युगे होऊ दे बहोत सुफळ ! – श्वेतल अनिल परब

युगे होऊ दे बहोत सुफळ ! – श्वेतल अनिल परब

कॉलेजमध्ये संदेशवाहक अशी  भित्तीपत्रक बनवण्याची स्पर्धा ठेवली होती. वर्गवार त्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ठरल्यादिवशी काही विदयार्थ्यांनी आपली भित्तीपत्रके सादर केली. पहिल्या तीन क्रमांकांना कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात गौरविण्यात येणार होते. परीक्षक म्हणून काम पाहत असलेले  माझे सहकारी मला म्हणाले, “विदयार्थ्यांनी सगळी पोस्टर्स नेटवरून जशास तशी  घेतली आहेत. त्यामध्ये त्यांची स्वत:ची कल्पकता  दिसून येत नाही. त्यामुळे नंबर देणं कठीण आहे”. तेव्हा दुसरे सहकारी शिक्षक म्हणाले, “आजकाल स्वत:चं असं कुणाचं काय असतं? सगळीकडे कॉपी पेस्ट हाच प्रकार सुरु असतो. आपल्याकडे उपलब्ध ज्ञान आणि कला काय कमी आहेत?”  मला प्रश्न पडला ज्ञानसंपादन ही प्रक्रिया इतकी सोपी आहे का?

एकेकाळी ज्ञान मिळवणं हा अभिजन वर्गाचा हक्क मानला जायचा. काळ बदलला आणि ज्ञानार्जानाचा लाभ सगळ्या स्त्रीपुरुषांना मिळू लागला. उशिरा का होईना दलित  आणि स्त्रिया यांनाही शिक्षण आणि व्यवसायात समान संधी मिळू लागल्या. सुरुवातीला निसर्ग आणि निसर्ग नियमावर आधारित ज्ञानाला आध्यात्मिक ज्ञानाची जोड दिली गेली. त्यानंतर विज्ञान आणि वास्तवदर्शन म्हणजे ज्ञान असे आपण समजू लागलो. प्राचीन ऋषीमहर्षींनी विविध ग्रंथनिर्मिती केली. माणसाने माणसाशी कसे वागावे, याविषयी नीती शास्त्रे, वेद आणि पुराणे लिहिली गेली. त्याचा अभ्यास व चिकित्सा करणारी मंडळी पाठोपाठ आली.

मधल्याकाळात अभिजनानंतर बहुजनवर्गाला शिकण्याची संधी मिळाली. ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले. त्यांच्या अनुभवानुसार आणि त्यांच्या जीवनपद्धतीनुसार त्यांनी पूर्वी लिहून ठेवलेल्या ग्रंथांचा आपल्याला हवा तसा अर्थ काढून चिकित्सा केली. ज्ञानाची आस वाढू लागली. पुस्तके, ग्रंथ, पुस्तक संग्रहालये यांची संख्या वाढू लागली.  परकीय भाषांमधून ज्ञान मिळवण्याची सोय निर्माण झाली. भारतीय ग्रंथ आणि साहित्य याचा परदेशी ग्रंथ आणि साहित्य याच्याशी तुलनात्मक अभ्यास सुरु झाला. माणसाच्या विचारप्रक्रियेत गुंतागुंत होत गेली. सत्याचा ठाव घेण्याची आस निर्माण झाली. माणसांच्या सोयीसाठी  किंवा जगणं सुरळीत होण्यासाठी  विविध शोध  लावण्यात आले. कारखान्यातून यंत्रांचा वापर होऊ लागला आणि उत्पादने वाढली. पण माणूस ज्ञानी झाला का हा प्रश्न उरला आहे. पूर्वीच्या लोकांनी शोध लावताना निसर्गाचा  समाजशास्त्रीय अंगाने अभ्यास केला आणि माणसांना जगण्यासाठी अनुकूल असे शोध लावले. त्याचकाळात आरोग्यचिकित्साशास्त्र, योगविज्ञानशास्त्र, आयुर्वेदशास्त्र मानववंशशास्त्र, मानसशास्त्र आणि इतर सामाजिक शास्त्रे यांची निर्मिती केली. कलाक्षेत्रामध्ये अभिजात संगीत नाट्य, नृत्यकला विकसित झाल्या. वाड्मय क्षेत्रामध्येही क्रांतिकारक आणि चिकित्सापूर्ण लेखन झाले. आजच्या काळात त्याच चिकित्सा पद्धतीवर आधारित संशोधनप्रकल्प सदर केले जात आहेत. एवढ्या संशोधन साहित्याची निर्मिती मागच्या काळातील माणसांनी केली आहे. मागच्या पिढीतील या लोकांशी तुलना करता आपल्या या काळात, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील काही काही मोजक्याच विभूती सोडल्या तर इतर क्षेत्रात नवीन संशोधन  झालेले आढळत  नाही. म्हणजेच ज्या आधुनिक काळात आपण वावरतो, त्या काळातील माणसांची  विचारशक्ती, कल्पकता आणि सर्जनशीलता कुंठीत झाली आहे. विज्ञाननिर्मित भौतिकजगात माणूस सुखासीन आयुष्य जगू लागलाय. त्यामुळे पूर्वीच्या माणसांकडे असलेली नवसंशोधन वृत्ती आजच्या पिढीकडे राहिली नाही. अठराविश्वे दारिद्र्यात काढलेल्या पिढीच्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीची घरदारे सुखसमृद्धीने भरल्याने मुलांना आणि युवकांना आपल्या मेंदूच्या वापराची गरजच भासली नाही. साहजिकच शोध आणि संशोधन हे काही मोजक्याच लोकांपुरतेच मर्यादित राहिले.

आज आपण जागतिकीकरण झाले असे म्हणतो. ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचली आहे असे म्हणतो. पण खरोखरीच आपण ज्ञानी झालो आहोत का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. एक सामान्य माणूस म्हणून जगत असताना, आपल्या जगण्यातील साध्या सध्या गोष्टी आपण जाणून न घेता, कुणीतरी आपल्याला सांगतोय किवा वाटसअपसारख्या माध्यमातून आपल्याकडे जे पोहोचतंय, त्याला आपण  सत्य मानतोय. बरं ते सत्य आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्या मुळग्रंथांचा आणि पुस्तकांचा आधार घेतो का? त्यासाठी धडपड करतो का? जर कुणाला विचारलं तुला हे कसं माहित तर तो म्हणतो, मी नेटवर वाचलंय, खरं आहे ते. पण नेटवर माहिती उपलोड करताना त्याने जर, ती कुठलाही संदर्भ न घेता ती अपलोड केली असेल तर त्याला आपण कितपत संयुक्तिक मानायचे हाही प्रश्न  उरतोच. ह्या अशा गोष्टी म्हणजे आपल्याला कुणी तरी ऐऱ्यागैऱ्या सांगतो आणि आपण त्यावर विश्वास टाकतो असं म्हणावं लागेल. (युगे होऊ दे बहोत सुफळ)

 सामाजिक घडी नीट बसवण्याची जबाबदारी ज्या क्षेत्रावर आहे त्या शिक्षण क्षेत्राची आजची स्थिती काय आहे? आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर, ती आपल्याला काहीही करून मिळवता येते. पैसा, वशिला, भ्रष्टाचार याने कुठलीही पदवी मिळवता येते  आणि त्यात सगळंच आलबेल आहे, असे वाटू लागलेली नवपिढी  बाजारू शिक्षणपद्धतीचा एक भाग बनत  आहे. आजच्या  शिक्षण व्यवस्थेप्रमाणे ‘शिक्षण’ म्हणजे केवळ  नोकरी मिळवायचे साधन, त्यातून पोटार्थी कारकून निर्माण होतील अशीच व्यवस्था केलेली आहे. म्हणूनच या व्यवस्थेकडून आपण उत्कृष्ट वैद्य,तंत्रज्ञ, लेखक, तत्वज्ञ. कारागीर, चित्रकार, संगीतकार, अभिनेता किंवा नर्तक बनेल अशी अपेक्षा करू शकत नाही. प्राचीन स्थापत्यकला, शिल्पकला, संगीतकला, साहित्यकला या निरक्षर किंवा अल्पाक्षर ओळख असलेल्या माणसांच्या कल्पकतेतून आणि अखंड परिश्रमातून निर्माण झालेल्या आहेत. ती चिकाटी आणि परिश्रम वृत्ती आजकाल कुठेच आढळत नाही, यातून मानव जातीला भविष्यात काय साध्य करता येईल याचे उत्तर नेमकेपणाने देणे कठीण आहे.

एकीकडे जागतिकीकरण झाले .जगभरातील ज्ञानगंगा आपल्या दारात आली म्हणून आपण आजच्या काळातील आपल्या जगण्याला धन्य मानतो, तर दुसरीकडे एकूणच ज्ञान प्रक्रियेचा ऱ्हास होताना आपण काहीच करु शकत नाही. इ. स. सातव्या आठव्या ते बारा तेराव्या शतकापर्यंत जी संशोधने झाली, त्याचा अभ्यास आपण करतोय. पण त्यानंतर काही अपवादात्मक वैद्यकशास्त्र किंवा तंत्रज्ञानातील संशोधने वगळता बाकी मानव्यशास्त्रांमध्ये संशोधने  का झाली नाहीत, याचा विचार आपल्या मनात येत नाही. एकूणच डोळे कान व मेंदूची विचारप्रक्रिया  बंद करून आपण या गोष्टी निमुटपणे स्वीकारत चाललोय. शिक्षण क्षेत्रामध्ये होत जाणाऱ्या बदलामध्ये मूल्यमापनपद्धती अधिकाधिक सोपी करण्याकडे कल  दिसून येत आहे आहे. मुलांना अभ्यासक्रम पेलत नाही, राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षा मुलांना कठीण पडतात म्हणून संपूर्ण राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रम स्वीकारण्याचा सपाटा सरसकट सगळ्या बोर्ड आणि विद्यापीठांनी लावला आहे. पण त्याच्या बरोबर मुलांच्या बौद्धिकक्षमतेचा आणि आकलन शक्तीचा विचार जेवढ्या प्रमाणात व्हायला हवा होता तो झालेला दिसत नाही.

आम्ही शिक्षक  म्हणून काम करताना काही गोष्टी आमच्या निदर्शानास  येतात. त्या म्हणजे ज्या मुलांची पात्रता नसताना म्हणजे शिक्षणकौशल्यांमध्ये मागास असणाऱ्या मुलांना बोर्डाच्या आदेशानुसार पास करावे लागते. आधीच प्रकल्प पद्धतीमुळे त्यांना आयते गुण मिळतात आणि त्यात भर म्हणून आपण लेखी परीक्षेत दया बुद्धी दाखवून जे काही लिहिलंय ते बरोबर की चूक याची शहानिशा न करता त्याला गुण प्रदान केले तर या मूल्यमापन पद्धतीचा उपयोग तरी काय? कागदावर लिहिले त्यामध्ये आशय आहे, पण त्याची वाक्यरचना आणि शब्दरचना जर अशुद्ध असेल तर त्याला पैकीच्या पैकी गुण देणे कोणत्या मूल्यपातळीवर योग्य ठरेल? पण बोर्डाचा तसा  आदेश असेल तर अशा शुद्धातिशुद्धतेकडे लक्ष दिले जात नाही. सरसकट पेपर तपासणीमुळे मूल्यमापन नीट होत नाही. विदयार्थ्यांनाही आपण खूप हुशार आहोत असा समज निर्माण होतो. पण प्रत्यक्षात नव्वद नंतरच्या काळातील पिढीचा  विचार करता, उच्च बुद्धिमत्तेची मुले सोडली तर, बाकी सगळे हे सरसकट एकाच पारड्यात तोलण्यासारखे  आहेत. अगदी आजच्या पदवीधराला स्पेलिंगच्या शुद्ध तेसहित चार वाक्ये लिहायला सांगितली तर लिहिता येत नाहीत. तद्वत स्थिती ही मराठी विषय घेऊन पदवीधर झालेल्यांची मराठी भाषेसंदर्भात आहे. त्याला शिक्षकही अपवाद नाहीत. सोशल मिडीयावरून कमेंट्स पास करताना त्यांच्या भाषेची कल्पना येते. त्यातील मजकूर कुणालाच कळण्यासारखा नसतो. शैक्षणिक क्षेत्रातील सुमार दर्जा हा खालीपासुन वरपर्यंत म्हणजे, प्राथमिकस्तरापासून विद्यापीठस्तरापर्यंत पाहायला मिळतो. एकेकाळी सी. बी. एस. ई  बोर्डाचा अभ्यासक्रम हा उत्तम अभ्यासक्रम म्हणून नावाजलेला  होता. त्यामुळे त्या शाळांची  संख्या वाढत गेली. अजूनही त्या अभ्यासक्रमाबाबत शंका घेण्यासारखे काही वाटत नाही. पण त्याची मूल्यमापनपद्धती पाहता अगदी सुमार दर्जाच्या मुलांनाही पास करता येईल, असे मुल्यमापन केले जाते. इतर बोर्डाच्या  बरोबरीने आपली मुले गेली पाहिजेत, म्हणून मुलांना  थोडंफार मिळतं जुळतं उत्तर बघून पैकीच्या पैकी गुण दिले जातात. याला शासनाची शैक्षणिक धोरणेही तेवढीच  जबाबदार आहेत. शासनाने शिक्षणावरील खर्च कमी केल्यामुळे खासगी शिक्षणसंस्थाद्वारे चालवण्यात येणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षणाचे सपाटीकरण सुरु झाले आहे.   ( (युगे होऊ दे बहोत सुफळ)

एकूणच नव्वद नंतरच्या काळात हळू हळू शिक्षण क्षेत्रामध्ये स्पर्धा  निर्माण झाली. शालेयस्तरापासून विद्यापीठ स्तरावरील अभ्यासक्रम  अधिकाधिक  सोपा केला जाऊ लागला. .मुलांना शिक्षणाची आस कमी होऊ लागली नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण कमी झाले.त्यामुळे शिक्षण घेऊन उपयोग काय? असे सर्वसामान्यांना वाटू लागले.योग, चिकित्सा,अभ्यास या गोष्टी कालबाह्य होत चालल्या.म्हणजेच एकूणच ज्ञान प्रक्रियेचा टप्प्या टप्प्याने ऱ्हास झाला.याचाच अर्थ पुन्हा एकदा शिक्षण  म्हणजे ज्ञान मिळवणे ही काही मोजक्याच लोकांची मक्तेदारी झाली आहे. बाकी सगळे पुन्हा एकदा बत्थडपणाने,  दुसऱ्याने सांगितलेले ऐकत जगत राहतील असा काळ आला आहे.

शिक्षक किंवा साहित्यिकांसाठी आजच्या जगण्यावरची ही पुटे पुसून टाकण्यासाठी खूप काही करण्याची  वेळ आली आहे. जर आपण अभ्यास आणि ज्ञानापासून दूर गेलो तर, मंदिरात असंख्य देव बसवूनही आपल्या जगण्यातील तगमगी आणि यातना दूर होऊ शकणार नाहीत. ‘आपुलाशी वाद आपणाशी’, असे जरी संत तुकारामानी म्हटले असले तरी ‘संवादावीण दुजे नेणे काही’. माणसांनी माणसांशी सुसंवाद साधल्याशिवाय आपल्या प्रश्नांची उत्तरे सापडणार नाहीत. कोरोना  नावाच्या विषाणूने अक्ख्या जगाला हादरवून सोडले. मानवाने  कैक शोध लावून प्रयत्न करूनही, निसर्ग आणि मानव यांना नामशेष करायचा प्रयत्न केला तरी ,निसर्ग कोणत्या विषाणूच्या रुपात आपल्यासमोर येईल हे सांगता येत नाही. या कोरोनाने बलाढ्य अर्थव्यवस्था धुळीस मिळाल्या आहेत. सामजिक घडी पुरती विस्कटून गेली आहे. जवळच्या माणसाच्या खांदयाला खांदा द्यायला माणसं पुढे येऊ शकत नाहीत. सामाजिक अंतराचा आदेश पाळता पाळता,  माणूस एकमेकांपासून  मानसिकदृष्ट्या मैलोन मैल दूर होत चालला आहे. पोटाच्या भूकेपुढे पुन्हा एकदा शिक्षण, ज्ञान आणि संस्कृती  या गोष्टी माणसाला  थिट्या वाटू लागल्या आहेत. आणि ‘फिरून तेच दिवस’ येतायत की काय असं वाटू लागलंय. महायुद्धाने जेवढी हानी केली नाही, तेवढी हानी जैविक युद्धे करू शकतात याचा धडा संपूर्ण मानव जातीला मिळाला आहे. संपूर्ण मानवी इतिहासाची उलटापालट होण्याचा हा काळ आहे, याची प्रचीती सर्वांना आली आहे . एकूणच या भयप्रद काळात आपल्यासमोर हा प्रश्न उरतो की, आगामी युगे बहोत सुफळ करण्याची ताकद आपल्या  ग्रंथ आणि लेखणीत येईल का?  (युगे होऊ दे बहोत सुफळ)

 

 

युगे होऊ दे बहोत सुफळ ! - श्वेतल अनिल परब
श्वेतल अनिल परब
सावंतवाडी
9423301892

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *