येरांनी वाहावा भार माथा -श्वेतल अनिल परब

येरांनी वाहावा भार माथा -श्वेतल अनिल परब

मी हायस्कूलमध्ये असताना आम्हाला  पोंक्षेबाई मराठी विषय शिकवायच्या.एकदा गावात मकरसंक्रांतीच्या हळदीकुंकवाचा कार्यक्रम होता.हा कार्यक्रम तळकोकणात मकर संकांतीपासून रथसप्तमीपर्यंतच्या आठ ते पंधरा दिवसापर्यंत केला जातो.माझी मैत्रीण लता तिच्या घरच्या हळदीकुंकू कार्यक्रमासाठी पोंक्षे बाईंना  बोलवायला गेली.सवाष्ण बायकांना या कार्यक्रमाला बोलवण्याचा रीतीरिवाज  म्हणून त्यांनाही निमंत्रण देणं हा हेतू.लताला दरवाज्यात बघून बाईंनी अदबीनं तिला आत घेतलं.बसायला खुर्ची दिली. तीनं घाबरत घाबरत बाईंना हळदीकुंकवाच निमंत्रण दिलं .ही घटना  ऐशीनव्वद च्या दशकातील आहे.बाई पुरोगामी विचाराच्या होत्या. बाईंनी लताला सांगितलं ,”मी तुमच्या घरी तिळगुळ समारंभाला येईन पण हळद कुंकू लावून घेणार नाही “.लता पारंपरिक रितीरिवाजात वाढलेली असल्यान काहीशी खट्टू  होऊन घरी परतली.

वर उल्लेखिलेल्या पोंक्षेबाई  या स्वतंत्र विचाराच्या होत्या.त्याबरोबर त्या समाज परिवर्तनाचं काम करत होत्या.कुंकू हा एकमेव घटक बायकाबायकांमध्ये भेद निर्माण करतो हे कळायला लागल्यापासून  त्यांनी कुंकू बांगड्या आणि टिकल्या याला आपल्या जीवनात दुय्यम स्थान दिलं .जन्मापासून प्रत्येक स्त्रीचा कुंकू बांगड्या आणि फुलं यावर असलेला अधिकार  पती निधनानंतर हिरावून घेतला जात असेल तर हा स्त्रीजातीवरचा अन्याय  आहे असं त्यांना मनापासून वाटायचं.स्त्रीच दुय्यमत्व अधोरेखित करणाऱ्या अशा रितीभातींना त्यांचा कडाडून विरोध असायचा.

दक्षिण कोकणात पौष महिन्यात देवाधर्मादी कोणतंच पुण्यकर्म विधी केले जात नाहीत .या काळात सूनमुख पाहू नये असंही मानल जात ,त्यामुळे सूनबाईला माहेरी पाठवण्याची प्रथा आहे.भौगोलिकदृष्ट्या याकाळात सूर्याचं  उत्तरायण सुरु होतं. हा काळ संक्रमणाचा असल्यानं बहुधा दानधर्मादी पुण्यकर्म घडावं म्हणून हळदीकुंकू कार्यक्रम करून वाण देण्याची प्रथा असावी. आपले बरेचसे रीतीरिवाज हे कृषि संस्कृतीतून आलेले असल्यानं शेतात पिकणारे धान्य किंवा ,फळे  वाण देण्याची प्रथा पडली असावी.तसेच काही ठिकाणी लहान मुलांना संक्रातीला बोरन्हाण घालण्याची पद्धत आहे. हा देखील त्याचाच एक भाग म्हणावा लागेल .एकूणच  हा समारंभ साजरा करण्यामाग स्नेहभाव वृद्धिंगत कारण समूहभावना  जोपासणं  हा  मूलगामी विचार असावा असं  लक्षात येतं.पण आजच्याकाळात  खरोखरीच अशा  सामाजिक  मुल्यांची जोपासना केली जाते का? आणि ती केली जात असेल तर नक्कीच हा समारंभ स्तुत्य आहे असे म्हणावयास हरकत नाही.

यासंदर्भात मला आमच्या नात्यातील सुलभाकाकुंनी सांगितलेला प्रसंग आठवला. काका देवाघरी जाऊन फक्त पंधरा दिवस झाले होते. काकू घरात ओटीवर बसल्या होत्या. तेवढ्यात शेजारच्या शारदाकाकू अंगभर दागिने व जरीकाठाची साडी नेसून त्यांच्या सासूबाईंना हळदी कुंकवासाठी बोलवायला आल्या. अवघ्या विशीतच सुलभा  काकुंच हळदीकुंकू उध्वस्त झालेलं. त्यांच्याकडे तुच्छतेनं बघत मान फिरवून त्यांनी शारदा काकूंना निमंत्रण दिलं .एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर तोंडाचा पट्टा चालवत त्या निघून गेल्या. “असल्या पांढऱ्या  कपाळाच्या दळभद्री बाईनं याकाळात बाहेर बसायचं तरी कशाला?अभद्र मेल्या.” अस बोलताना आपणदेखील  बाईजातीच्या आहोत हे त्या सोयीस्करपणे विसरल्या.या प्रसंगानंतर माझ्या मनात कुंकू ही गोष्ट स्त्रियांमध्ये भेदाभेद निर्माण करणारी  व भावनिक खच्चीकरण करणारी आहे असं ठासून भरून राहिलंय.जर हे समारंभ सामुहिक ऐक्य निर्माण करणारे असतील तर स्त्रियांमध्ये कुमारी सवाष्ण व विधवा असा भेद का केला जातो? सर्वांना समानपातळीवर एकत्र आणून हा कार्यक्रम करता येत नाही का? याचा विचार इथे करणं भाग पडतं.

येरांनी वाहावा भार माथा -श्वेतल अनिल परब
येरांनी वाहावा भार माथा -श्वेतल अनिल परब

हळदीकुंकू समारंभाचा सामाजिक अंगानं विचार केल्यास हा एक सामाजिक स्नेहसंबंध जोडण्याचा उत्तम मार्ग आहे असं मानलं जातं.त्यानिमित्तान वर्षातून एकदा बायका एकमेकींच्या घरी जातात.बायकाबायकांची ओळख पाळख वाढते कुटुंबे जोडली जातात.एकंदरीत स्नेह वृद्धिंगत करणारा हा पारंपरिक सण  होय. पण  आज आधुनिकीकरणाच्या युगात मध्ययुगात साजरा केला जाणाऱ्या या सणाची कीतपत  गरज आहे हे जाणलं  पाहिजे .तेही केवळ सवाष्ण बायकांसाठीचा सण म्हणून आपण संस्कृतीचं  उदात्तीकरण करतोय, हे आजच्या सुशिक्षित वर्गाला कितपत पटणारं आहे? संस्कृती म्हणून जोपासायच्या कित्येक मुल्यांची आपण पायमल्ली करत आहोत.प्रेम ,दया.क्षमा, सहनशीलता, समता. निराभिमान निरपेक्षता आदि .मुल्ये केवळ संस्कृतीचा कोरडा पाठ पढून रुजत नाहीत.ती अंगात असावी लागतात.आपले सणसमारंभ हे प्राचीन कृषि संस्कृतीतून पुढे आलेले आहेत.त्या सामाजिक व्यवस्थेमध्ये समता व सामुहीकता  या मूल्यांना प्राधान्य दिलं जात होतं.अजूनही काही  गावात कित्येक कृषि कुटुंबे एकत्रितरित्या शेती करतात. कोकणात शेतीची कामं ही एकमेकांच्या सहकार्यानं करतात.तिथे मजुरी किंवा पैसा हा विषय दुय्यम असतो.अशाठिकाणी सामुहिकता  नक्कीच जोपासली जाते.कोकणातील बऱ्याच खेडेगावात अगदी साध्या पद्धतीनं हळदीकुंकू सण  साजरा केला जातो.तिथे कुठलीही स्पर्धा  किंवा संपत्तीचा हव्यास दिसून येत नाही.सुवासिनी बायका आपलं कुंकू अखंड रहावं अशा भोळ्या समजुतीनं असे काही समारंभ करत असतात.पण शहरी भागात आपण केवळ परंपरा पूजक असं  भासवत हा सण  साजरा करण्याकडे कल दिसतो .साधं उदाहरण म्हणजे हळदीकुंकवासाठी निमंत्रण यादी तयार करताना या वर्षी कोणती नाव घालावीत व कोणती नाव काढून टाकावीत असा आप परभाव विचार मनात आणणाऱ्या बायका संख्येला पासरीभर आढळतील.म्हणूनच खेदानं असं म्हणावं लागेल की हा सण  सामाजिक ऐक्याऐवजी सामाजिक दुफळी निर्माण करण्याच काम करतो.कवी क्षेमेंद्राच्या सुभाषिताचा मला इथे उल्लेख करावासा वाटतो.

वन्ध्यनजन्म शरीरिणाम विरहीतं बुद्ध्या विचारेच्छया  |

विचारक्षम अगर विचार करण्याची इच्छा करणारी बुद्धी नसेल तर माणसाचा जन्म फुकट आहे.

सांस्कृतिक पातळीवर विचार केल्यास हळदीकुंकू समारंभासारखे अनेक कार्यक्रम स्त्रिया संस्कृती पुढे नेण्यासाठी म्हणजेच संस्कृती प्रवाहित ठेवण्यासाठी करतात खर तर संस्कृती म्हणजे सर्वोत्तम मूल्यांचे अनुसरण होय.बदलत्या काळाप्रमाणे आज आपण खाणपान वेशभूषा रीतीरिवाज यामध्ये नको तेवढे  बदल केलेले आहेत.आणि हे बदल सर्वमान्य देखील आहेत.एकेकाळी स्त्रीनं पायात चप्पल घालण पायावर निरी सोडणं ,तोंडाची रंगरंगोटी करणं हे अकुलीनपणाचं लक्षण मानलं जात होतं.त्यावरूनच ‘पायावर निरी ती कसबीन खरी’, अशी म्हण पडली असावी. आजच्या चंदेरी दुनियेतील झगमगाटीच्या  युगात सांस्कृतिक कार्यक्रमान उत्तेजन दिल जातं. शाळा कॉलेजमधल्या  मुली चित्रपट आणि दूरदर्शन मालिकेमध्ये दाखवत असलेल्या मिश्र म्हणजेच  रिमिक्स संस्कृतीला संस्कृती समजू लागल्या आहेत.हळदीकुंकू सारखे कार्यक्रम म्हणजे  केवळ दरवर्षी चढत्या किमतीच्या साड्या आणि दागदागिने यांचीबायकांमधील आपापसातील स्पर्धा होय .अशा या चंगळवादी वृत्तीमुळे संपत्तीचा नको तितका हव्यास वाढतो. कुटुंबात सक्ख्या नात्यातही हेवेदावे मत्सर त्रागा वाढीस लागतो. परिणामी घराघरात कलह  वाढून कुटुंबसंस्था  मोडकळीस येत आहे.हे जर थांबवायचं असेल तर कुठलाही कार्यक्रम साजरा करताना अगदी साध्या पद्धतीनं करता आला  तर करावा. ज्यामध्ये जात लिंग धर्म भेद मुळीच असणार नाहीतच उलट त्यातून  सामाजिक एकोपा निर्माण होईल.

अलीकडे हळदी कुंकूसारखे सण राजकीय हेतूने केले जातात.ज्यामध्ये पक्षाची बळाबळ वाढवणे हाच हेतू असतो. अशा ठिकाणी सौभाग्यसुन्दरीसारखी स्त्रीच्या बाजारीकरणाला  उत्तेजन देणारी स्पर्धा असू दे की, फन्सी ड्रेस स्पर्धा त्याबरोबर सवाष्ण बायकांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमच आयोजन केल जातं .महागड्या वाणाची लुट केली जाते. पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून उपयोगी पडतील अशा बायकांना निमंत्रित केल जातं .काही गरीब गरजू स्त्रियांची मतदाराच्या संख्येत  भर पडावी म्हणून मोर्चेबांधणी केली जाते.हे करत असताना आपण एक जबाबदार नागरिक म्हणून ऐक्य निर्माण न करता सामाजिक विषमता निर्माण करत आहोत असं  कोणत्याही सुज्ञास का वाटू नये? आणि त्यात सहभागी होणाऱ्या  स्त्रियांनिदेखील आपला आत्मभिमान ,आत्मसन्मान  गहाण का टाकावा ? स्त्रीसक्षमीकरणाच्या आजच्या  युगात स्त्रिया आत्मनिर्भर झाल्यास नक्कीच अशाप्रकारच्या भूलभलय्यामध्ये  त्या अडकून पडणार नाहीत.पण  त्यासाठी स्त्रियांमध्ये जाणीव व जागृती निर्माण करणं  गरजेचं आहे.

आपल्या भारतीय सण परंपरा आणि अध्यात्म याचं अतूट नातं मानलं जातं. अध्यात्म प्रसार करणाऱ्या विविध संस्था अशा सणांच्या काळात आपल्या आध्यात्मप्रसाराठी पुस्तके आणि पूजासाहित्य च्या विक्रीवर भर देतात. ही विक्री करण्यासाठी बहुधा बहुजन स्त्रिया आणि लहान मुलांचा वापर केला जातो. हळदीकुंकू सणाच्या काळात सात्त्विक वाण म्हणून या वस्तू वाटल्या जातात. प्रत्यक्षात यावस्तुसाठीचा उत्पादन खर्च हा भाग जरी वगळला तरी त्या वस्तूंचा योग्य वापर केला जातो का याचाही विचार करण गरजेच आहे.ज्या आपण ती वस्तू वाण म्हणून देतो त्याची जर त्या आध्यात्मिक  गुरूंवर श्रद्धा नसेल तर हा निरर्थक कचरा साठत जातो.त्याबरोबर अनेक वृक्षांचेदेखील बळी जातात.असा साधा आणि सरळ विचार करण्याऐवजी पुण्यप्राप्तीसाठी श्रद्धेचा बाजार भरवला जातो. बरं हेही करणं मान्य केल जाईल पण  आध्यात्मात सांगितलेला साधेपणा मनाचं  औदार्य आणि त्याग यामध्ये दिसून यायला पाहिजे.पण त्याच्या ऐवजी सात्विक वाणांची लुट करणारी स्त्री आधुनिक वस्त्राभूषणानी नटलेली असेल तर हा जगण्यातील विरोधाभास नाही का?

एकूणच आजच्या काळात नोकरी करणाऱ्या बायका आणि कष्टकरी बायका वगळता गृहिणी म्हणून वावरणाऱ्या बायका तसं  पाहता तुलनेनं अधिक सुखासीन जीवन जगत आहेत.वेगवेगळे कौटुंबिक किंवा सामाजिक कार्यक्रम यामध्ये त्या गुंतलेल्या असतात. वाढदिवस, व  भिशी,,च्या पार्ट्या तसेच वेगवेगळ्या सहली, शिबीरं यामध्ये त्या अधिक उत्साहनं सामील होतात. अशा काळात विरंगुळा म्हणून किंवा सामाजिक स्नेहसंबंध जोडण्यासाठी हळदी कुंकूसारखा स्त्रियांमध्ये भेदभाव निर्माण करणारा सण परंपरा म्हणून किती गरजेचा आहे हे ओळखण्याची वेळ आली आहे. काही सुज्ञ  ग्रामीण व शहरी बायकांनी नवीन प्रथा पाडल्या आहेत. हळदीकुंकू समारंभ सार्वत्रिकरीत्या साजरे करणं हा त्यातलाच एक भाग म्हणावा लागेल .काहीजणी मिळून देणगी स्वरुपात त्या काळात काही सामाजिक संस्थाना दान करतात.असे उपक्रम निश्चितच स्वागतार्ह आहेत.समाजमन न दुखवता सामाजिक बदलाच्या दिशेन केलेली ही योग्य वाटचाल होय असं म्हणायला हरकत नाही.

आज आपणा सर्वांनाच स्त्रीपुरुष समानता हवी आहे. आणि याची सुरुवात ही शालेय शिक्षणापासून होते.घराघरातदेखील आज स्त्रीपुरुष समानतेचे धडे दिले जातायत. पण  हे सगळ स्त्रीला बाई म्हणून गृहीत धरूनच केलं  जातं.तिथे पुरुषी वर्चस्वाचा पगडा दिसतो. काहीवेळा मुली देखील खानदानाची रीत म्हणून या परंपरा आपल्यावर लादून घेतात. उदाहरणच द्यायचं झालं तर माझ्या शेजारची मुलगी वैद्यकीय शिक्षण घेतेय.पण हळदीकुंकवाला आईबरोबर साडी नेसून  दागिने घालून पारंपरिक पद्धतीन वाणांची देवाणघेवाण करते.आई पण अभिमानाने सांगते “आम्ही आमच्या मुलीला सगळे रीतीरिवाज शिकवलेत.”त्याच घरात मुलगा मात्र घरातील कुठलीच काम करत नाही.एवढंच नाही तर स्वत:चं  काम तो नीटनेटकं आणि वेळेवर करत नाही.अशा काळात शिकल्यासवरलेल्या मुलींनी पाठीवर शाबासकीची थाप मारून घेत परंपरेचं जोखड सांभाळत किती दिवस काढायचे?आणि म्हणूनच आजच्या शिकल्यासवरलेल्या मुलींनी बुद्धिनिष्ठ विचार करत विवेकाची कास धरली पाहिजे. अन्यथा आपण केवळ भारवाही होऊ.संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील एक ओळ इथे लागू पडते,”येरांनी वाहवा भार माथा” असा भार माथी घेऊन फिरण्यापेक्षा आपण स्त्रियांनी अर्थवाही होणं आज अधिक गरजेचं आहे.अन्यथा आपली स्थिती मध्ययुगातील बायकांपेक्षा वेगळी असणार नाही.

खरे तर स्त्री ही सर्जनशील आहे.ती मुलांना जन्म देते हि तिची नवनिर्मितीच आहे.तिच्यातील ही सर्जनशीलता टिकावी म्हणून हळदी कुंकू  लावून आणि ओटी भरून तिचा सन्मान केला जातो.लग्न नंतर पहिल्या पाच वर्षात जी वाणे देण्याची पद्धत आहे ती स्त्रीच्या शरीर्धार्माशी निगडीत आहेत म्हणजे तिचं सुफलीकरण असे म्हणता येईल.लग्नानंतर पहिल्या वर्षी मातीचा छोटा घट दिला जातो त्याला चिली पिली असे म्हटले जाते. हा घट म्हणजे थेट स्त्रीच्या गर्भाशयाचं प्रतिक मानला जातो. तसेच त्याचे दोन नग वाण म्हणून  दिले जातात .म्हणजे इथून पुढे मुला बाळांनी घरदार भरावे हा हेतू त्यामागे असतो.दुसऱ्यावर्षी कुंकू लुटलं जात.कुंकू म्हणजे रक्तवर्णी,रजोगुणाचं प्रतिक .स्त्रीच्या शरीरातील रक्त प्रवांहीत राहीलं तर जीवसृष्टी टिकून राहील,हाही त्यामागचा हेतू ..तिसऱ्या वर्षी  हिरव्या बांगड्या लुटल्या जातात.हिरवा रंग हा सृष्टीचा.स्रीमधील चैतन्यरस हा असाच आयुष्यभर टिकून राहावा हाच हेतू त्यामागे असतो.चौथ्या वर्षी नारळ लुटला  जातो.नारळ हे सुद्धा स्त्रीच्या जननप्रक्रीयेशी संबंधित असलेले फळ आहे . आणि पाचव्या वर्षी कंगवा लुटला जातो.कंगवा किंवा फणी याला बरेच दात असतात.यातून दोन अर्थ निघतात.तिचे दात टिकून राहावेत .म्हणजेच  सृष्टीबरोबर तिचा तारुण्य टिकून रहावं.म्हणजेच कंगवा हेही रजोगुणाचं प्रतिक आहे.एकूणच तिच्यातील सत्वगुणाबरोबर रजोगुणही  टिकून राहावा, म्हणून या प्रतीकात्मक वाणांची लुट केली जाते.पण आजकाल कुणीही याचा विवेकपूर्ण विचार करताना दिसत नाही.जास्तीत जास्त महागडी वाणं लुटण्यावर स्त्रियांचा भर दिसतो .

तरीदेखील एवढ्या सगळ्या परंपरांचा उदोउदो करणाऱ्या या बाजाराधिष्ठित  समाजव्यवस्थेमध्ये राहूनही काही संस्था  तसेच काही परिवर्तनाच्या वाटेवर चालणाऱ्या स्त्रिया बचतगटाच्या माध्यमातून लिंग, जात, धर्म, सहेव- अहेव असा भेद न करता हळदीकुंकूसारखे कार्यक्रम साजरे करतात.त्यातीलच एक चंदगडच्या भार्ताक्का केवळ सातवी पर्यन्त शिकलेल्या बाई आहेत.तरीदेखील आपल्या बरोबरीच्या सगळ्या कष्टकरी स्त्रियांना परंपरांचे नवीन धडे देत आहेत.अपवादानं का होईना काही अल्पशिक्षित बायकांमध्ये बदल दिसून येतोय, ही जमेची बाजू आहे. तसेच आम्ही भारतीयसारख्या मंचावरून सावंतवाडीच्या  नीला आपटे सर्वधर्म समभावाची आणि सहिष्णुतेची शिकवण देणारा हळदीकुंकू कार्यक्रम तळ्याच्या काठी मोकळ्या जागेवर अगदी साध्या पद्धतीन वाणांची देवाणघेवाण न करता करतात .तसेच शहरीकरणाबरोबर काही ठिकाणी शहरात हळदीकुंकूसारख्या कार्यक्रमांचे बदलते पाठ अनुभवास येतात.गरजू आणि गरजवंत  विद्यार्थी अनाथ मुले पीडीत स्त्रिया यांना मदत करणारे बरेच  स्त्रीहात पुढे सरसावतात.म्हणजेच मोकळ्या अवकाशात वावरताना बायकांनी श्रद्धेला आणि परंपरेला आधुनिकतेची जोड दिलेली आहे.या सगळ्यातून नक्कीच बदलत्या भारतीय संस्कृतीचा एक मानवतावादी चेहरा नजरेस पडत आहे.

 

श्वेतल अनिल परब
सावंतवाडी
9423301892

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *