कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं,असं नव्हे !-डॉ.शिवाजी नारायणराव शिंदे

कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं,असं नव्हे !
(अनुभव कथन)

जेव्हापासून ” कोरोनाचे ” सावट जगभर घोंगाऊ लागले तेव्हा सुरुवातीच्या काळात या विषाणूची भिती वाटत होती.परंतु नंतरच्या काळात शासनाने दिनांक ०८ जून २०२० पासून लॉकडाऊन कमी करून अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आणि शासकीय कार्यालये उघडण्यास मुभा मिळाली. या कोरोना काळातही कोरोनाला न घाबरता कार्यालयीन कामकाज व इतर कामे पूर्ण क्षमतेने,प्रामाणिकपणे,निष्ठेने व उत्साहाने करत होतो.मनामध्ये कोरोनाची यत्किंचितही भीती नव्हती.अगदी बिनधास्त संशोधक विद्यार्थ्यांच्या (एकूण ४११ )संशोधन व मान्यता समितीच्या बैठका,३१९ विद्यार्थ्यांच्या विभागीय व मध्यवर्ती संशोधन समितीच्या बैठका व एकूण २९ संशोधक विद्यार्थ्यांच्या पीएचडीच्या ऑनलाइन मौखिक परीक्षा इत्यादी कामे निर्धोकपणे पूर्ण केली. अनेकांशी जवळून संपर्क आला पण कोरोना या विषाणूंची जराशीही भीती माझ्या मनात नव्हती.
परंतु दिनांक ४ डिसेंबर २०२० रोजी मला कणकण व अशक्तपणा जाणवू लागल्याने विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित जगताप सर यांच्या सल्ल्याने बाळे येथे जाऊन मी स्वतःची कोरोनाची चाचणी करून घेतली.दुर्दैवाने ही चाचणी पॉझिटिव्ह आली आणि मनातून पुरता भेदरून गेलो,घाबरलो ! आता सगळं संपलय?अशी मनाची नाजूक स्थिती झाली. कुटुंबातील सर्वांचे चेहरे डोळ्यांसमोर तरळू लागले,आपलं आता काही खरं नाही,क्षणार्धात एक विचार स्पर्शून गेला आणि वाटलं आपण हे जग सोडून जातो की काय? असे एक ना अनेक विचारांचे काहूर मनात निर्माण झाले आणि जीवनाची क्षणभंगुरता जाणवायला लागली ती या कोरोनाच्या चाचणीमुळे !

कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं,असं नव्हे !-डॉ.शिवाजी नारायणराव शिंदे
कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं,असं नव्हे !-डॉ.शिवाजी नारायणराव शिंदे

पत्नीला फोन केला तिला कशीबशी ही बातमी दिली परंतु या बातमीमुळं तिचं रडणं थांबेना,तिचा रडवेला चेहरा मला आणखीन कमकुवत बनवत होता.आपण हे काय करून बसलो आहोत ? अशी रुखरुख मनामध्ये सारखी वाटत होती.त्या अवस्थेत आणि नंतर दवाखान्यात ऍडमिट झाल्यानंतरच्या भावना या ब्लॉगच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.

(१) गर्भगळीत झालो,सर्व अवसानच गेले,प्रचंड तणावाखाली आलो ….

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली आणि मी गर्भगळीत झालो,सर्व अवसान गमावून बसलो.प्रचंड तणावाखाली आलो,आयुष्यामध्ये कुठल्याही प्रसंगाला समर्थपणे व धीरोदात्तपणे तोंड देणारा मी परंतु या क्षणाने मात्र मला कमकुवत बनवले, माझ्या तोंडचे पाणी पळविले. ” जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे ” या म्हणीची प्रचिती मला आली.कोरोनाचं संकट काय असतं,ते ज्याच्यावर येतं येतं त्यालाच तो अनुभव सांगता येतो.

(२) जीवनपट क्षणार्धात डोळ्यासमोरून तरळून गेला….

याप्रसंगी संपूर्ण जीवनपट डोळ्यासमोरून तरळून गेला,आपण लहानाचं मोठं कसं केलं होत गेलो,आयुष्यामध्ये किती कष्ट केले,कोणकोणत्या प्रसंगाला सामोरे गेलो या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा डोळ्यासमोर यायला लागला आणि जीवनाकडे व्याकूळतेने पहायला लागलो. माणसाचं अस्तित्व हीच त्याची ओळख असते ही बाब सातत्याने जाणवायला लागली.” शिर सलामत तो पगडी पचास ” या गोष्टीचा प्रत्यय यावेळी आला.

(३) पत्नीचे सारखे रडणे,मनाला असह्य वेदना देत होते ….
पत्नीला मला कोरोना झाल्याचे कळताच तिची अवस्था बिकट झाली होती,रडून-रडून तिने स्वतःला खूप त्रास करून घेतला होता,सोलापूरात मी,पत्नी आणि दोन मुलेच राहत असल्याने एकाकीपणा जाणवत होता,आता कसे होणार या भितीपायी तिला खूप त्रास सहन करावा लागला,तेव्हा माझ्यात अपराधीपणाची भावना निर्माण झाली,आपणच आपल्या कुटुंबाला दुःखाच्या खाईत लोटले आहे,आपल्यावर पत्नी,दोन लहान मुले,वयस्कर आई-वडील अवलंबून आहेत याचा जरासाही विचार कधी केला नाही याची प्रकर्षाने जाणीव झाली. आपण त्यांच्याशी,त्या सर्वांच्या जीवनाशी किती प्रतारणा करत होतो याचेही वाईट वाटले.पत्नीचा रडवेला चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता,त्यामुळे मनाला असह्य वेदना होत होत्या.

(४) समर्थच्या ” पप्पा घली(घरी)यानावं ” या बोबड्या पण प्रेमळ हाकेने व्याकुळ झालो…..

समर्थ माझा लहान मुलगा,त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे,मी घरात नसलो की,मम्मी पप्पा कुठं गेले,पप्पा कधी येणार आहेत या प्रश्नाने त्याच्या मम्मीला सारखं भंडावून सोडतो.मी माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने घरी न येता थेट दवाखान्यात जाऊन ऍडमिट झालो,त्यामुळे मी घरी न आल्याचे पाहून समर्थने त्याच्या मम्मीकडे पप्पा कुठे गेलेत मम्मी ! याचा सारखा नाद लावला.समर्थला मला सीमाने फोन लावून दिला,तेव्हा समर्थने मला ” पप्पा घली(घरी)यानावं ” या बोबड्या पण प्रेमळ हाकेनं मी पुरता व्याकुळ झालो,पुरता हादरून गेलो आणि अधिकच उदविग्न झालो.

(५) विद्यापीठातील कुलगुरू मॅडमपासून ते सर्व शिक्षक व प्रशासकीय सहकाऱ्याकडून आणि नातेवाईकांकडून तबियेतेची आस्थेवाईकपणे व आपुलकीने विचारपूस….

मला कोरोनाचा सामना धैर्याने करण्यासाठी आणि माझ्यात आत्मबळ निर्माण होण्यासाठी मला विद्यापीठातील आमच्या मार्गदर्शिका व प्रेरणास्रोत आदरणीय डॉ.मृणालिनी फडणवीस मॅडम,प्र-कुलगुरू आदरणीय डॉ.देबेन्द्रनाथ मिश्रा सर,सर्व संवैधानिक अधिकारी,संकुलाचे संचालक,शिक्षक,वर्ग १ ते ४ चे सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी,नातेवाईक यामध्ये आई-वडील,सासरे,मावशी,आत्या,मावसभाऊ,बहीण व दाजी,दादा,मेव्हणे यासर्वांनी माझ्या तबियेतेची आस्थेवाईकपणे व आपुलकीने चौकशी केली,विचारपूस केली आणि कोणतीही काळजी न करण्याचा,तणावमुक्त राहण्याचा सर्वांनीच मोलाचा सल्ला दिला त्यामुळे मला धीर आला आणि मी कोरोनाला मोठ्या धैर्याने सामोरे गेलो आणि त्यावर यशस्वीपणे मात करू शकलो.

(६) नात्यांपेक्षाही श्रेष्ठ असलेला असंख्य पाठीराख्यांचा/स्नेहीजनांचा गोतावळा …
माझी अक्कलकोटस्थित स्वामी समर्थ महाराज आणि गुरुपीठ त्र्यंबकेश्वर,नाशिकचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्यावर नितांत श्रद्धा आहे.
स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने,परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने आणि विद्यापीठातील मा.कुलगुरू मॅडम, मा. प्र-कुलगुरू सर, सर्व संवैधानिक अधिकारी,संकुलाचे संचालक, शिक्षक,वर्ग १ ते ४ चे चे प्रशासकीय सहकारी,माझ्या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी,आप्तेष्ट, गुरुवर्य,स्नेहीजन,नातेवाईक,शेजारी,विद्यार्थीमित्र या सर्वांच्या शुभेच्छामुळे मला दिनांक १०/१२/२०२० रोजी सायंकाळी ५ वाजता हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली.आता माझी तबियत चांगली आहे!!डॉक्टरांनी खबरदारीचा उपाय म्हणून १० ते १५ दिवस होम आयसोलेशन व होम कोरोनटाइन होण्यास सांगितले आहे.त्यानंतर एक दिवस दिनांक २१/१२/२०२० रोजी फॉलोअपसाठी बोलावले आहे.
या आठ ते दहा दिवसाच्या माझ्या जीवनातील अतिशय कठीण प्रसंगी माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण सर्वजण खंबीरपणे उभे राहिलात ! मला काळजी करू नका सर, लवकर बरे व्हाल अशा माझे मनोधैर्य वाढवणाऱ्या,मला बळ देणाऱ्या शुभेच्छा दिलात ! हजारो फोन कॉल्स, हजारो संदेश प्राप्त झाले, अनेकांचे फोन उचलता आले नाहीत त्याबद्दल खेद व्यक्त करतो.केवढा मोठा ” नात्यांपेक्षाही श्रेष्ठ असा आपल्या माणसांचा ” गोतावळा ” मी तयार केला आहे याचे माझे मलाच अप्रूप वाटले !! ”
केवळ आणि केवळ या सर्वांच्या शुभेच्छामुळे आणि आस्थेवाईकपणे व आपुलकीने केलेल्या विचारपूसीने मला लवकर बरे होण्यास मदत झाली!!त्याबद्दल या सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो!!आणि आयुष्यभर या सर्वांच्या ऋणातच राहू इच्छितो….

(७) अत्याधुनिक व सर्व सुविधानीयुक्त सुसज्ज असे ‘ सीएनएस ‘हॉस्पिटल…

आपल्या सोलापूरात पुणे,मुंबई सारख्या अत्याधुनिक व सर्व सुविधानीयुक्त व सुसज्ज असे डॉ.प्रसन्न कासेगावकर सर यांचे चंदन नुरो सायन्सेस(सीएनएस)हॉस्पिटल निसर्गरम्य वातावरणात उभारलेले आहे.ही आम्हा सोलापूरकारांसाठी आनंदाची बाब आहे.या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उत्तमरित्या उपलब्ध आहेत,कोणत्याही चाचण्या,तपासण्या याठिकाणी होतात त्यामुळे रुग्णाची व्यवस्था झाली आहे.हॉस्पिटलमध्येच प्रशस्त लॅब कार्यान्वित असल्याने रुग्णाच्या दैनंदिन तपासण्याचे रिपोर्ट्स तात्काळ मिळण्यास मदत होते.हॉस्पिटलमधील रूम्स, भौतिक सुविधा,स्वच्छता,टापटीपपणा मनाला खूप भावला,सर्वसामान्यांचं हक्काचं आणि आपलं हॉस्पिटल असल्याची जाणीव झाली.

(८) पेशंटशी(रुग्णांशी)आपुलकीने व गोड भाषेत संवाद साधणारे डॉक्टर :- डॉ.दिनेश क्षीरसागर साहेब ……

आमचे मित्र आणि विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित जगताप सर यांनी कळविल्यानुसार माझ्यावर डॉ.दिनेश क्षिरसागर सर आणि त्यांच्या टिमने उपचार केले,डॉ.क्षीरसागर साहेब प्रत्येक राऊंडला आल्यानंतर(सकाळी व संध्याकाळी)काय शिंदे साहेब,बरी आहे ना तबियेत?झालं दोन-तीन दिवसात तुम्हाला घरी सोडायचंय,असे केवळ मलाच नाही तर माझ्या रूममधील इतर रुग्णांशी आणि शेजारील रूममधील सर्व रुग्णांशी सकारात्मक पद्धतीने बोलायचे?म्हणजे रुग्णाच्या मनातील भिती त्यामुळे कमी व्हायची,आपल्याला काही मोठा आजार झाला नाही अशी रुग्णाची भावना व समज व्हायची.डॉ.क्षीरसागर साहेबांच्या रुग्णांशी होत असलेल्या आपुलकीच्या व गोड भाषेतील संवादामुळे अर्धा पेशंट तिथेच बरा होतो आणि अर्धा इतर औषधामुळे बरा होतो असे माझे प्रामाणिक मत आहे.सरांची रुग्णाला हाताळण्याची,त्यांना तपासण्याची,त्यांच्यावर उपचार करण्याची कला व रुग्णाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन मला खूप आवडला.

(९) चुणचुणीत व समर्पणवृत्तीने काम करणारा ‘सीएनएस ‘ हॉस्पिटलचा सर्वच स्टाफ :-

मला ‘ सीएनएस ‘ हॉस्पिटलमधली आणखी एक आवडलेली बाब म्हणजे तेथील सर्व स्टाफ ! सर्वच स्टाफ चुणचुणीत आणि समर्पण वृत्तीने काम करणारा आहे,रुग्णांना काय हवे आहे,काय नको आहे,त्यांना लावलेले स्लाईन संपले का?कोणत्या रुग्णाचा सकाळचा व संध्याकाळचा औषधाचा डोस कुठला आहे,याचे उत्तम नियोजन या सर्वच शिफ्टमधील स्टाफने केलेले असायचे,शिफ्ट संपताना अगोदरच्या शिफ्टमधील स्टाफ नंतरच्या शिफ्टमधील स्टाफला प्रत्येक रुग्णांना कोणता डोस दिला आहे,कोणता डोस दयायचा राहिला आहे याची इत्यंभूत माहिती देत असे.त्यांच्यातील समन्वय उत्तम होता,कदाचित सीएनएस ची संस्कृती त्यांनी अंगी बाळगलेली असावी,सर्वच स्टाफकडून सर्वच रुग्णांना योग्य वागणूक,योग्य सेवा व उत्तम उपचार मिळतात,रुग्णाची सर्वोतोपरी काळजी घेऊन शुश्रुषा इथे केली जाते याचा अनुभव मला हॉस्पिटलमध्ये आला.
या स्टाफमध्ये माझा ज्यांच्याशी संवाद झाला त्यामध्ये डॉ.कल्याणी उंबरजकर मॅडम,डॉ.संकेत हरहरे सर,श्री. गंगाधर सुरमी सर,श्री.राजीव श्रीराम सर,सौ.शुभांगी अतकरे मॅडम,ज्योती मॅडम,अशपाक,शायना शेख मावशी,सय्यद मावशी या सर्व स्टाफचा नामोल्लेख करणे गरजेचे वाटते.हे सर्वजण अतिशय निष्ठेने,प्रामाणिकपणे आणि समर्पणवृत्तीने आपली सेवा बजावत आहेत.(अनेकांची नावे माहिती नसल्याने टाकता आली नाहीत त्यामुळे सर्वच स्टाफ असा उल्लेख केला आहे).

(१०) कामाशी प्रामाणिक असलेल्या ” मोहसिना आत्तार ” मावशी :-

ज्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊच शकत नाही असे ‘सीएनएस ‘ हॉस्पिटल मधील एक नाव म्हणजे ” मोहसिना आत्तार मावशी ” ! या मावशी अतिशय मनमिळावू स्वभावाच्या आहेत,रुग्णानाच नव्हे तर रुग्णांच्या नातेवाईकांनासुद्धा मानसिक आधार देतात,मला आठवतंय पहिल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मला जेव्हा रूम नंबर २२३ देण्यात आली होती तेव्हा त्या रूममध्ये मला अजिबात थांबावेसे वाटत नव्हते,खूप एकाकीपणा जाणवत होता,मी आत्तार मावशीला म्हणालो,मावशी मला या रूममध्ये अजिबात करमत नाही मला दुसऱ्या रूममध्ये जिथे एखादा पेशंट आहे त्या रूममध्ये शिफ्ट करता का,आत्तार मावशीने क्षणाचाही विलंब न करता मला रूम नंबर २१७ मध्ये शिफ्ट केले,तिथे एक पंढरपूरचे ७२ वर्षाचे आजोबा होते त्यांच्याशी बोलल्यानंतर मला खूप बरे वाटले.
आत्तार मावशीने फक्त मला रूमच बदलून दिली नाही तर मला करमत नाही,पत्नीची व मुलांची खूप काळजी वाटत आहे असे मी त्यांना म्हटल्यावर त्यांनी माझ्या पत्नीशी अतिशय आपुलकीने संवाद साधला,तिला धीर दिला,सरांची तबियेत चांगली आहे,तुम्ही रडू नका,मी तुमची बहीण म्हणून तुम्हाला सांगते,तुम्ही रडलात की सर इकडं टेन्शन घेतात त्यामुळे तुम्ही निवांत राहावा असा मानसिक आधार मावशीने सीमाला दिला. सीमालाही त्यामुळे धीर मिळाला.अशा या आत्तार मावशी रुग्णांशी,रुग्णांच्या नातेवाईकांशी बोलतात,त्यांना समजावतात आणि आपले कामही तेवढ्याच तत्परतेने व प्रामाणिकपणे करतात.त्या प्रत्येक रुग्णाने काय सांगितले आहे,कँटीनमधून काय मागविले आहे याची आठवण ठेवीत,बिगर साखरेचा व साखरेचा चहा कोणी सांगितला आहे तो त्या आदलाबदली होऊ न देता त्या-त्या रुग्णांना आठवणीने पोहच करीत असत.अशा या आत्तार मावशीच्या कामाचा,प्रेमळ स्वभावाचा व प्रामाणिक वृत्तीचा हेवा वाटतो.

(११) हॉस्पिटलच्या कँटीनमधून रुग्णापर्यंत पोहोचविल्या जाणाऱ्या वस्तू(चहा,जेवण,काढा,पाणीबॉटल इत्यादी)त्वरित मिळण्यासाठी समन्वय वाढायला हवा …….

‘ सीएनएस ‘ हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा मिळतात याबद्दल कोणतेही दुमत नाही परंतु एका ठिकाणी सुधारणेला भरपूर वाव आहे,ते म्हणजे हॉस्पिटलमधल्या रूममधील रूग्णाकडून कॅन्टीनमधून काही मागविले जाते उदा: पाणी बॉटल,चहा,जेवण, ज्युस,काढा इत्यादी वस्तू,या वस्तू मिळतात पण त्या मिळायला खूप विलंब लागतो त्यामुळे अनेकदा रुग्ण वैतागून जायचे,अहो मी सकाळी पाणी बॉटल सांगितल्या होत्या आता बारा वाजत आले आहेत आणखी मला पाणी बॉटल मिळाल्या नाहीत हो,मला तहान लागली आहे,माझा घसा कोरडा पडला आहे अशी ओरड व नाराजी रूग्णांकडून व्यक्त होत असे ! त्यामुळे रूममधील रूग्णाकडून कँटीनमधून मागविलेल्या वस्तू लवकर मिळण्याबाबतीत योग्य नियोजन करून योग्य तो समन्वय राखला तर यामध्ये अडचणी येणार नाहीत असे वाटते,यामध्ये सुधारणा होण्यासाठी हॉस्पिटलचे मॅनेजमेन्ट नक्की पुढाकार घेईल यावर माझा विश्वास आहे.

(१२) हॉस्पिटलमधल्या रूममधील रुग्णांशी ऋणानुबंधाचे नाते प्रस्थापित झाले….

आपल्या रूममध्ये इतर दुसरा पेशंट कोण आहे त्यावर त्या रूममध्ये थांबायचे की दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट व्हायचे असा प्रश्न उपस्थित होतो,पण मला जी २२३ ऐवजी २१७ रूम दिलेली होती त्या रूममधील पंढरपूरच्या ७२ वर्षीय आजोबांच्या पत्नीही(आज्जीही)पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही याच हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले त्यामुळे आपोआपच आजोबांना आणि आज्जीना दोघांना एक स्वतंत्र रूम जी मला सुरुवातीला दिली होती ती रूम नंबर २२३ देण्यात आली.त्या दिवशी हॉस्पिटलमधला माझा पहिलाच दिवस होता,रात्री ११ वाजता मंगळवेढ्याचा एक पेशंट माझ्या रूममध्ये आणण्यात आला परंतू त्यांना कंबरेखालच्या भागात काहीच हालचाल करता येत नसल्याने त्यांना लगेचच अर्ध्या तासात आयसीयू मध्ये नेण्यात आले ती संपूर्ण रात्र,दुसरा पूर्ण दिवस या रूममध्ये एकट्यानेच घालवला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १ वाजता अक्कलकोट येथील किराणा दुकानदार श्री.काशिनाथ किवडे(काका)हे रूममध्ये दाखल झाले,त्यांच्याशी माझा त्याचवेळी संवाद झाला, कुठून आलात,काय त्रास होतोय असे मी त्यांना विचारले,त्यांनीही मला मी कुठून आलो,कधी ऍडमिट झालोय याची माहिती विचारली.पुढे मी आणि किवडे काका ५ ते ६ दिवस या रूममध्ये एकत्र राहिलो,एकमेकांना समजून घेणे,आधार देणे,एकमेकांचे डब्बे देणे इथपर्यंत आमची मैत्री वाढली,जिव्हाळा वाढला,कौटुंबिक आत्मीयता वाढीस लागली.मला त्यांच्या अगोदर सुट्टी होणार आहे म्हटल्यावर त्यांना थोडेसे वाईट वाटले,ते मला म्हणाले काय ओ सर तुम्ही गेल्यावर मला करमेल का?मी त्यांना म्हणालो तुम्ही काही काळजी करू नका मी घरून तुम्हाला दोन ते तीन वेळा फोन लावत जाईल तेव्हा त्यांना धीर आला.मला दिनांक १०/१२/२०२० रोजी हॉस्पिटलमधून सुट्टी झाली तेव्हा मला निरोप देताना त्यांचे डोळे पाणावले,माझ्याही डोळ्याच्या कडा आपोआपच ओल्या झाल्या.
मला ज्या दिवशी सुट्टी झाली त्या दिवसापासून मी घरून किवडे काकांना न चुकता फोन लावून त्यांच्या तबियेतेची विचारपूस करीत असे,त्यांनाही ते चांगले वाटत असे,त्यांना दिनांक १४/१२/२०२० रोजी सुट्टी झाली त्यांनी मला अतिशय आनंदित होऊन फोन केला,मी त्यांना म्हणालो काका घरी गेल्यास तबियेतेची काळजी घ्या,मलाही त्यांनी तेच सांगितले व अक्कलकोटला आल्यावर घरी येण्याचे आग्रही निमंत्रण दिले,मीही त्यांना सोलापूरात आल्यावर घरी येऊन जायचंच असा आग्रह केला.असे हॉस्पिटलमध्ये औपचारिक आणि अपघाताने झालेल्या ओळखीचे रूपांतर किवडे काका आणि माझ्यात ऋणानुबंधाचे नाते प्रस्थापित होण्यात झाले.

(१३) कोरोना विषाणूला कोणीच कॅज्युअली घेऊ नये :-

मला कोरोना होणार नाही या अविर्भावात कोणीही राहू नये,कोरोना माझ्या आसपासही येणार नाही असा फाझील आत्मविश्वासही कोणी बाळगू नये,कोरोना माझे काहीही करू शकत नाही अशी वलग्नाही कोणी करू नये असे माझे प्रामाणिक मत आहे.कोरोनाला कोणीही कॅज्युअली घेऊ नये नये.प्रत्येकाने एकमेकांत सुरक्षित अंतर ठेवून बोलावे,नियमित मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावेत,शासनाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करायला हवे,तरच आपण स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो.
जो या प्रसंगातून जातात त्यालाच याची जाणीव प्रकर्षाने होते,कठीण प्रसंगी आपल्या कुटुंबावर कोणते प्रसंग गुजरतात,त्यांना आपल्यामुळे कसा नाहक त्रास सहन करावा लागतो याची आठवण आली तरी अंगावर शहारे येतात.म्हणून कोरोनापासून वाचण्यासाठी स्वतःच स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.याविषयी मला माझी कविता आठवते,जिचा समावेश माझ्या ‘ कैवार ‘ कवितासंग्रहात केला आहे.

कोरोना या घातक व्हायरसने जगामध्ये भितीदायक वातावरण निर्माण केले आहे,जागतिक पातळीवर अनेक देशांनी राष्ट्रीय आपत्ती अथवा आणीबाणीची घोषणा केली आहे.कोरोना या व्हायरसचा प्रसार सर्वत्र झपाट्याने होत आहे,भारतातही केंद्रशासनाकडून व महाराष्ट्रात राज्यशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.सर्वांपर्यंत आवश्यक त्या सूचना पोहोचविल्या जात आहेत.आजपर्यंत आपण अनेक संकटे यशस्वीरित्या परतवून लावली आहेत. हेही संकट आपण सामूहिक प्रयत्नाने नक्कीच परतवून लावूया हा विश्वास सर्वांनी बाळगला पाहिजे.कोरोना या व्हायरस विषयीची मनातील भीती दूर करुन आवश्यक खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे.याच बाबीवर प्रकाश टाकणाऱ्या काही ओळी शब्दबद्ध करण्याचा छोटासा प्रयत्न मी केलेला आहे तो असा…..

” चला सर्वांनी एकजुटीने कोरोना व्हायरसशी लढू …..”

कोणत्याही अफवांना नका बळी पडू
भीती पसरवणारे संदेश नका फॉरवर्ड करू
आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडू
चला सर्वांनी एकजुटीने कोरोना व्हायरसशी लढू

स्वच्छतेची,आरोग्याची आपणच काळजी घेऊ
गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे हमखास टाळू
कोरोना व्हायरस संकटाचा सामना हिंमतीने करू
चला सर्वांनी एकजुटीने कोरोना व्हायरसशी लढू

शिंकताना,खोकलताना नाकातोंडावर रुमाल धरू
एकमेकांशी भेटल्यानंतर हातात हात देणे टाळू
दोन्ही हाताने नमस्कार करून भारतीय संस्कृती पाळू
चला सर्वांनी एकजुटीने कोरोना व्हायरसशी लढू

आरोग्यासंदर्भात प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करू
कोरोना व्हायरसबाबत समाजामध्ये जाणीवजागृती करू
पर्यटनस्थळी सहलीस जाण्याचे थोडे दिवस टाळू
चला सर्वांनी एकजुटीने कोरोना व्हायरसशी लढू

न घाबरता कोरोना व्हायरसचा सामना करू
भारतातून कोरोना व्हायरसला हद्दपार करू
सिनेमागृहात,मॉलला जाण्याचे जाणीवपूर्वक टाळू
चला सर्वांनी एकजुटीने कोरोना व्हायरसशी लढू “

(१४) आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे,आरोग्याची काळजी घ्यायला हवी :-

” माझे कुटुंब माझी जबाबदारी ” या शासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे प्रत्येकाने आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष दयायला हवे,वेळीच सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी असे माझे मत आहे.कारण आपल्यावर संपूर्ण कुटुंब अवलंबून असते याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.कुटुंबियांना दुःखाच्या खाईत ढकलणे योग्य होणार नाही यासाठी सुरक्षिततेची जबाबदारी स्वतःच स्वीकारून स्वतःच्या व कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेणे हीच आजची प्राथमिकता आहे असे माझे प्रांजळ मत आहे.

(१५) वाचनाचा आस्वाद घेतल्यामुळे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम पाहिल्यामुळे मनाला प्रसन्नता लाभली :-

हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना व नंतर घरी आल्यावर मी स्वतःला वाचनात गुंतवून घेतले,या काळात मी शब्दशिवार प्रकाशनचा दिवाळी अंक,अक्षरदान दिवाळी अंक,मित्रवर्य बबन शिंदे सरांची ” माणिक झाला राष्ट्रसंत ” ही कादंबरी,तर मित्रवर्य डॉ.घ.ना.पांचाळ सरांचे ” महापुरुषांचे वाचनवेड ” ही पुस्तके वाचून काढली.
तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम जे मनाला आल्हाददायकता देत होते ते कार्यक्रम पाहिले यामध्ये ” चला हवा येऊ द्या ” चे मागील भाग, ” इंडियन आयडॉल ” चे जुने एपिसोड,ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांची कीर्तने ऐकली.यामुळे मला कोरोनापासून मुक्त होण्यास मदत झाली.

म्हणून कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं, असं नव्हे ! तर आयुष्याकडे डोळसवृत्तीने पाहण्याची संधी उपलब्ध झाली असे मानावयास हरकत नाही.कारण सकारात्मक विचारसरणी,नियमित व्यायाम,प्राणायाम, संतुलित आहार, डॉक्टरांचा सल्ला,त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार,मन प्रसन्न ठेवणे,चांगल्या सवयीमध्ये स्वतःला गुंतवून ठेवणे या गोष्टी केल्या तर आपल्याला कोरोनावर सहज मात करता येते हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो.

चला तर मग भेटूयात…. लवकरच…… नव्या उमेदीसह……नव्या उत्साहासह………!!

डॉ.शिवाजी नारायणराव शिंदे
सहायक कुलसचिव (वर्ग १ अधिकारी)तथा
मराठी भाषा दक्षता अधिकारी,
नॅक,रुसा,आरजीएसटीसी विभाग,
पीएच.डी./संशोधन विभाग(अतिरिक्त कार्यभार),
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *