअरमन मा. एन. डी. पाटील यांना सर्व परिस्थितीची कल्पना देवून आश्रमशाळेचा दौरा करण्याची विनंती केली. एन. डी. सर  व माईनी ही विनंती मान्य करून आपल्या  लग्नाच्या वाढदिवसाचा दिवस ह्या दौरासाठी राखीव  ठेवला व ४४ व्या वाढदिवसीदिनी आश्रमशाळेचा दौरा केला.  यादौऱ्याचे  फलित असे की, साडेसहा कोटीच्या मोखाडा, आसे, आडोशी, चांभारशेत, वावर, खरशेत, पिंपळदरी व नर्मदानगर येथील पक्क्या इमारती उभ्या राहिल्या.

एका दौऱ्यात एन. डी. सरांनी लोक मोखाड्याला का मुक्कामी राहत नाहीत ? असा प्रश्न विचारल्यावर इथे राहण्याची सोय नाही. असे जाधव सरांनी नम्र उत्तर दिले यातून मा. एन. डी. पाटील सरांनी रयत बँकेच्या चॅरिअटी फंडातून २० लाख रुपये उपलब्ध केले व त्यातून सेवक निवास उभा राहिले. सेवक सहकुटुंब राहू लागले परिणामी मोखाडा महाविद्यालयाचे काम उत्तम पद्धतीने चालू लागले. मोखाड्यात मुबलक पाऊस पडून नोव्हेंबरनंतर पिण्याच्या पाण्याची वनवन सुरू व्हायची. महाविद्यालयात तर प्यायलाही पाणी नव्हते.  गावाकडे पाण्याची मागणी केली तर गावकरी पाणी देईनात. मोगी विहिरीवरून दोन हांडे पाणी आणले जाईल आणि त्यामध्ये दिवस काढला जाई. महाविद्यालयाचा विकास व्हायचा असेल तर पाणी पाहिजे म्हणून सेवक निवासाचे बांधकाम सुरू असतानाच २००४ साली दीड लाख रुपये खर्चून विहीर खोदली पाईपलाईन केली.  त्यापाण्यातून उघड्या माळावर महाविद्यालयाच्या भोवतीने काजू, आंबा, जांभळाच्या झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन केले. आजही मोखाड्याच्या बसस्थानकावरून पूर्वेच्या वतावड्या डोंगराकडे नजर टाकली तर ही महाविद्यालयाच्या टेकडीवरील हिरवाई नजरेत भरते. सध्या मोखाडा येथे सुरू असलेले तीन कोटी रूपयाच्या महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे बांधकाम अशी अनेक पायाभूत कामे उभी राहिली.

जे. जी. जाधव सरांना मातृसंस्थेविषयीच्या दायित्वाचा कधीही विसर पडला नाही, रायगड निधीसाठी जव्हार , मोखाडा हे तालुके पालथे घातले.  पाच वर्षांत सेवक व आणि गावकऱ्यांच्या मदतीने दहा लाख देणगी गोळा करून रायगड निधीस दिली. याकाळात देणगी गोळा करण्यासाठी केलेल्या प्रवासासाठी इथला गोरगरिबांनी संस्थेच्या निष्ठेपायी दिलेल्या रक्कमेतील छदामही खर्च केला नाही.

सरांचे व्यक्तिमत्त्व कमालीचे विज्ञानवादी. स्मशानभूमीशेजारी सेवक निवासाच्या बांधणीनंतर कुणी सेवक येथे मुक्कामी राहायला धजेना म्हणून जाधव सर स्वत:  कुटुंबासह येथे येवू राहिले. पुढे सेवकही येथे येवून राहू लागले.  त्यांचा, आपल्या श्रद्धा ह्या आपल्या घरापुरत्या सीमित ठेवाव्यात. हा कटाक्ष असे.  जेव्हा आपण समाजात वावरतो तेव्हा समाज तुमच्याकडून सतत शिकत असतो. त्यामुळे सार्वजनिक आयुष्यात आपण संताना जी समता अपेक्षित होती,  कर्मवीरांनी आयुष्यभर ज्या भूमिका घेवून जगले आपण त्याच प्रमाण मानून जगायला हवं. असे ते मानत.  विज्ञानवाद स्वत:त अगोदर बिंबवून घ्यायला हवा तरच तो तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यात रुजवू शकला. असेही त्यांना वाटे. मोखाडाही दुर्गम शाखा. संस्थेचे शिक्षेचे ठिकाण अशी सेवकांची मनोभूमिका. त्यामुळे सेवकात असंतोष असायचा. ह्या मनोस्थितीतील सेवक जेव्हा त्यांच्याकडे जेव्हा आपल्या अडचणी घेऊन आला त्यावेळी वडीलकीच्या नात्याने त्यांच्या अडचणी सोडविण्याला प्राध्यान्य दिले. आपल्या सचिवपदाच्या कालखंडात, बदली कमिटीचे चेअरमन काम करताना भरती प्रक्रियेपासून बदली प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांच्या सचिवपदाचा कालखंड हा आजही सर्व सेवकांना न्यायी कालखंड वाटतो.

समाजकारण, राजकारण, अर्थकारण या बरोबर वर्तमानाविषयी त्यांची खास मते होते. भांडवलशाहीपेक्षा समाजवाद त्यांना अधिक प्रिय होतो. याच्या जोडीला निष्कलंक चारित्र्या ते सतत आग्रह धरत. इतकेच नव्हे आपल्या सेवक आणि विद्यार्थ्याचे वर्तन सत्याला आणि नैतिकतेला धरून असावे याकरिता आग्रह धरणारे, चुकता माणूस ही सारी आपलीच माणसं हे समजून त्यांना त्यांच्या चुका सुधारण्याच्या संधी देणारे अन माणूस बदलतो असा कमालीचा आशावाद ठेवणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व. प्रशासनातील काही व्यक्ती ह्या अत्यंत हलक्या कानाचे पण जाधव साहेब याला अपवाद. वकील बाण्याने समस्येच्या मुळाशी जाणारे, न्याय भूमिका घेवून न्याय सुनावणारे होते. ब्रुस्लीच्या मताप्रमाणे be like water जिथे जाय तिथले व्हा. हीच त्यांची सर्व सेवकांना शिकवण. आपल्याला काम तर करायचं आहे आणि आनंदीही राहायचं आहे. ह्याकरिता काम करीत राहाणच महत्त्वाचं आहे. आपण करीत असलेले काम आपणाला हवा असलेला आनंद सहजगत्या मिळवून देईल. असं जगण्याचा सहज सोप्पं तत्त्वज्ञान ते अनेक उदृक्त करत.

      १ सप्टेबर १९७९ ते ३१ मे २०२१ अशी  ज्यु टीचर, प्राध्यापक ते प्राचार्य ४२ वर्षाची त्यापैकी ९ मार्च २००१ ते १५ नोव्हेबर २००६ व २८ नोव्हेबर २०१८ ते ३१ मे २०२१  अशी जवळपास ९ वर्ष २ महिने सेवा संस्थेच्या  मोखाडा ह्या दुर्गम शाखेतील अशी दीर्घ सेवा करून प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव सर निवृत्त होत आहेत.  वंचितांच्या सेवेचे कर्मवीरांनी पाहिलेले स्वप्न  या स्वप्नाला मला हातभार लावायला मिळाला याचा आनंद आहे. कर्मवीरांचे हे काम थोडे पुढे न्येता आले. अडचणी होत्या पण दिवस छान गेले. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चांगले सेवक भेटले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही इतकी पदे, सन्मान माझ्या वाट्याला आला.या पदांचा मी कधी गर्व केला नाही उलट माझ्या निवृत्तीनंतर मला संस्थेची सेवा करण्याची संधी मिळाली  तर आनंदच आहे. असे त्यांचे कृतज्ञ अन कृतार्थ व्यक्तिमत्त्व.

बळवंत मगदूम
श्री. रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालय, सावळज,
 ता. तासगाव, जि. सांगली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *