आणखी एक दिवस बाबा ! – श्वेतल अनिल परब

आणखी एक दिवस बाबा !

“ बाबा आज तुम्ही कुठेच जायचं नाही. आज आपण सर्वांनी बाहेर कुठेतरी फिरायला जायचंय” सुजय आपल्या बाबांना म्हणाला. बाबांना आश्चर्य वाटलं.सुजय एवढा अधिकारवाणीने आज का बोलतोय.हे त्यांना कळले नाही.  “काय रे काय आहे आज”, त्यांनी विचारलं. पण सुजयने आपल्या मनातलं गुपित बाबांना कळू दिलं नाही.तो दिवस होता जून महिन्यातील तिसरा रविवार. म्हणजे १९ जून.फादर्स डे.दिवसभर सुजय आणि त्याचे कुटुंब समुद्रकिनारी जाऊन मस्त मनमुरादपणे फिरून आले. आणि सुजयने बाबांना त्या दिवशी काही करू दिलं नाही.त्याची आई आणि तो दोघांनीही  पूर्ण दिवस बाबांना तणावमुक्त ठेवलं.पण प्रश्न असा आहे की फादर्स डे युरोप अमेरिकेमध्ये जसा साजरा केला जातो तसा भारतात साजरा करण्याची गरज आहे का ?भारतामध्ये मातृदेवो भव| पितृदेवो भव | आणि गुरुर्देवोभव |अशा शब्दांमध्ये माता पिता आणि गुरु यांना वंदन केलं जातं.इथेसुद्धा पहिलं वंदन मातेला करण्याची प्रथा रूढ असल्याचे आपल्या निदर्शनास येते.मग कुणी म्हणत पित्याने काय घोड मारलं आहे?खरं तर हा विचार करण्यासारखा मुद्दा वाटतो.कारण भारतासारख्या पितृसत्ताक समाजव्यवस्थेमध्ये खरोखरीच बाप दुय्यम आहे का? आणि तो कशा अर्थाने ? यामागे कोणती मूलगामी प्रवृत्ती आहे, हे आपणास अगदी मातृसत्ताकापासून ते आजपर्यंतच्या काळाचा विचार केल्यास लक्षात येईल.

भारतीय संस्कृतीचा विचार करताना आपल्यासमोर येते ती मातृसत्ताक समाजव्यवस्था ,ज्यामध्ये पुरुष हा केवळ वंशवृद्धीचं साधन होता.मुलांना जन्म देऊन त्यांची जबाबदारी मातेवर सोडून, तो दुसरीकडे स्थलांतर करत असे. शिकारीचा नाद असल्याने त्याचा जंगल दऱ्याखोऱ्यात वावर असे.त्याकाळी कोणतेही लैंगिक बंधन मुक्त समाज असल्याने आणि विवाह व्यवस्था अस्तित्वात नसल्याने बाप हा जबादारीमुक्त आणि स्वैर असायचा .अर्थातच त्याकाळात स्त्रीवरदेखील  बंधने नव्हती.मुलं ही बापाच्या नावाने ओळखली  जात नव्हती.अशा काळात स्त्रिया मातृकुलात राहत असल्याने बापाचे स्थान हे मुलांसाठी आणि समाजात  दुय्यम होते.त्या मातृकुलात स्त्रिया आणि मुले शेती करत असत.त्यातील तरुण मुलगे घरातून निघून जात, त्यामुळे मुलांच्या मनावर बाप नावाच्या माणसाचे संस्कार होण्याचा प्रश्नच नव्हता.स्त्रिया मुलांच्या मदतीने शेतीवर आपली उपजीविका करत.एकूणच माणूस हा आदिम अवस्थेमध्ये असल्याने निश्चित अशी नितीमुल्ये त्याला बंधनकारक नव्हती.नंतर जेव्हा ती मातृकुळे एकत्र राहायला लागली तेव्हा, त्यांच्यावर विशिष्ट अशी सामाजिक बंधने लादण्यात आली.विशिष्ट मातृकुळांचे ठराविक नितीनियम बनवण्यात आले.निसर्गत:च स्त्रिया हळव्या आणि संवेदनशील असल्याने काही स्त्रिया पुरुषांच्या गृहत्यागावर बंधने आणू लागल्या.साहजिकच पुरुष हा त्या कुळाचा एकमेव मालक बनत गेला.जसे स्त्रीला आपला साथीदार सोडताना दु:ख होऊ लागले तसे, काही पुरुष बाप झाल्यावर त्यांना आपल्या मुलांना सोडून जाताना बापाची वेदना जाणवू लागली.तेव्हा त्या कुटुंबात बापाचं असं स्वत:चं स्थान निर्माण झालं.मुलं बापाच्या आज्ञेत राहून त्याला शिकार किंवा अन्य प्राथमिक व्यवसायात मदत करू लागली आणि मुळात वंशवृद्धीचं साधन असलेला बाप कुटुंबप्रमुख बनला.

आणखी एक दिवस बाबा ! - श्वेतल अनिल परब
आणखी एक दिवस बाबा ! – श्वेतल अनिल परब

कला साहित्यातून जशी आईची आदर्श प्रतिमा कवी लेखकांकडून  घडवली गेली तशीच, कादंबरी  कथा कविता निबंधातून  बापाचीदेखील  आदर्श प्रतिमा घडवली गेलीय हे आपल्या वाचनात आल असेल.ते वाचत असताना कळत नकळत आपल्या मनात बापाची एक विशिष्ट प्रतिमा तयार होते.पुरुषार्थाच्या चारी  चौकटीमध्ये बसणारा बाप आणि त्याचा जीवनपट समोर उलगडत असताना डोळे पाणावतात.कवी इंद्रजीत भालेरावांचा शेतकरी बाप,नरेंद्र जाधवांचा कष्टकरी बाप किंवा विठ्ठल कामतांचा व्यावसायिक बाप असू दे या सगळ्या आसामी वाचकाला नक्कीच गहिवर आणल्यावाचून राहत नाही .खेड्यात  एकत्र कुटुंबात वावरणारा बाप हा त्याहून वेगळा असतो. माझे आणि मी याच्यापलीकडे गेलेली त्यांची नि:स्वार्थ  बुद्धी , दिलदारपणा, समजूतदारपणा. सोशिकपणा. प्रसंगावधानता खंबीरपणा.अविचलता, सहिष्णुता,संवेदनशीलता .परोपकारी वृत्ती आपल्याला स्तंभित करते.याला काही कर्मठ प्रवृत्ती  अपवाद असतीलही. तरीदेखील  आजही आधुनिकीकरण शिरलेल्या  खेडेगावातील  बाप हा, आपला आदर्श टिकून रहावा म्हणून आपल्या वैयक्तिक  आयुष्यातील आशाआकांक्षाना बगल देत सोशिकपणे जगताना दिसतो. जेवढा तो मुलीच्या भवितव्याचा विचार करतो तेवढाच तो आपल्या हयातीत आपल्या मुलाला  कोणत्याही गोष्टीचा नाहक त्रास होऊ नये म्हणून जीव पणाला लावतो.कवी इंद्रजीत भालेराव यांना तर आपला शेतकरी बाप हा उभ्या जगाचा पोशिंदा वाटतो.हा शेतकरी बाप आपला जमीन जुमला आणि इतर संपत्ती स्वत:च्या चैनीखातर न वापरता मुलांसाठी राखून ठेवतो.पिढ्यानपिढ्या हे घडत आहे त्यामुळे आजही मुलांना गावाची ओढ लागून राहिलेली असते. हीच ओढ पंढरपूरच्या वाटेवरील वारकऱ्यांना लागते.कारण बाप रखुमादेविवराला भेटण्यासाठी ते आतुर झालेले असतात. संसाराला  कंटाळलेली ही वारकरी मंडळी अद्वैताच्या वाटेवर चालत बाप विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवतात तेव्हा त्याचं अतृप्त मन शांत होतं. म्हणजेच तृप्तीची आस कोणती असेल तर बापाला  डोळे भरून बघण्याची .आणि ही तृप्ती  ज्या लेकरांना अनुभवायला मिळते ते त्यांच भाग्य ,असे समजणारी मंडळी जोपर्यंत समाजात आहेत  तोपर्यंत बाप हा बाप माणूसच राहील.

तसे पाहता आज शहरी  आणि ग्रामीण हा भेद उरलेला नाही.मागच्या म्हणजे सुमारे एकोणीशे नव्वद पूर्वीच्या कालखंडात नोकरी करणाऱ्या मातांची संख्या कमी होती.पण त्यानंतरच्या काळात नोकरी करणाऱ्या मातांची संख्येने पटीत वाढल्याचे दिसते.जसजसे स्त्री शिक्षणाचे प्रमाण घराघरात वाढले तसतसे ,वडिलांचे घरातील स्थान दुय्यम होऊ लागले.माता कमावत्या झाल्याने मुलांच्या आर्थिक गरजा या प्रामुख्याने आईकडून भागवल्या जाऊ लागल्या.बाबा मला अमुक एक गोष्ट पाहिजे म्हटल्यावर, पूर्वीचे बाबा पगार झाल्यावर तुला ती गोष्ट मिळेल असे बजावून सांगायचे. घरात भावंडांची संख्या जास्त असल्याने मुलंपण समजून घ्यायची. घरात संघर्षाचे  हे वातावरण क्वचितच निर्माण व्हायचे .एक तर एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरात लहान मुलांची संख्या जास्त असायची सर्वांना  सारखा खाऊ  वाटून घ्यायची सवय असल्याने कुणीही वडिलांबरोबर वाद घालायचे नाहीत.महिन्याअंती हातात काही शिल्लक असल्यास वडिलांकडून मुलांना ती वस्तू मिळायची. त्यामुळे वडिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा आश्रयदाता किवा कुटुंबाचा मालक असा असायचा.स्त्रिया म्हणजे माता  कमवू लागल्यावर मुलांच्या गरजाची पूर्तता लगेच होऊ लागली. मुलांचा उताविळपणा वाढू लागला.पाठोपाठ बाप म्हणजे कुटुंबप्रमुख या संकल्पनेला तडा जाऊ लागला आणि कुटुंब व्यवस्थेतील बापाच्या अढळ स्थानाला उतरती कळा लागली .

कुटुंबात माता  कमावत्या असल्याने  तुलनेने खरं तर  बापाचा आर्थिक भार कमी झाला .घराघरात वडिलांच्या जबाबदाऱ्या पूर्वीपेक्षा कमी झाल्या. म्हणजे बापाची काळजी मिटली,असं म्हटलं जाऊ लागलं.पण खरोखरच हा बाप नावाचा माणूस सुखी झाला का ? नसेल तर का नाही? त्याला मुलांकडून घरात मातेएवढाच प्रेम मिळू लागलं का? आणि नसेल तर का नाही ? त्याची उपेक्षा वाढली का? बापांवर अन्याय करणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाली का? आणि ती नेमकी कीती प्रमाणात होतेय? या सगळ्यांचा विचार करता सध्याच्या काळात अल्पांशाने का होईना मुलं बाप या नातेसंबधाविषयी  बेफिकीर बनत आहेत अशी वस्तुस्थिती समोर येत आहे. त्यामुळेच  भारतासारख्या संस्कृतीबद्ध देशामध्ये’ फादर्स डे’साजरा करण्याची नितांत गरज भासू लागली आहे. जन्मदात्या आईप्रमाणे  संततीसंगोपनामध्ये  वडिलांचं स्थान देखील अंत्यंत मोलाचं आहे, हे मुलांना आज समजून देण्याची वेळ आली आहे.निदान त्यामुळे तरी मुलांच्या मनात वडिलांबद्दल आदर निर्माण होईल असा त्यामागचा हेतू आहे.हे पुज्यस्थान वडिलांना घरात मिळावं म्हणून आजच्या काळात वडिलांनासुद्धा आपली बाप म्हणून पात्रता सिद्ध करावी लागत आहे.फक्त जन्मास कारणीभूत ठरला म्हणून तो बाप आहे किंवा घरात पैसे देतो म्हणून तो बाप असं म्हणायला आजची पिढी तयार नाही.बापाची तुलना मुलांकडून आज दुसऱ्या कुणाशी केली जात नाही तर ती आईशीच केली जाते .कारण आज स्त्रिया कुटुंबाचा सगळा भार समर्थपणे पेलत असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातील जवळजवळ पन्नास टक्क्याहून अधिक स्त्रिया आजच्या काळात आत्मनिर्भर जीवन जगत आहेत.अर्थातच मुलांसमोर त्यान हाच आदर्श राहतो कारण त्या घर आणि नोकरी किंवा व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर समर्थपणे लढत असतात.काहीवेळेला बाप शिक्षणाने आणि आर्थिक कमाईने आईपेक्षा डावा ठरत असतो.मुलांचा अभ्यास शिक्षण घरकाम मुलाचं संगोपन खाणंपिणं याकडे आईच लक्ष देत असते. साहजिकच आईबद्दल मुलांच्या मनात प्रेम आणि आदर पूर्वीपेक्षाही वाढल्याचे दिसत आहेत काही अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास मातांनी कुटुंबातीलआपलं स्थान आदराच स्थान अधिकच बळकट केल्याचं दिसतं.त्यामुळे आदर्श बापाच्या कसोटीत उतरण्यासाठी बाप लोकांना भरपूर मेहनत घ्यावी लागत आहे.आपल्या सरंजामी मानसिकतेच्या कुटुंबामध्ये त्यामुळेच बाप आणि मुलांमध्ये मोठ्याप्रमाणात संघर्ष निर्माण झाल्याची उदाहरणे नजरेस येत आहेत.

फार पूर्वीपासून आपण मुलांनी बापाला बेघर केल्याची उदाहरणे ऐकत आलो आहोत.याउलट काही घरात ,मुलाला बापाने घरातून बाहेर काढून त्याचा वारसाहक्काने मिळणाऱ्या संपत्तीवरील हक्क काढून घेतलेला आहे.का, तर मुलगा आपलं ऐकत नाही .पण हा अट्टाहास पालकांनी किती धरावा? अगदी मृत्युनंतर त्याने खांदा  द्यायलासुद्धा येऊ नये इथपर्यंत?  मृत्यूपत्रात नोंद करून ठेवेपर्यंत? एवढा कठोरपणा जर बापात  असेल तर मुलांकडून आपण  काय अपेक्षा करणार? मायेच्या नात्यात जर सुडत्वाची  भावना पराकोटीची असेल तर  ते नातेसंबंध टिकावेत अशी अपेक्षा तरी का धरायची?? आजच्या काळापेक्षा पूर्वीच्या काळात बापाने मुलांना बेघर केल्याची अनेक उदाहरणे सापडतात. कारण घरात मुलांची संख्या जास्त असायची त्यातील एक पिल्लू बेघर झालं तर आईला किंवा बापाला काही फरक पडायचा नाही. पण ही सरंजामी मानसिकता आजच्या काळातही काही अपवादात्मक बापांमध्ये असल्याने कुटुंबव्यवस्था मोडकळीस आल्याची उदाहरणे आहेत. बाईमुळे घर मोडतं असा लोकोपवाद  आहे. पण नवऱ्याच्या आततायीपणापुढे आईचं काही चालत नसल्याने मुलांमध्ये देखील हतबलता येते.परिणामी  मुले घर सोडून जाण्याच्या निर्णयाप्रत  पोहोचतात.तर कधी आत्महत्येस प्रवृत्त होतात.उघडपणे समाजात कुणी या गोष्टीबद्दल बोलत नसलं तरी, प्रत्यक्षात मातेला मात्र बापाच्या हटवादीपणापोटी  मूकपणे अश्रू ढाळत जगावे लागते.अर्थात तिच्याही मनात त्याच्याबाद्दलचा आदर कमी झालेला असतो.

शहरीकरण आणि वाढता चंगळवाद यामुळे बरीच तरुण मुल हल्ली अमलीपदार्थांच्या आहारी जाऊ लागली आहेत .हे शहरीभागातील  ढळढळीत वास्तव आहे.अशाच एका समुपदेशन केंद्र चालवणाऱ्या संचालकाकडे एका उच्चशिक्षित कुटुंबातील  विमनस्क तरुण मुलाची केस दाखल झाली.पालकांशी संवाद साधतताना त्यांच्या असे लक्षात आले की, त्याच्या आईवडिलांमध्ये पराकोटीचे वैचारिक मतभेद होते.त्याच्या वडिलांचं म्हणणं होत की,त्यांची पत्नी दिवसभर नोकरी करते, उरलेल्या वेळेत घरकाम आणि सुट्टीच्या दिवशी कुठल्यातरी नातेवाईकांकडे किंवा पार्टीला जाते. तिच्या अशा वागण्याने तो बिघडलाय.अखेरीस  त्या केसमध्ये आईपेक्षा वडीलच जास्त जबाबदार होते,  असे  निदर्शनास आले.कारण तो जेव्हा जेव्हा बाबांशी संवाद साधायला  बघायचा तेव्हा तेव्हा  बाबा त्याला तुटक उत्तर देऊन टाळायचे. आर्थिक गणिताशिवाय त्यांच्या तोंडी दुसरा विषय चर्चेसाठी नसायचा.आईबापाच्या विसंगत वागण्यामुळे तो मुलगा एकल कोंडेपणातून उद्भवलेल्या मानसिक दुबळेपणामुळे नैराश्यापर्यंत पोहोचला.पौंगडावस्थेतील भावनिक अस्थिरतेमुळे तो त्याला अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या मित्रांच्याटोळीत सामील झाला.परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर वडिलांना त्यांची चूक कळली.आपण आपल्यातील पुरुषी अहंकाराला जर वेळीच मुरड घातली असती तर आज ही वेळ आली नसती. असे हे कुटुंबातील विसंवाद हा बापाच्या सतत बाहेर राहण्यामुळे निर्माण झालेले असतात.अशावेळी मातेची भूमिका प्रमुख असली तरी मुलगा वयात येताना तो बापाचे अनुकरण जास्त करतो त्यामुळे बापालाही आपण बाप झाल्याची जाणीव असली पाहिजे.

सामान्य मुलांना घडवणं हे जरी बापाला आव्हानात्मक वाटत असलं तरी, ते दिव्यांग मुलांना घडवण्याइतपत नक्कीच जिकीरीचे नाही. सामान्य मुलांकडे विशेष असं लक्ष  द्यावं लागत नाही. त्यांना जरूर तेथे मार्गदर्शन केले की, ती मुलं आज्ञेबरहुकुम काम करतात. काहीवेळेला संगतीमुळे बिघडतातदेखील.पण अपंग  गतिमंद आणि मतीमंद मुलांकडे मात्र विशेष लक्ष देण्याची गरज असते अशावेळी वडिलांच्या प्रेमाची खरं तर कसोटी लागते. निसर्गत:च  माता ही संवेदनशील असल्याने, ती अशा मुलांची सेवा आणि देखभाल  सामान्य किंवा सामान्य मुलांच्या बरोबरीने करते.अशा मुलांच्या बाबतीत आदर्श  बाप म्हणून जबाबदारी निभावणारी एक सज्जन माणूस माझ्या परिचयातील स्नेह्यांकडे मी पाहिला. आजच्या स्त्रीभ्रूण हत्येच्या काळात  आपल्या मतीमंद मुलीसाठी नोकरी आणि करियरवर त्याने पाणी सोडले.हे करत असताना तो स्वत: पत्नीच्या व्यवसाय व आवडीनिवडीच्या आड आला नाही .आपल्या मुलीच्या  तोंडात घास घालण्यापासून ते  अंगवस्त्र  बदलण्यापर्यंत सगळी सेवा तो  अगदी आईच्या मायेने करतो.अशावेळी मला असंही वाटून गेलं की,आपण स्त्रीपुरुष समानतेचा अट्टाहास का धरतोय ? खरं तर एवढा समंजसपणा जर बाप झाल्यावर येत असेल तर, मातेच्या डोक्याला ताप उरेल काय?पण अशी उदाहरणं क्वचितच सापडतं.याच्याउलट निर्दयी काळजाचे बाप समाजात आहेत.ज्यांनी आपल्या मतीमंद किंवा गतिमंद मुलांची जबाबदारी बायकोवर टाकून दुसरा घरोबा केलेला आहे.या मुलांना  वेळीच कुठल्यातरी सामाजिक संस्थेने आधार दिला नसता तर ती मुले अन्नाला मोताद झाली असती.जन्मदात्री म्हणून काही माता अशा दुबळ्या मुलांची जबाबदारी  समर्थपणे निभावत असतील पण बापाचं काय ? त्याच्यातील पुरुष हा बाप बनूनही पुरूषच राहिला.त्याला बाप बनता आलं नाही असं म्हणावं लागेल.

आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती विसर्जित झाल्याने बाप हा केवळ घराचा मालक किंवा हुकुमशहा न राहता त्याची भूमिका बदलली आहे. तो कुटुंबाचा  नुसता अर्थतज्ञ  नाही तरतो  कुटुंबाचा  संरक्ष क आणि काळजीवाहक बनला आहे. आजचा बाप हा  पूर्वीच्या सुखवस्तू कुटुंबात जन्मलेला  नसेलही  पण आपल्या पोरांना  कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून आपलं आयुष्य पणाला लावत आहे.बायको गृहिणी असली तरी मुलांच्या संगोपनात आणि शिक्षणात त्याचा अवकाश व्यापलेला असतो.अशा आदर्शवत बापाची  मुलं मोठी झाल्यावर बापाला कशी विसरतील? पाटाचे पाणी बंधारा सरळ घातल्यास आडवळणाने  कसे जाईल?  जसे स्त्री मध्ये पुरुष तसे ,पुरुषामध्ये एक स्त्री दडलेली असते असे म्हटले जाते..बापाच्या बाबतीतील या आणि अशा अनेक घटना लक्षात घेतल्यातर आपल्याला  पुरुषात दडलेला स्त्रीचा हळवेपणा कळू लागतो. असाच एक ‘बाप’ माणूस आपली बायको म्हणजे आपल्या मुलाची आई आजारी असताना,दिवसरात्र बायकोची सेवा स्वत: करायचा. जे काम एखादी स्त्री प्रेमाने करु शकली नसती, ते काम केवळ मुलाच्या प्रेमापोटी बाप स्वत: करायचा. हे सगळं तो बाईमाणसाप्रमाणे बिनतक्रार आणि निमुटपणे करायचा. ही सोशिकता आणि संवेदनशीलता त्यांच्यात आली कुठून?केवळ संस्काराने ही संवेदनशीलता येते की ती जन्मात:च असावी लागते?की मुलांच्या काळजीपोटी ती  आपोआपच प्रकट होते. काहीजण  बायकोच्या मृत्युनंतर पुनर्विवाह  न करताही मुलांसाठी आपलं आयुष्य पणाला लावतात.सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी आपल्या लैंगिक ,भावनिक  आणि मानसिक सुप्त इच्छा आकांक्षांना बायकोच्या प्रेताबरोबर मूठमाती देतात.मुलांची माता बनून त्यांच्यावर मायेची पखरण करतात.अशा भवतालात घडलेली मुलं बापाला नटसम्राटासारख्या वादळी आयुष्यात ढकलून कशी  देतील? कारण संस्कार हे शिकवून  रक्तात उतरत नाहीत तर, ते कृतीतून  उतरावे लागतात. खरं तर  पुनर्विवाह करावा की करू नये हा वादाचा मुद्दा आहे. कारण समाजस्वास्थ्यासाठी पुनर्विवाहाची गरज आहे.पण मुलं मोठी झाल्यावर ज्यांनी पुनर्विवाह केला आहे त्यांच्या मुलांना फार अन्यायकारक वागणूक मिळाल्याचं निदर्शनास आले आहे.यावर उपाय म्हणून बापाची  एक निश्चित भूमिका घेऊन जगणे प्रयेकाला अपरिहार्य आहे.

आज बदलत्या कुटुंब व्यवस्थेमुळे कुटुंबातील बापाचं स्थान बदलत असलं तरी, जोपर्यंत बालककेंद्री कुटुंब व्यवस्था आहे तोपर्यंत, बाप हा आदरणीय आणि वंदनीय पालक म्हणूनच राहणार आहे  हे नि:संशय आहे.एकल पालकत्वाची संकल्पना आज बळ धरू लागली असली तरी यामधील संभाव्य धोके विचारात घेता अनाथ मुलांना पुन्हा अनिकेत करण्यासरखे होईल.एकंदरीत परिस्थिती पाहता,अशा विनापाश आयुष्य जगणाऱ्या बापांना  काहीवेळा मुलांचा सांभाळ नीटपणे करता येत नाही.मुलांच्या संगोपनासाठी दाई ठेवल्याने मुलांना बापापेक्षा त्या दाईची ओढच जास्त असल्याची जाणवते.एकूणच कुटुंबव्यवस्थेने मुलांना  प्रदान केलेल्या सुरक्षिततेपासून मुले वंचित राहतात.लिव-इन-रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या दाम्पत्यांच्या मुलांची परिस्थिती  याहून काही वेगळी नाही कारण व्यक्ती स्वातंत्र्याच्या कल्पनेने भारलेली ही मंडळी पती पत्नीच्या नात्याला दुय्यम समजतात. केवळ स्त्रीच्या मातृत्वाच्या  भावनेपोटी मुलाला जन्म दिला जातो.त्यातील पुरुष हा पुरूषच राहतो. त्याला बाप बनता येत नाही.कोणत्याही सामाजिक बंधनाखेरीज जन्माला आलेल्या या  मुलांकडून  बापाला हवा तसा आदर, मान, सन्मान मिळत नाही.साहजिकच बापातील  आदिम वृत्ती त्याच्यातील पुरुषी स्वैराचाराला खतपाणी घालते.या नातेसंबंधात बाप केवळ वीर्यदाता असल्याने  नावाला बाप म्हाणून उरतो.पण सध्याच्या काळात आईचं नाव मुलाच्या नावाशी जोडलं जात  असल्याने, बापाच्या नावाचा मुलाशी नाममात्र संबंध उरत नाही.

आजच्या काळात बाप हा खऱ्या अर्थाने आउटसायडर बनत आहे. कारण व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने पतीपत्नी एकत्र राहत नसल्याने, मुलं ही आईच्या छत्राखाली लहानाची मोठी होतात. लष्करात किंवा तत्संबंधी सुरक्षा व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्यांची मुले,तसेच सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात अधिकारी म्हणून काम करणाऱ्यांची मुले बहुतांशी पितृछ्त्राखेरीज वाढतात.त्यांच्यासाठी बाप हा आगंतुक येणारा पाहुणा किंवा स्ट्रेंजर असतो. बापाशी त्या मुलांची कोणतीच भावनिक जवळीकता राहत नाही.आजच्या काळात मोबाईल  किंवा विडीओ कॉल्द्वारे बाप आपले नातेसंबंध टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात.पण बापाचं प्रत्यक्ष सान्निध्य आणि प्रेमाच्या स्पर्शाला आपण मुकल्याची खंत, ही मुले व्यक्त करताना दिसतात.

मुलींसाठी बापाच्या मनात एक हळवा कोपरा नेहमीच जागृत असतो.मुलीचं लग्न ठरल्यावर एरवी समारंभात उतावीळ होऊन धावपळ करणारा बाप मनातल्या मानत उसासे टाकत काम करत असतो. मुलीच्या डोक्यावर अक्षता पडल्यावर सर्वांसमक्ष वाघाच्या छातीने चालणारा बाप,आडोशाला जाऊन  घळाघळा अश्रू ढाळतो तेव्हा तो बाप ,जगातील कुठल्याही नातेसंबंधापेक्षा वरचढ ठरणारा वाटतो.  म्हणूनच हिंदीतील एक नामांकित कवी  चंद्रकांत देवताळे ‘बेटी के घर से लौटना’ या कवितेत म्हणतात _’समान बांधते  बमुश्कील कहते पिता/बेटी जिद करती /एक दिन और एक दिन/ रुक जाओ न पापा / एक दिन’.सासरी गेलेली मुलगी कडे बाप राहायला जातो तेव्हा ती मुलगी मनमोकळेपणाने बोलू आणि हसू लागते.जेव्हा बाप घरी जायला निघतो तेव्हा ती डोळ्यात पाणी भरून सांगते  बाबा आणखी फक्त एकच दिवस तुम्ही थांबा.बापाच्या प्रेमाच्या अशा करूण कहाण्या आपण बरीच वर्षे ऐकत आलोय.एकूणच नवरा कितीही तालेवार असला तरी तो बापाच्या प्रेमाची जागा घेऊ शकत नाही हे खरे. पोरीवरच्या अतीव प्रेमामुळेच की काय जेव्हा मुलगी बापाच्या मनाविरुद्ध लग्नाचा विचार मांडते किंवा लग्न करते तेव्हा बापच क्रूरकर्मा  बनून ऑनर किलिंग घडवून आणतो.झोपडपट्टीतील मुलामुलींचा बाप हा त्यांच्यासाठी असाच कलीकाळ ठरतो.अठराविश्वे दारिद्र्याने गांजलेला व्यसनांध बाप सैतानी कृत्ये करताना मागेपुढे बघत नाही. मुलावर किंवा मुलीवर लैंगिक अत्याचार करताना तो एकूणच आपली विवेकशीलता आणि माणुसकी गहाण टाकत असतो.त्यातूनच कधी मुलांकडून त्याची हत्या होते तेव्हा, तुरुंगाची हवा खाणाऱ्या मुलांना आपल्या कृत्याचा यत्किंचितही पश्चाताप होताना दिसत नाही.याउलट पोलीस तपासात ती मुले स्वत:च  बापाला  संपवल्याची उघडउघडपणे कबुली देतात. एकूणच दुधावर सायीचा दाटथर यायला हवा असेल यार दुधात पाणी जास्त असून  चालणार नाही ,तसेच माणूस हा सद्गुण आणि दुर्गुणांनी भरलेला आहे असे जरी मानले तरी बापामध्ये दुर्गुणांचे आधिक्य असून चालणार नाही .

भारतीय  कुटुंब व्यवस्थेमध्ये बाप हा केद्रस्थानी असला तरी,आजच्या भवतालचा  विचार करता बापाने आपली भूमिका बदलणे गरजेचे आहे.आज जिथे रक्ताच्या नात्यामध्ये प्रेमाच्या ऐवजी दुराव्याचे प्रसंग अधिक येतात तिथे, पतीपत्नीच्या जोडलेल्या नात्यामध्ये शुष्कता येणे हे स्वाभाविक मानायला पाहिजे .मग अशावेळी मुलांची बापाबद्दल नेमकी कोणती भूमिका राहील हे सांगता येत नाही.हीच शुष्कता कदाचित बाप आणि मुलं यांच्या नातेसंबंधात येणार नाही याची आपण खात्री देऊ शकत नाही.म्हणूनच बाप म्हणजे एक जाणता किंवा प्रगल्भ ,प्रौढ  माणूस म्हणून त्यालाच बऱ्याच तडजोडी कराव्या लागतील. बाप म्हणजे केवळ हुकुमशहा अशी ताठर भूमिका घेऊन चालणार नाही. एकूणच बाप म्हणजे जन्मदाता अशी संकुचित व्याख्या केली जाते. पण आपण जग हे  जर कुटुंब मानलं किंवा हे विश्वची माझे घर असे मानले तर त्यामध्ये  बाप म्हणजे जगातील किंवा राष्ट्रातील कर्तबगार माणसे  येतील. अशा बाप मंडळीत महात्मा फुले , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,महत्मा गांधी,आणि अगदी अलीकडचे गोविंदराव पानसरे, डॉक्टर दाभोलकर यांचे नाव घेता येईल .कारण त्यांनी सर्वसामान्य पित्याची  भूमिका न बजावता, संपूर्ण समाजातील वंचित आणि शोषितांचा बाप बनून त्यांच्या उद्धारासाठी आणि हक्कासाठी लढा दिला.त्यातील महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ही पदवी दिली गेली कारण ते सर्वसामान्य जनतेकडे बापाच्या म्हणजेच गंभीर भूमिकेतून बघायचे.  त्यांची जनतेविषयी असलेली कळकळ पाहता , त्यांच्यातील संयम, आपुलकी,स्नेह जनतेवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव आणि त्यांच्यामध्ये बदल घडवून आणण्याइतपत सहनशीलता इ गुण हे बापाचेच  असल्याचे दिसून येते.बापहा मूक नायक असून चालत नाही तर,त्याच्या शब्दांना सत्याची धार असावी लागते. वाणीमध्ये गोडवा आणि सहिष्णू वृत्ती इ. गोष्टींचा सुंदर मिलाफ बापामध्ये असावा लागतो. तीच गोष्ट  इतर क्षेत्रातील बाप ठरणाऱ्या महात्म्यांबाबत घडते. कोणत्याही  सर्वोत्कृष्ट कलाकाराची कलाकृती ही त्याला त्याच्या क्षेत्रातील  बापच ठरवत असते. विचारवंत ,साहित्यिक ,राजकारणी आणि वैज्ञानिक हे त्यांच्या क्षेत्रातील बापच असावे लागतात.तरच त्यांच्याकडून उत्कृष्ट साहित्यनिर्मिती, उत्कृष्ट प्रशासन निर्मिती आणि संशोधन होऊ शकते.कुठलीच  पात्रता नसताना एखादं अधिकारपद मिळालं म्हणून, आपल्याला अधिकाऱ्याचीभूमिका  नीटपणे पार पडता येईल का ?त्यासाठी मनाचा कठोरपणा आणावा लागेल तरच,त्या भूमिकेला आपण योग्य तो न्याय देऊ शकू.कठोरपणा याचा अर्थ दुसऱ्याचा अपमान करणे, छळ करणे किंवा दुसऱ्याला शारीरिक आणि मानसिक इजा पोहोचवणे नव्हे .तसेच हुकुमशाहीपण  नव्हे.कर्तव्यकठोरता,स्वयंशिस्त,संयम, त्याग आणि उत्तम नेतृत्व इ.गुणांची पुंजी बापाकडे असली पाहिजे.  याच्या जोडीला मातेचे ममत्व आणि सोशिकता असेल तर मुलं बापाच्या छायेत स्वर्गीय सुखाचा अनुभव घेतील.आणि  हे चिमटीत पकडलेलं सुख निसटून जाऊ नये म्हणून, प्रत्येकजण डोळ्यात काळोख भरून बापाकडे याचना करेल,”आणखी एक दिवस थांबा, बाबा,आणखी एक दिवस”.

 

श्वेतल अनिल परब –मोबा.नं.९४२३३०१८९२
आर .एच.४ /निसर्ग रेसिडेन्सी/ न्यू शिरोडा नाका / सावंतवाडी-४१६५१०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *