करोनाची वास्तविकता काय?-डॉ.दीपक र. पाटील

करोनाची वास्तविकता काय?

सोशल मीडियावर वर करोना विषयी अनेक गैरसमज पसरवले जात आहेत.आपणही सर्वजण त्याविषयी कुठलीही शहानिशा न करता त्या पोस्ट डोळे झाकून फॉरवर्ड करतोय, हे अत्यंत चुकीचे आहे.

करोनाची वास्तविकता काय?
करोनाची वास्तविकता काय?

मागच्याच आठवड्यात माझा मित्र त्याच्या आईला घेऊन OPD ला आला. नेहमीच्या विषयांवर बोलणे झाल्यावर व पेशंट बद्दल थोडे बोलणे झाल्यानंतर त्याच्या मनातील खदखद त्याने बाहेर काढली.त्याच्या म्हणण्यानुसार करोना हे एक थोतांड आहे एक वैश्विक राजकीय षड्यंत्र आहे, चीन आणि अमेरिका दोघांनी मिळून केलेले राजकारण आहे.अशा एक ना अनेक भ्रामक कल्पना त्याने बोलून दाखवल्या. अशाच काहीशा पोस्ट व्हाट्सअप वर व सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्या पोस्ट नुसार डॉक्टर आणि राजकारणी यांचे लगे बांधे आहेत ,काहीतरी लाख निधी एका रुग्णा मागे मिळतो, वगैरे वगैरे….असे अनेक गैरसमज पसरवले जात आहेत.

मित्रांनो हे जर खरे असेच राहिले असते तर अनेक डॉक्टरांचा करोना मुळे आतापर्यंत बळी गेला नसता. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ताज्या आलेल्या अहवालानुसार 106 डॉक्टरांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे तर सोळाशे पेक्षा जास्त डॉक्टर्स करोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनेक कोविड योद्धे डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस आतापर्यंत आपल्या देशभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. सर्वात महत्त्वाचे अनेक राजकारणी सुद्धा करोना पीडित आहेत .मुंबई-पुण्यातील अनेक नगरसेवकांचा या आजाराने बळी गेला आहे. हे जर थोतांड किंवा षडयंत्र असते तर नक्कीच असे काही घडलेच नसते.

कोणत्या देशाला आणि त्याच्या राष्ट्रप्रमुखाला वाटेल की आपला देश ठप्प व्हावा, देशाची प्रगती थांबावी, देशातील जनता कायम अनामिक भीती खाली रहावी? ????

हे खरे आहे की अमेरिका आणि युरोपीय देशांसारखे परिस्थिती आपल्याकडे नाही.80 ते 85 टक्के रुग्णांमध्ये आपल्या देशात टेस्ट पॉझिटिव आल्यावरही लक्षणे दिसून येत नाहीत किंवा अतिशय सौम्य लक्षणे दिसून येतात . काही रुग्ण आमच्या जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरच्या औषधोपचाराने देखील बरे झालेले असतीलच. परंतु जे तीन ते चार टक्के मृत्यू या आजाराने होत आहेत त्यांच्यामध्ये अतिशय गंभीर लक्षणे दिसून येत आहेत. विचार करा या तीन ते चार टक्के लोकांमध्ये आपण स्वतः किंवा आपले नातेवाईक मित्रमंडळी असतील तर? ? ? ? ? ? तरीही करोना हे एक थोतांड किंवा षड्यंत्रच राहील का? ? ?

मित्रांनो Covid-19 वार्डमध्ये काम करणाऱ्या आमच्या डॉक्टर मित्रांचे अनुभव जर ऐकलेत तर खूप वाईट वाटतं .शरीरातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे श्वास घेताना रुग्णांची होणारी तडफड, व्हेंटिलेटर असूनसुद्धा तडफडून होणारे रुग्णांचे मृत्यू प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्यावर त्यांना रात्र-रात्र झोप येत नाही.

त्यामुळे आपण सुज्ञ आहातच खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा, खोट्या बातम्या व्हायरल करण्यापेक्षा करोना विषयी जनजागृती करून,मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, फिजिकल डिस्टंसिंग पाळणे,यासारखे नियम आपल्याला अजून काही दिवस तरी पाळावे लागणार आहेत. कृपा करून सर्वांना विनंती आहे खोट्या माहितीला बळी पडू नका. आपल्या कुटुंबाची व आपली काळजी घ्या. चुकीच्या पोस्ट फॉरवर्ड करू नका कोणी असे करत असेल तर त्याला कृपा करून मज्जाव करा.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळे आपण या आजाराबाबत बेफिकीर आणि बेसावध होऊन स्वतःचे व आपल्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात घालतोय.

डॉ.दीपक र. पाटील फॅमिली फिजिशियन, भुषण कॉलनी,जळगाव.
डॉ.दीपक र. पाटील
फॅमिली फिजिशियन,
भुषण कॉलनी,जळगाव.

One thought on “करोनाची वास्तविकता काय?-डॉ.दीपक र. पाटील

  1. अगदी खरं आहे,समाजात गैरसमज पसरवणारे च जास्त असतात .नंतर स्वतःवर येत तेव्हा परत डॉक्टरांच्या नावाने बोभाटा मारतात अश्या वृत्तीच्या लोकांची एक जमातच असते समाजात.
    पण आपण खूपच छान माहिती दिली. धन्यवाद!!!!👌👌👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *