अनोळखी बेटावर – श्वेतल परब 

अनोळखी बेटावर – श्वेतल परब 

बोर्डाची पेपर तपासणी सुरू होती. त्या गडबडीत नयनाचा फोन आला. “शमा, तू वेळात वेळ काढून उद्या माझ्याकडे येऊन जा, मला तुझ्याशी बोलायचं आहे.”

“अगं, पण तुझी तब्बेत कशी आहे? मला बरेच दिवस तुझ्याशी बोलता आलं नाही. सॉरी. बघते मी उद्या येण्याचा प्रयत्न करीन.”

“प्रयत्न नको शमा. तुला यांवच लागेल.”

“का गं?” मी थोड्या अधीरतेने विचारलं.

“भेटल्यावर सांगते.”

रात्रभर मी जागी होते की स्वप्नात काय माहीत नाही. पण मला डोळ्यासमोर नयना  दिसू लागली. आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकलो.एकमेकांशी स्पर्धा करत पुढे पुढे गेलो. मी नोकरीला लागले. ती गृहिणीच राहिली. तिच्याशी माझी मैत्री होती पण अभ्यासापूरती. तशी नयना अबोल. तिने माझ्यासमोर कधीच आपलं मन मोकळं केलं नाही. ती एकांतात बसून वाचन करत बसायची. “किती गं वाचशील नयना?”

“हो ना, याला कधी अंत नाही. आपल्याला अंत आहे, म्हणून आपण जेवढा वेळ आपल्या वाट्याला आला तेवढा सत्कारणी लावायचा.”

तिच्या त्या अशा वागण्यामुळे कुणी फारसं तिच्याकडे फिरकलंच नाही. तिची मैत्री काय ती विश्वासशी जमली. त्यांना कोणत्या तरी बेटावर जाऊन राहायचं होतं. ते बेट दूर कुठेतरी आहे. तिथे त्यांच्यासारखीच माणसं जाऊन रहातात. हे असं वेड्यांसारखं त्यांनी सांगावं आणि मी ऐकून घ्यावं, असं चालायचं.

दुसरा दिवस उजाडला. आणि कॉलेजमध्ये जायच्या गडबडीत सकाळी नऊ वाजता फोन नयनाचा. फोनवर नयना बोलत नव्हती. दुसराच कुणा पुरुषाचा आवाज. नयना तुम्हाला आता भेटणार नाही. तिने तुम्हाला पत्र ठेवलंय. वेळ मिळाला की घेऊन जा. नयना कुठल्या बेटावर गेली असेल याचा विचार करत मी फोन खाली ठेवला. आता डोक्यात नयनाशिवाय काहीच रिघत नव्हतं.

नयनाचं गांव तसं सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं. छोटसं गांव त्या गावात जायचं म्हटलं तर तालुक्याच्या ठिकाणाहून सुरू होणारा सपाट डांबरी रस्ता अगदी दहा किलोमीटर पर्यंतचा. त्यानंतर सुरू होतो तांबड्या मातीचा रस्ता. त्या रस्त्यावरून मोटारसायकलने जायचं म्हटलं तर, बायकांच्या नवीन कोऱ्या करकरीत साड्यांचा मूळ रंग कोणता हे ओळखणं कठीण ! गावात नवीन लग्न करून आलेल्या बायका बांधकाम खात्याला आणि नवऱ्याच्या गावातील सरपंचाला ठेवणीतल्या शिव्या हासडल्याशिवाय रहात नाहीत. त्या गावात शिकणारी पोरं, शहराला लागून अससलेल्या पाहुण्यांकडे शिकून मोठी झालेली. गांव तसं समृद्ध. एकाच भाऊबंदकीच्या गोतावळ्यात विस्तारलेलं. नयना त्याच गावची.

नयना अभ्यासात हुशार. पहिली ते चौथीपर्यन्त तिची शाळा त्याच गावात झालेली. चौथीत पहिला नंबर. घरात सगळ्यांच्या कपाळावर आठ्या !

“पोरीच्या जातीला शिकवून काय उपयोग? काही कामधाम शिकवलं तर कुणी आपल्या पदरात पाडून तरी घेईल,” आई डोक्यावरचा पदर घट्ट ओढून घेत नवऱ्याला म्हणाली. नयना कोपऱ्यात बसून खुसूमूसू रडू लागली. तिच्या वर्गातली चारू साठे मुंबईत काकांकडे शिकायला जाणार होती. तिथे तिला खूप पुस्तकं वाचायला मिळणार होती. नयना आपल्या पुस्तकांना छातीशी कवटाळत रडू लागली. तिच्याकडे कुणाचं लक्ष गेलं नाही. तिचा बाप बाबू खाली मान घालून दोऱ्या वळत बसला. दुसऱ्या दिवशी पांच झाडू शेजारच्या गावात द्यायच्या होत्या.

संदीप नयनाचा चुलत भाऊ. एस. एस. सी. पास होऊन कारकून म्हणून नोकरी करत होता. तो गजा गावकरांकडे गेला.  गजा गावकराशिवाय गावात कुणाचं इकडचं पान तिकडे हालत नसे. शेजारच्या परसदारात केळीचं झाड लावायचं म्हटलं तरी, गजाला सांगूनच लावलं जाई. एवढी गजाची हुकमत आपल्या जातभाईंवर होती. अर्थातच सगळ्यांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यात त्याचा स्वार्थ कुठला असेल तर, तो सुपारी पानापुरता.

“गजाकाका, नयनाचो पयलो नंबर इलो, तेकां फुडच्या शिक्षणाक पाठवक होया,” दाढीवर हात फिरवीत नयनाचा चुलता दाजी बोलला.

“फटकी एव दे तेच्या बापाशीर, मेल्याक हुशार पोरांक शिकवक येना नाय. ह्या दरीदऱ्याच्या पोटात ही सरस्वती खुयसून जन्माक इलीव,”  गजा कचकन शिवी हासडत उजवा हात हलवत बोलला.

गजा वाकड्यांत बोलला तरी मनात पाप नसलेला माणूस. त्याने  आपल्या भावकीला सांगून नयनाला शहरात शिक्षणासाठी पाठवलं.

दहा वर्षे उलटली. नयना घरी आली नाही म्हणून नयनाच्या आठवणीने आईने अंथरूण धरलं. “शिका दे तेकां किती शिकता तितक्या. एकदा काय हय हाडलू काय हुयल्या थुयल्या पावण्यासोयऱ्यांची नजार पडतूली. ऱ्हावांदे तेकां थियच,” बाबूने बायकोची समजूत काढली.

नयना शहरात शिकत असताना शहरातील समृद्धीचे वारे तिच्याही कानात घुमू लागले. स्पर्धा परीक्षांसाठी तडफडणारी मुलं शहरात जागोजागी दिसू लागली. त्यांच्या संगतीत राहून अभ्यास करणारी नयना शिकवणी मार्गदर्शन वर्गांना जाऊ लागली. पुस्तकांसाठी पैसे नाहीत म्हणून मित्र मैत्रीणिंचि पुस्तकं घेऊन अभ्यास करू लागली. त्यातच तिचा परिचय विश्वासशी झाला. तोही तिच्याच तालुक्यातल्या गावातला. शहरात शिक्षणासाठी आलेला. तिच्या शिक्षणासाठी तो खर्च करू लागला. दोघेही अभ्यासात मेहनत घेत होते. विश्वास पहिल्या फटक्यातच एम. पी. एस. सी. उत्तीर्ण झाला. नायब तहसीलदार म्हणून नोकरीला लागला.

पदवीधर होऊन दोन वर्षे उलटली नयना गावी परतली नाही. गावात चर्चा सुरू झाली. तिला शिक्षणासाठी पैसे पाठवायचे गावकऱ्यांनी बंद केले. गावात जातपंचायत भरली. सगळ्यांच्या एकमताने नयनाला गावी परत आणायचे ठरले. तीन चार स्थळं भावकितल्यांनी बघून ठेवली होती. नयना गावी आली की तिचा बार उडवून टाकायचा असं ठरलं.

गजा म्हणाला, “ही अशी पोरा गांव सोडून शहरात जावक लागली. आमची रीतभात विसरांक लागली, तर आमच्या जातीक बाट लागतलू. दुसऱ्या कोणाच्या नादाक लागाच्या आधी तेकां हय आनुक होया.”

यावर सगळ्यांचं एकमत झालं. रात्रभर नयनांच्या बाबांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. “नक्की, आपला नयना शिकता मा? काय दुसराच कायतरी. पोराची दखल घेवक थुय कोण नाय. काय बरा वायट पावल उचलल्यान तर, आमच्या डोंगरेकरांसारखे वायट कोण नाय. सगळे तुटान पडतील तेच्यार आणि आमच्यार देकुल.”

नयनांच्या आईला आदल्या दिवशी स्वप्न पडलं . सगळ्या गावकऱ्यांनी त्यांना वाळीत टाकलं म्हणून. नयना कुणा परक्या जातीतल्या मुलाबरोबर पाट लावून पळून गेली. आता गावात तोंड दाखवायला नको. असं म्हणत रडत पुटपुटत नयनाची आई जागी झाली. तिने अंथरुणातून उठून पाहिलं तर पहाटेचे चार वाजलेले. नेहमीच कोंबडा आरवलेला. बाहेर खाटेवर झोपलेला म्हातारा सासरा दांडा घेऊन इराकतीला गेलेला. त्यांच्या दांडयाची टकटक पहाटेच्या नीरव शांततेत तिच्या कानात पडली.

अनोळखी बेटावर - श्वेतल परब 
अनोळखी बेटावर – श्वेतल परब

नयनाला आणायला पांच सहा गावकरी शहरात गेले. तिच्यासाठी हा अनपेक्षित धक्का होता. ती नुकतीच कॉलेजमधून खोलीवर आलेली. “दोन चार दिवासांवर परिक्षा आलीय. आता एक मिनिटदेखील वाया घालवून उपयोगाचं नाही. दोन वेळा मला अपयश आलं. आता यावेळी तरी.. .. नाहीतर घरच्यांना काय सांगू. गावात मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवायचं बंद करतील. विश्वास नोकरीला लागला. त्याला मी लग्नाला होकार दिला खरा. पण आमची जात त्याच्यापेक्षा उच्च. गजाकाका काय म्हणतील? विश्वासला काही धोका तर नाही ना? तो त्यांच्या आईबाबांचा एकुलता एक मुलगा. जात्याच हुशार. त्यामुळे घरकुटुंबात लाडावलेला. त्याला कुठलाच त्रास होता कामा नये.”

नयना आपल्या खोलीतील पसारा आवरायला लागली. तेवढ्यात गजा काका ओरडले, “नयना आमका सकाळी पांच वाजासार पोचाचा आसा हयसून घरांक जावक धा तास लागतील. बेगीन आटप.  लवकर यांवर. तुझा काय सामायन ऱ्हावला तर मागसुन न्हेवक येयत.”

खोलीला कुलूप लावताना नयनाच्या डोळ्यातून टपटप पाणी गळायला लागलं. हे पाणी का येत असेल माझ्या डोळ्यात? ही खोली शहर सोडून जायचं म्हणून की विश्वासशी जुळलेली मैत्री तुटणार म्हणून? आणि मी घरी गेल्यावर मला पुन्हा पाठवलं नाही तर? विश्वासशी प्रतारणा केल्यासारखी होईल. तेवढ्यात शेजारच्या साठेकाकू आल्या, आणि कोड्यातच बोलल्या, “नयना, हे सगळं आता तुलाच समजून घ्यायला पाहिजे. सावित्री बाईंकडून काय शिकलीस ते विसरू नकोस.” नयनाने आश्वासक नजर काकूंवर फिरवली.

गजा काकांसमोर नयनाचे बाबा कोकरू कसे वागत होते. ते सांगतील ते निमूटपणे ऐकत होते. गाडीत गावात आपली जात बिरादर कशी मोठी, आपलं देवस्थान कसं जागृत अशी चर्चा चालली होती. आपला गांव दारूनशेपासून वर्षानुनवर्षे कसा अलिप्त आहे. आपल्या पोरी कशा सोज्ज्वळ, आपल्या शब्दाच्या बाहेर नाहीत. असं सगळं बोलणं चाललं होतं. नयना खाली मान घालून वंशशुद्धी, वंशसातत्य यावर विचार करू लागली. आपले ऋषिमुनि ज्यांचं आपण गोत्र लावतो, त्यांनादेखील अप्सरेची भुरळ पडलीच ना ! त्यांना झालेली संतती वंशशुद्धीच्या कुठल्या प्रकारात मोडते ? त्या कंजारभाट समाजात योनीशुचित्वाच्या मुद्द्यावरून स्त्रियांचा किती छळ केला जातो? आपली ही संकुचित मानसिकता कधी बदलणार ? माझ्यात एवढं बळ येईल का, की ह्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन आंतरजातीय विवाह मी करू शकेन?

गाडी गावाच्या वेशीवर पोहोचली. ड्रायवरने गाडीचा ब्रेक अचानक करकचून दाबला. गाडीत निवांत विसावलेले लोक खडबडून जागे झाले. काय झालं लव्या? गजा काका बोलले. ते गांव डोंगराच्या पायथ्याशी असल्याने, रानटी जनावरं वाहनांना धडकत  असतात. तसाच एक गवारेडा सुसाट धावत धावत गाडीच्या समोर आला. गाडी उलटणार असती ती थोडक्यात वाचली. “बघितलात, आमच्या गावच्या हद्दीत इल्यार आमच्या देवान दाखवान दाखूवल्यान. काय तरी बिघडला आसा,” गजा काका म्हणाला. गजा काकासमोर मान वर करून बोलायची कुणाची हिम्मत नव्हती. नयनाला वाटलं, गवारेडा समोरून गेला, हा अपशकून कसला? हे काय इथे आपल्या गावात नवीन नाही. असे कित्येक प्राणी इथून जात असतात. पण ती त्या सगळ्या जाणत्या पुरुषमंडळीसमोर काहीच बोलली नाही.

नयना घरी पोहोचली. गांव सोडल्यावर बरोबर बारा वर्षे झाली होती. पण गावात आणि गावांतील माणसात एक तसूभरही फरक झाला नव्हता. सगळी घरं जशास तशी कौलारू, घराभोवती झाडांची दाटीही तशीच, त्याच पाणंदी आणि तेच रस्ते, खड्डे, माती आणि धूळ. त्याच लोकांच्या त्याच त्याच गजाली. “आयकलय गो वंदू, गजाभावोजी त्या नयनाक यकायकी घेवन इले. काय तरी भानगड आसा.”

“अगो होय, ता यवक बघि नाय होता, कोनाबरोबर तरी लगीन न्हावक बघू हुता.” गावात कानाला कान लागायला लागले. संपूर्ण गांव एकाच जात बिरादरीच्या माणसांचा असल्याने सगळे पुढे काय, म्हणून वाट बघायला लागले. रात्री जेवणं आटोपल्यावर सगळीकडे सामसुम झालं. तेवढ्यात गजाकाका आणि पंचमंडळी नयनाच्या घरी आली.

“ये बाबू, नयना खय ? तेकां भायर बोलवण आण. काय झाला?  आमचो तो पप्पू सांगता नयनाचा भायल्या जातीतल्या कोनाबरोबर काय तरी आसा. तेनी एक दोनदा तेकां त्या पोरांबरोबर बघल्यान.”

बाकीचे  सगळे गावकार म्हणाले. “होय, होय, तेकां खरा काय खोटा ईचारुया.”

नयना न घाबरता बाहेर आली. तिच्या हातात ना बांगड्या ना कपाळावर कुंकू होतं. तिला त्या अवस्थेत बघून गजाकाका म्हणाले, “आमच्यात असला चालना नाय. आपली रीतभात पोरींनी सांभाळुक होई. जा आधी पायला, कपाळाक पिंजर लावण ये.”

नयनाच्या आईने चटकन कुंकवाचा करंडा आणला आणि तिच्या कपाळावर कुंकू लावलं.

“नयना तुका आम्ही जा काय ईचारुक इलव ता तुझ्या लक्षात इला आसात. आता आईक जो कोण पोरगो आसा तेकां दोन दिवसांत हय आमच्या समोर उभो कर. आमच्या जात बिरादरीत बसणारो आसात तर आम्ही लगीन लावन देव.”

नयना आपल्या बाबांच्या डोळ्यात डोळे घालून बघायला लागली. त्यांची मान शरमेने खाली गेली. जणू काही नयनाने गावात त्यांची बेअब्रू केली. “बाबू, तुझ्या चडवाक समजव. आम्ही तेकां शिक्षण दिला, ह्या इसरा नकू म्हणून सांग,” गजा घोगऱ्या आवाजात बोलला. त्यांच्या बोलण्यात संताप भरलेलाहोता. बोलताना त्यांच्या मिशा फुरफुरत होत्या.

आगली मागली माहिती न विचारता ही आपली माणसं विश्वासला बोलवायला सांगतात. तो आला आणि या गावकऱ्यांनी त्याला झोडपून काढलं तर? नाही त्याला सावध केलं पाहिजे. ह्या गावात आधी तशी प्रकरणं घडली होती. कुणाच्या मानेवर सुरा न फिरवता जात बिरादरीसमोर आणून त्याच्याकडून, ‘पुन्हा ह्या गावात पाऊल टाकणार नाही, पोरीबाळींच्यावर वाईट नजर टाकणार नाही’ असे वदवून घेतले जात असे. उद्या विश्वास आला की तसेच होणार. नयनाने विश्वासला फोन केला. विश्वास महसूल अधिकारी म्हणून नवनियुक्त झाला होता. नयनाच्या आग्रहास्तव तो दोन दिवसाची रजा टाकून आला.

नयनाच्या गावी येण्याचा त्याचा हा पहिलाच प्रसंग. विश्वास जवळच्या शहरात एका लॉजवर मुक्कामाला राहिला. तिथे नयनाच्या गावातला पोरगा कामाला होता. बारीक , हडकुळा, गोरेला आणि केस पिंजारलेला मुलगा बघून विश्वासला त्याच्या परिस्थितीची कल्पना आली. विश्वासने त्याला विचारलं, “तुमच्या गावात जाण्यासाठी वाहनांची सोय का? मला संध्याकाळी परत यायचं झाल्यास परतीचं वाहन मिळेल का ?” तो पोरगा म्हणाला, “तुमचा आमच्या गावात काय काम ता सांगा. नंतर कसा जावचा मी तुमका सांगतूय.”

विश्वासने त्याला  आपली सगळी हकिगत सांगितली. तो पोरगा कान टवकारून सगळी माहिती ऐकत होता. त्याचा आपल्या देवावर आणि जात बिरादरीवर पुरा विश्वास होता. त्याने लगेच गावच्या सरपंचाला फोन केला. सरपंच महाशय म्हणजे नयनाचे चुलत काका. त्यांनी पाच दहा तगडी पोरं आधीच बोलावून ठेवली. विश्वासला गावात न्यायला एक रिक्शा पाठवण्यात आली. त्याला खूप आनंद झाला. आपलं खूप जंगी स्वागत होईल. पण गावात पाऊल टाकल्यावर सगळीकडे स्मशान शांतता. गावातल्या मध्यभागी असलेल्या पिंपळाच्या पारावर गावातली टवाळखोर पोरं हातात मोबाइल घेऊन बसली होती. रिक्षावाल्याने विश्वासला नयनाच्या घरी न सोडता गांव चावडीवर, त्यांच्या कुलदैवतेसमोर सोडलं.

गावकरी आणि गजाकाका मिशीवर हात फिरवत, लेंगा सदरा घालून तिथे गोळा झाले. आणि इकडच तिकडचं काही न विचारता थेट सौदा करायला लागले. “आमची नयना भोळी आसा तेकां बऱ्या बोलान सोडचिठ्ठी दे नाहीतर आम्ही जे काही करू त्या परसंगाला सामोरे जायला तयार रहा.” विश्वासने ओळखलं ही खेडूत माणसं अंगापिंडानी पोसलेली ह्यांच्याशी एकाचे दोन हात करणे कठीण. नयनाला बोलावून सगळ्यांसमोर भांडाफोड केलेली बरी.

नयनाच्या घरी नयनाला तिच्या बाबांना आणि आईला निरोप पोहोचला. गोरा हडकुळा सुकल्या चेहऱ्याचा बाबू डोळ्यात पाणी आणून पोरीला सांगू लागला. “त्या संगळ्यांसामोर माका खाली मान घालुक लाव नको.” नयना काय समजायचं ते समजली. देवळासमोरचा भव्य मंडप, समोरची दीपमाळा आणि दिपमाळेवर असलेलं बुलबुल पक्ष्यांचा घरटं विश्वासच लक्ष वेधून घेत होतं. पण आता कुठल्यातरी निर्णायक क्षणी आपण आलो आहोत यांची कल्पना त्याला आली. कपाळावरचा घाम रुमालाने टिपत असताना त्यांची नजरानजर नयनाशी झाली. पण नयनाचा चेहरा नेहमीसारखा त्याला दिसला नाही. दोन चार दिवसांत तिचा चेहरा अगदी पांढरा फटक पडला होता. विश्वासचा विश्वास गळू लागला. आता ह्या लोकांसमोर नयना बोलली नाही तर?

गजाकाका गावातील मुख्य गावकार पायाची घडी घालून देवळाच्या समोरच्या अंगणात मधोमध खुर्ची टाकून बसला. सगळे तिरायत आणि गावकरी गोळा झाले. त्यात जाणत्या बायकाही डोक्यावर पदर घेऊन तिथे आल्या.

तिथल्या एका लांबलचक दगडी सोफ्यावर विश्वासला बसवलं. नयना बाबांच्या डोळ्यातील भाव आपल्या नजरेने हेरू लागली. सगळ्यांसामोर सत्य काय ते सांगून मोकळं व्हावं असं तिने ठरवलं.  पण नयनाला कुणीच प्रश्न केला नाही. सगळे गावकरी आळीपाळीने विश्वासवर बंदूक रोखून धरू लागले. आता आपल्या डोक्याच्या ठिकऱ्या उडणार वाटतं. या गुडघ्यात अक्कल असलेल्या बिनडोक्याच्या माणसांसमोर जपून बोललं पाहिजे, म्हणत विश्वास एकेक शब्द फेक जपून करू लागला. नयनाचं आणि माझं प्रेम आहे. आम्ही दोघे एकमेकांस अनुरूप आहोत. त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांशी लग्न करणार.

“लग्न कोणासंग आणि कोण करणार, हे आम्ही ठरवतलू. तू बऱ्या बोलान हुसून भायर पड,” एक आडदांड पिळदार शरीरयष्टी असलेला माणूस म्हणाला.

“ए, तो तसा सांगाण आयकाचो नाय. तेचे हात पाय तोडतलू म्हणून सांगा तर तो आयकतलो,” दुसऱ्या एका दाढी वाढवलेला इसम छाती पुढे काढत म्हणाला.

“तुझी जात आणि आमच्या जातीचा जुळायचा नाय. आजपातूर आमच्या जातीतल्या एकानव भायल्या जातीतल्यावांगडा लगीन करुक नाय. आमची जात बाटतली.”

“आमच्या गावाक बाटगे म्हणतले. हेच्या पुढे आमच्या गावात कोण पोरा देवचे न्हाय.”

“ए तुम्ही सगळे वायच थंड ऱ्हावा, हयो शहरी इषाणू आसा. हेचा काय करुचा ता मी बघतूय,” गजा गावकार तोंडांतला पानाचा तोबारा थुंकत म्हणाला. त्याने बाजूला बसलेल्या सोम्याच्या कानात कायतरी सांगितलं.  दोघांनीही माना डोलावल्या. खिशातला चेकबूक बाहेर काढत गजा म्हणाला. “हे घे दोन लाख रुपये, तू जे आमच्या नयनावर खर्च केलेस ते, आणि तेका तुझ्या शब्दातून मोकळा कर.”

विश्वासने किती विनवण्या करून बघितल्या. शेवटी गावकरी पैसे वाढवत वाढवत पांच लाखावर आले. विश्वास म्हणाला मला तुमचे पैसे नकोत. ते सगळे पैसे नयनाच्या लग्नाला खर्च करा. सगळे अचंबित झाले.

इकडे नयनाच्या मनाची घुसमट होत होती. हे तर ऑनरकिलिंग आहे! विश्वासपासून मला तोंडणं यांना इतकं सोपं वाटतं? असा कुठला धर्म आणि जात आहे, ज्यात प्रेमाची भाषा शिकवली जात नाही. दोन जीवांना अलग करून प्रेम तोडता येत नाही. हे सगळं मी माझ्याच रक्ताच्या माणसांना कसं सांगू. आणि त्यांचं तरी काय चुकतं? वर्षानुवर्षं ही माणसं ज्या मातीशी इमान धरून आहेत. त्या मातीशी ते इमान राखण्याचा प्रयत्न करतायत. मी लहान असताना माझी एक चुलत आत्या एका परजातीतील मुलाबरोबर पळून गेली, तेव्हा तिच्या वडिलांनी आणि आईने दोघांनीही धरणात जीव दिला. त्या धरणावर गावातलं कधीच कुणी जात नाही. ती भीती अजूनही सगळ्यांचा पाठलाग करत आहे. मुली वयात येतात प्रेमात पडतात. पण पुढे त्यांचं काय होतं? याचा कुणी शोध घेत नाहीत. आणि आज वरवर साध्या दिसणाऱ्या बाबांच्या मनात उद्या विश्वासच्या जातीमुळे कशावरून वाईट विचार येणार नाहीत? आपल्याच भाऊबंदानी वाळीत टांकल्याचं दु:ख त्यानं मोठं वाटेल की, त्यांची मुलगी आणि जावयाच्या मरणाचं? कुठला शाप भाळावर घेऊन मिरवणार आहेत ते, कोण जाणे.

गावकऱ्यांच्या चेहरे संतापाने लाल झाले. लग्नाच्या माळेची फुलं एकामागोमाग एक गळून पडावीत तसं झालं. गजाने सगळ्यांना खुणावून शांत केले. देवळाच्या आवारात क्षणभर शांतता पसरली. तेवढ्यात गजा म्हणाला. “तुका आमी जावक देताव,पण पुना हकडे वळाण बघलंस तर, आम्ही आणि आमचो गांव जा काय बघून घेवचा ता बघून घेव .”

विश्वासचा एकमेव आधार म्हणजे नयना. तोही कमकुवत ठरला. तो कुणाशी काही न बोलता रिक्षात बसला. त्यांची पाठ फिरताच नयनाला सगळ्यांनी धमकी दिली,  “ह्या देवाच्या पायाक हात लावण सांग, तू आता त्या पोराक कायमचा इसारतलू. नायतर आतापासून बाबूच्या घरार आमची कायमची पाठ फिरतली.”

नयना बहिष्कारच्या भीतीने देवाची शपथ घेऊन देवळातून बाहेर पडली. घरी गेल्यावर तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले. गावातील सगळ्या लोकांनी तिच्यावर पहारा ठेवायचा ठरवलं. ती जिथे जाईल तिथे तिच्या घरची आणि शेजारची सोबत असत. नंतर पंधरा दिवसात तिचं लग्न ठरलं. विश्वासचा फोन ब्लॉक करण्यात आला होता. एका श्रीमंत मुलांशी नयनाचं लग्न लावून देण्यात आलं.

विश्वास त्या घटनेनंतर पार खचून गेला. आपण अधिकारी पदावर कार्यरत असताना केवळ जातशुद्धी राखण्यासाठी आपल्यावर सामाजिक दबाव आणण्यात आला, हे तो विसरू शकला नाही. लग्नाच्या बेडीत आता अडकण नको म्हणत तो बिन लग्नाचा राहिला. त्याची तब्बेत खालावत गेली. शरीर वेगवगेळ्या आजारांनी जर्जर झालं. नयना तर लग्नानंतर पार खचून गेली. तिच्या नवऱ्याने अनेक प्रकारे तिला सावरण्याचा प्रयत्न केला. तिला परदेशवारीलाही घेऊन गेला. तिला काय आवडतं काय नाही याची विचारपूस करत राहिला. तिच्यासाठी फार्महाऊस खरेदी केलं. तरी नयनाची तब्बेत बिघडत गेली.आणि लग्नानंतर वर्षभरात नयना ब्लडकॅन्सरने मरण पावली.

सूर्य अस्ताला गेला. मी वाळूवरून उठत समुद्राच्या पाण्यात हात धुतले. समुद्राच्या पाण्याचा रंग अचानक बदलत लाल लाल होत गेला. मी रत्नाकराला विचारलं,  “हे रत्नाकरा, सगळ्या माणसांचं रक्त असं एकच असताना, माणसं अशी हाडवैर धरून आपल्या जवळच्या माणसांचा बळी का घेतात?”

माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नसेल, कारण बरं वाईट सगळं सामावून घेणारा तो, क्रूरकर्मी माणसांची नियत जाणून आहे.

 

श्वेतल अनिल परब
सावंतवाडी
9423301892

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *