केल्याने आपत्ती व्यवस्थापन – अतुल देऊळगावकर

केल्याने आपत्ती व्यवस्थापन ………..

       किल्लारी येथिल भूकंपाला ३० सप्टेंबर २०२० रोजी २७ वर्षे पूर्ण झाली. भूकंपानंतर किल्लारी व परिसरात मोठ्या प्रमाणात पूनर्वसनाचं काम उभारण्यात आले. यावर अतुल देऊळगावकर यांनी ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिले आहे. इतकी वर्षे उलटल्यानंतरही या आपत्तीतून सरकारी, सामाजिक व व्यक्तिगत पातळीवर आपण फार काही शिकलोय असे मात्र आज जाणवत नाही. याच निमित्ताने अतुल देऊळगावकर यांनी केलेले आपत्ती व्यवस्थापनावरील हे भाष्य.

केल्याने आपत्ती व्यवस्थापन - अतुल देऊळगावकर
केल्याने आपत्ती व्यवस्थापन – अतुल देऊळगावकर

       ३० सप्टेंबर १९९३, सकाळी ३ वाजून ५५ मिनिटे, भूमंडळ डळमळले. भूकंपापूर्वी १२,२६४ लोकसंख्या असलेल्या किल्लारी गावात दुपारी १२ वाजता, दीड लाख लोक भूकंप बघण्यासाठी जमली होते. लोक नुसते पाहण्याऐवजी कामाला लागले असते तर कित्येक जीव वाचले असते. आपत्ती पर्यटन (Disaster tourism) आजही आहे आणि तेव्हाही होते. आपल्याला कुठलाही अपघात झाल्यानंतर उत्सुकता असते ते पाहण्याची आणि सांगण्याची. मग तो पूर असू दे, भूकंप असू दे. पण २७ वर्ष झाल्यानंतर लक्षात काय येतंय की कुठलीही आपत्ती आल्यानंतर होणारे हे आपत्ती पर्यटन आहे ते खूप घातक आहे. ती मनोवृत्तीच खूप घातक आहे. आता कदाचित ते सेल्फी मोड मध्ये गेलेले असेल. इतरांना दाखवायचे असेल. बाकी काही नाही. त्यापुढे मी मदत केली पाहिजे, मी इतरांना मदतीला नेले पाहिजे ही भावनाच नाहीशी झालीय आहे. तेव्हा काय आणि आत्ता काय काहीही फरक पडलेला नाही. लोकांची मानसिकता तशीच आहे.

हे झाले लोकांच्या बाबतीत पण पत्रकार, सामाजिक संस्था, सरकार या पातळीवर आपत्तीला कसा प्रतिसाद दिला जातो ते ही बघण्यासारखे आहे. आपल्याकडे अजूनही, ज्याला पत्रकारितेतलं specialization असं आपण म्हणूया, ते झालेले नाहीये. भूजमध्ये एक ‘कच्छमित्र’ नावाचं दैनिक आहे. त्याचे संपादक आहेत खत्री नावाचे. ज्याला जबाबदारीची प्रादेशिक पत्रकारिता म्हणतात त्यांत ते पारंगत आहेत. २६ जानेवारी २००१ च्या आधी जेव्हा छोटे भूकंपाचे धक्के बसत होते, तेव्हा खत्री साहेबांनी ‘कच्छमित्र’ मध्ये २१ अग्रलेख लिहून म्हटले होते की आम्हाला भूकंपाचा धोका आहे, आम्हाला वाचवा. ही जागरूक पत्रकारिता असते. मग वैज्ञानिकांशी बोलून, स्थापत्य अभियंत्यांशी बोलून, ते विविध पर्याय सुचवत होते. जबाबदारीची पत्रकारिता कशाला म्हणतात तर आधी तुम्ही विज्ञान समजून घ्या, मग तुम्ही अभियान्त्रीकीतले मुद्दे समजून घ्या, मग लोकांचे प्रश्न मांडत, तुम्ही एका चांगल्या पर्यायाविषयी सूचवा. हे जबाबदार पत्रकारितेचं काम होतं. आपल्याकडे अशी पत्रकारिता नाही.

      आपत्ती झाल्यानंतर होणाऱ्या पुनर्वसनामध्ये काही टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यामधली  कर्तव्ये आणि जबाबदारी वेगळी आहे. त्यामध्ये जवळच्या समाजाची, समाजसेवी संस्थांची, सरकारची, राजकीय नेत्यांची, प्रत्येकाची जबाबदारी वेगळी आहे, याचं भान कोणी आणून द्यायचं? प्रत्येक काळात हे करावे लागते. किल्लारीच्या भूकंपानंतर काय सांगता येईल की संस्था म्हणून कोणीही जबाबदारीने वागले नाही. त्यामुळे किल्लारी भूकंपाच्या चुकांची पुनरावृत्ती त्या नंतरही होतच राहिली. किल्लारी हा आपल्यासाठी एक धडा होता. हे धडे आपण स्वतः कडे तटस्थ बघण्याची एक संधी असते. आपण त्या आपत्तीमधून काही धडा शिकलोय असे वाटत नाही. कारण आपल्याकडे कोणाला स्वतःकडे तटस्थ पणे बघायचंच नाहीये. पत्रकारांना नाही, स्वयंसेवी संस्थांना नाही, शासनाला नाही, ती जबाबदारीच कोणाची नाहीये. त्यामुळे आपल्या पुनर्वसनाचं आपण कठोरपणे, तटस्थपणे विश्लेषण करणे गरजेचे आहे. आपण समाज म्हणूनही काही शिकलो आहात असं वाटत नाहीये. पुनर्वसन कसे करावे याचीच आम्हाला माहिती नव्हती. आजही नाही. विविध प्रकारचे intellectual input घेऊन तुम्ही पुनर्वसन करणं आवश्यक आहे. त्यामध्ये समाजशास्त्र  आहे, मानसशास्त्र आहे, आर्किटेक्टस, इंजिनियर्स आहेत. या सगळ्यांचा विचार करायला हवा. नाहीतर घिसाडघाईने केले तर त्याचं काहीतरी विचित्र भरीत होते. जे आपल्याकडे झाले. आता किल्लारी गाव हे पूर्वीच्या गावापेक्षा २० पट मोठे झाले आहे. हे त्यांना मेंटेन करता येत नाहीये. कारण लोकांना या पुनर्वसनाच्या कामात सहभागीच करून घेण्यात आले नव्हते. मूळात जगात आजपर्यंत कधीच भूकंपामुळे स्थलांतर झालेलं नव्हतं. किल्लारी नंतर मात्र ४४ गावांचं स्थलांतर केले गेले. त्यांत गावांची रचना पुर्णपणे बदलली. याचा जो विचार करायला पाहिजे, तो लॉरी बेकर आणि अन्य काही तज्ञांनी केला होता. बेकर आणि अनेक देशांतील अनेक तज्ञ येऊन सांगत होते की तुम्ही घाईने हे पुनर्वसन करू नका. शेतीला, शेती संस्कृतीला जोडून असणारं घर आणि गावं तयार करा. वेळ घ्या. पण स्थलांतर करण्याचा हा निर्णय का घेतला? लोकांची ती मागणी होती का? तर होती. लोक घाबरलेले होते. एक आणि एकमेव फक्त किल्लारीच्या भूकंपानंतर स्थलांतर केलं गेलं. ती चूक होती हे आपल्याला नंतर लक्षात आलं. कारण साधी गोष्ट आहे की जो घरात राहिल त्याला ते घर कसं हवं हे विचारायला पाहिजे. ते झालेच नाही. जेव्हा लॉरी बेकर इथे आले, तेव्हा ते सांगायला लागले  की तुम्ही शेतकऱ्यांना वन बेडरूम किचनचं घर देणार आहात का? आणि तसंच झालं. त्या घरांना कप्पे नाहीत, कोनाडे नाहीत, शेतीची अवजारं कुठे ठेवायची? पोती कुठे ठेवायची हे कळत नव्हते. मानसशास्त्रीय दृष्ट्या असं सांगितलं जातं की आपलं घरासोबत जैविक सैन्द्रिय नातं असतं. घराच्या रचनेसोबत, डिजाईनसोबत सेंद्रिय नातं असतं. त्यामुळे ही घरे, गावे भकास भयाण वाटतात. पण सरकारने बेकर यांचं ऐकलं नाही. अन्य तज्ञांचंही ऐकलं नाही. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेण्याची महत्त्वाची संधी आपण गमावली. कारण ती इच्छा स्वयंसेवी संस्थांची नव्हती, आणि सरकारची सुद्धा नव्हती. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे.

केल्याने आपत्ती व्यवस्थापन

      १९९३ च्या भूकंपात जागतिक बँकेने आपल्याला मदत केली. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये १९०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. त्यापैकी जवळ जवळ १००० कोटी गुंतवणूक बांधकामात गेली. यातून काय होऊ शकले नसते? पुनर्निर्माण होऊ शकले असते, जर कल्पकता वापरली असती तर दुष्काळ पूर्णपणे हटवता आला असता. विकास म्हणजे फक्त पैसा ओतणं नाये. विकास म्हणजे तुम्ही intellectual input आणि agricultural input किती घेताय याचा सारासार विचार करणे. हे जर प्रत्येक गावांनी घेतले असते, तर काहीतरी खूप सुन्दर झाले असते. ती इच्छा कोणातही नव्हती. आपण आता जर बघितलं तर बेकरांनी पूर्वी सांगितलेली सगळी दुखणी आता स्पष्ट दिसतायेत. किल्लारीला मेंटेनन्स करता येत नाहीये, वृद्धांना पूर्ण गावभर हिंडता येत नाहीये, गावाचं पूर्ण गावपण निघून गेलेलं आहे. अकाली ही गावं बकाल झालेली आहेत. हे सगळं आपण ओढवून घेतलेलं आहे. त्यामुळे याचं वर्णन असं करता येईल की हे पुनर्वसन भव्य होतं पण दिव्य नव्हतं.

       एक तर त्यावेळेला जागतिक पातळींवर आपत्ती व्यवस्थापन खूपच बाल्यावस्थेत होते. १९९३ चा किल्लारीचा भूकंप व २००५ नंतर, जपानचा भूकंप आणि त्सुनामी नंतर यावर चर्चा व्हायला लागली. आपल्याकडे २००६ साली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना झाली. त्यांचे मूळ सांगणे हेच आहे की आपत्ती येण्याआधी तुम्ही प्रतिबंधात्मक उपाय काय करता? काय पद्धतीने शिकवता? अजून आपण या दृष्टीने काही शिकलो नाही आहोत. कोणतीही छोटी आपत्ती आली की त्यानंतर कसे वागायचे हे आपण शिकवलेलंच नाहीये. किल्लारीच्या भूकंपाने आपल्याला अजून एक गोष्ट शिकवली. ती म्हणजे भूकंप झाला तर भूकंप केंद्रापासून दूरवर असलेल्या भागातही नुकसान होऊ शकते. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे आपण आपत्तीची स्वतःहून पेरणी करतोय. कारण बांधकामाची गुणवत्ता खूप वाईट आहे. कितीतरी ठिकाणी इमारती धडधड पत्याच्या बंगल्यासारख्या पडतायेत. त्या बांधकामकर्त्यांना कुठे शिक्षा होते? आपण आपत्ती व्यवस्थापन काहीच करत नाहीत आहोत. आपल्याकडे आपत्ती अपघात नाही तर प्रघात व्हायला लागला आहे. आपले नेतृत्व हे आपत्ती पुरक आहे. ते आपत्तीची पेरणी करत जाते. कधी दुष्काळ, पूर, जंगलतोडीमुळे येणारे पूर आहेत, आणि या पद्धतीची बांधकामं त्यास अजून पूरक ठरतात. या सगळ्यांच्या बाबतीत आपण किती जागरूक आहोत? हे प्रश्न पत्रकार, स्वयंसेवी संस्था किती पद्धतीने आणतात? विधानसभा, लोकसभा मध्ये या प्रश्नावर कोण बोलतात? हे कोणाचेच विषय नाहीयेत. हे पोरके विषय आहेत. त्यामुळे आपल्याकडे आपत्तीच कायम कारभार करणार आहे. आपत्ती व्यवस्थापानाचा कारभार नाहीच आहे. कारण ही कामे दीर्घकालीन असतात. सरकार कोणत्या पक्षाचे येते हा प्रश्न नाही. तिच्या ज्या यंत्रणा आहेत या यंत्रणेने त्यांचे काम व्यवस्थित करावे. कुठल्याही अनुभवातून शिकायचं असते. पण अनुभवातून शिकायचंच नाही असे ठरवले तर कितीही जरी वाईट अनुभव आले तरी आपल्याला काहीही अक्कल येणार नाही. आपली वरचेवर हानी होत जाईल. आपत्ती आल्यानंतर जी सशक्तता येते ती अजून आपल्याकडे आली नाहीये. मनाने आणि इन्फ्रास्ट्रक्चरने आपण अजूनही सशक्त झालेलो नाही आहोत. आता तरी आपण सावध होणार आहोत का हाच खरा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. (केल्याने आपत्ती व्यवस्थापन)

पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी केलेल्या चर्चेचे शब्दांकन.

 

 

अतुल देऊळगावकर

One thought on “केल्याने आपत्ती व्यवस्थापन – अतुल देऊळगावकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *