लेक माझी आई- बालाजी ज्ञानेश्वर मगर

लेक माझी आई...
लेक माझी आई…

लेक माझी आई

रोज सकाळी उठतो मी,

काल दिवसभर अंगाला चिकटलेले

गुन्हे,मयतं,अर्ज,कुणाचे आशिर्वाद तर अनेकांनी कळत नकळत दिलेल्या शिव्या-शाप घेऊन,

अंघोळ करताना सुद्धा डोकं चोळत चोळत

तेच डोक्यात घोळत असतो,

येतो मग हळूच हॉल मध्ये दबक्या पावलानच …

सजवत असतो अंगावर खाकी आवाज न करता,

लेकीची झोपमोड हाऊ नये म्हणून…

अन् जाताना घेतो मनभरून बघून त्या निरागसतेला, काळजावर दगड ठेऊन तिचाच बाप असताना…

मग सुरू होतो प्रवास लाखो स्वप्न घेऊन निघालेल्या बापाचा घरापासून कामापर्यंतचा,

वाढवतो मी तिला माझ्या स्वप्नाच्या गर्भाशयात दिवसभर,

ती मुरत असते, गोलगोल फिरत असते ,

अप्रतक्षपणे तिच्या इवल्याशा पावलांच्या लाथा जाणवतात मला दिवसभर..

लेक उठते ,बाप बघते ,

नसतो तो आजही तिच्या जवळपास,

डोळे उघडताच झालेला असतो चुराडा

तिने बापाकडून रात्री घेतलेल्या वचनाचा अन् स्वप्नांचा सुद्धा .. रोजच्या सारखाच…

तीच विश्वच तिचा बाप,त्यात ती रमते दिवसभर,

टांगते दारावर नजरा,

परतणाऱ्या बापाच्या पावलांचा आवाज ऐकण्यासाठी,

दिवस मावळतो ,रात्र होते…

पण थकत नाहीत कोवळ्या नजरा अजूनही दारावर टांगलेल्या ….

आजही येतो मी घरी पुन्हा तसाच,

अर्धा जीव पीसीआर मध्ये असलेल्या आरोपीसोबत सोडून अन्

गुन्हे,मयतं,अर्ज, कुणाचे आशिर्वाद तर अनेकांनी कळत नकळत दिलेल्या शिव्या-शाप घेऊन,अंगाला चिकटवून…

दारावरची बेल वाजवतो,

अन् घरात पाऊल टाकताच…

दिवसभर ताटकळलेल्या त्या कोवळ्या नजरेची क्षणात ताजी फुलं होतात,

हसतात,बागडतात,रडतात सुद्धा,

बिलगतात माझ्या अंगाला ,

तेव्हा,नकळत पळून जातो माझ्या माणेवरचा बोझ…

अन् धुहून टाकतात दिवसभर चिकटलेला

माझ्या मनाचा मळ …

करतात हजारो बोबडे प्रश्न,

घेतात वदवून माझ्याकडून

पुन्हा तीच वचने,तीच स्वप्ने…

माझ्याकडून मोडली जाणार

हे कदाचित तिला कळत असतानाही…

अन् मी आपसूक गुडघ्याावर येतो..

ती निरागस फुलांची माळ गळ्यात माळतो तेव्हा, धडधडत असत तीचं इवलस ऊर

माझ्यासाठी आई झालेलं…

अन् मी तिच्या कोवळ्या स्वप्नात

विरून जातो ,

मरून जातो,

पुन्हा सकाळी जिवंत होण्यासाठी….

 

बालाजी ज्ञानेश्वर मगर...✍️ (सहाय्यक पोलीस निरीक्षक)
बालाजी ज्ञानेश्वर मगर…✍️
(सहाय्यक पोलीस निरीक्षक)

3 thoughts on “लेक माझी आई- बालाजी ज्ञानेश्वर मगर

  1. अप्रतिम. मार्मिक व कामकाजी मानवी मनाच्या सूक्ष्म छटांना स्पर्श करणारी कविता.

  2. एका कर्तव्य तत्पर आणि कुटुंब वत्सल बापाची घालमेल काळजाचा ठोका चुकवणारी आहे.
    बापाची व्यथा आणि काळजी फारच परिणामकारक रीतीने मांडलीय… सुंदर सर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *