चकवा – श्वेतल अनिल परब

चकवा – श्वेतल अनिल परब

रात्रीचे नऊ वाजले होते. सागर आपल्या ऑनलाइन लेक्चरसाठी स्लाइडस बनवत होता. मध्येच कुणा विद्यार्थ्यांचा फोन आला. “ सर उद्या  मी कॉलेजला येणार नाही. उद्या गाड्या बंद आहेत. सागर म्हणाला, “ ठीक आहे जमलं तर, वाहन मिळालं तर या. कॉलेजला सुट्टी देता येणार नाही. आधीच कोविडमुळे दोन वर्षे सुट्ट्याच सुट्ट्या झाल्यात.” एकामागोमाग एक पालक आणि विद्यार्थ्यांचे फोन, “उद्या कॉलेज सुरू असणार का?”  सागरने वैतागून फोनबंद करून ठेवला. आधीच इथे आम्ही ऑनलाइन लेक्चर्सची तयारी करून कंटाळलोय आणि ही एक दुसरी पीडा!

चकवा - श्वेतल अनिल परब
चकवा – श्वेतल अनिल परब

सागरने आपलं काम थांबवलं. त्या रात्री त्याचं जेवणावर लक्ष नव्हतं. जेवता जेवता त्याच्या कानावर पडलं, “उद्या पासून एस. टी. कामगारांचा बेमुदत संप.”  सागरच्या पोटात घास उतरेना. विद्यार्थी हीच दैवतं मानून आपण कोविडच्या काळातही काम करत राहिलो. आणि आता कुठी गाडी रुळावर येते तर ही गाडी बंद पडली.

सागर लहान होता. तेव्हा त्यांचे आईवडील, आजीआजोबा आणि लवूकाका यांचं एक छोटंसं शेतकरी कुटुंब होतं. लवूकाका लग्नाचा राहिला होता. गिरणी बंद पडल्याने काकाची नोकरी गेली होती. त्या आधी तो दहा वर्षे मुंबईत गिरणीत कामाला होता. “त्या चुलत्यासारखो होव नको, तेच्यापासून लांब  ऱ्हाव.” आई सागरला सांगत राह्यची. सागर तेव्हा नववीत होता. वयात येत असताना काही गोष्टी पुसटशा कानावर पडत. ‘लवूक त्या सोसायटीत बरा काम मिळा होता, पण तो त्या सटवायच्या नादाक लागलो आणि मुंबईक गेलो. ता पॉर बारा लवड्याचा, गेला त्या वायरमनबरोबर पळान.’ लवू काका संडासला म्हणून टमरेल घेऊन जायचा आणि दारू पिऊन यायचा. सागरचे आजोबा आकाशपाताळ एक करायचे. आणि त्याला घरात न घेता गोठ्यात घेऊन गुराला बडवतात तसे लिंगडीच्या काठीने बडवायचे. काका बरा असला की सागरला सायकलवर बसवून शाळेत सोडायचा. गुरांना पाणी देणं, गुरांना सोडणं न्हाऊ घालणं ही त्यांची कामं.

एकदा सागरची आई विटाळशी होती. तिला कपडे धुवायला पाणी हवं होतं. “लवू भावोजी, दोन बादले पाणी भरून ठेवा.” लवू काकांनं तिचं ऐकलं की नाही माहीत नाही. तो आपल्या तंद्रीतच आपली पाठ गुरं बांधतात त्या खुंटीला घासत राहिला. सागर तिथून परड्यात पूजेसाठी फुलं आणायला जात होता. लवुकाकांची पाठ घासून घासून रक्तबंबाळ झाली होती. सागर घाबरून, फुलं न घेता घरात गेला. तेवढ्यात बाबांनी त्याला बघितलं आणि खोलीत कोंडून ठेवलं. लवुकाका रडत होता. ‘मी आता ह्या घरात थांबाचंय नाय. उद्याच्या उद्या मुंबयक जातलंय. जगान नायतर मरान.’ दुसऱ्या दिवशी लवू काका घरातून गायब. तो आजपर्यंत. सागरला लवूकाकांच्या आठवणीने गलबलून आलं. त्याने वळकटी घेतली आणि माजघराला लागून असलेल्या जोडखोलीच्या तळाच्या खोलीत गेला.

डोळ्यासमोर असंख्य एस टी कामगार शेतकरी, शिक्षक दिसू लागले. सगळ्यांनी आझाद मैदान हलवून सोडले होते. उभ्या मुंबईला दरदरून घाम सुटला होता. घशाला कोरड पडली होती. शेष नागाच्या फण्यावर उभी असलेली ही पृथ्वी कोसळते की काय असं वाटू लागलं. भुकेले, अर्धभुकेले उपाशी चेहरे रात्रीच्या अंधारात अजस्त्र  राक्षसाच्या तोंडासारखे ज्याला त्याला खाऊन टाकतात की काय असे भासू लागले. सागरच्या हातातली पुस्तकं गळून पडली. थोडयावेळाने त्याने पांघरून बाजूला सारले आणि आपले तोंड चाचपुन पाहिले. तर तोंडातून लाळ गळून गालावर चिकट चिकट थर जमा झाला. स्वप्नांचा हात धरून चालायचं म्हटलं तर स्वप्न देखील लाळेसारखी बुळबुळीत एक तर त्याला चिकटून राह्यला होतं, नाहीतर आपण तरी घसरून पडतो.

एस. टी. कर्मचारी असो की बांधकाम क्षेत्रातील कर्मांचारी, सगळ्यांचीच कोविडने दशा करून टाकलीय. असंघटित क्षेत्रातील सगळेच कामगार एका पावाच्या तुकड्यांसाठी एकमेकांवर तुटून पडतायत असं चित्र समोर दिसतंय. या सगळ्यांना स्वप्न चकवा देत जातायत. आपण विद्यार्थ्यांना काय सांगायचं? स्टिव जॉब, मायकल डेल, एलॉन मस्क वाचायला सांगायचा की नाही? की आकाशाकडे डोळे लावून बघत जगायला शिकवायचं. कशावरून हे विद्यार्थी, ही आजची पोरं उद्या खासगीकरणाच्या राक्षसाच्या तोंडात असणार नाहीत? आज आमची स्थिति ही आहे, तर यांचं काय? सागरला बाजूच्या पाणंदीतून साप येताना दिसला म्हणून तो झटदिशी घरात गेला. आई टी. व्ही. वरच्या बातम्या पाहात होती. ‘एस टी कामगारांचा संप अजूनही चालूच राहणार.’ सागर भिंतीवर चुकचुकणाऱ्या पालीकडे बघत राहिला.

श्वेतल अनिल परब
सावंतवाडी
9423301892

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *