विष्णू पुराण – सौ.अंजली दीपक बर्वे

विष्णू पुराण –

काय मग विष्णू बुवा?एकदम खूष असाल ना? काही म्हणा,स्तुतीप्रियच तुम्ही?आम्हाला मात्र त्या संतांच्या मदतीने शिकवीत रहाता,” निंदा स्तुती माना समसमान”!पण मग सांगा ना,अधिक महिन्याची व्रतवैकल्य ,कथा,महात्म्य कशासाठी?मल मास म्हणे पुरुषोत्तम मास झाला!काय तर म्हणे लक्ष्मी प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तरं देणार,सकल कल्याणार्थ?मग भोळे भक्त मानतात त्याला आदर्श पुराणातल्या कथा!वेद,पुराण-अपौरुषेय!तुझी सगळी व्यवस्था कशी अगदी चोख!त्या अपौरुषेय वेदांचे अर्थ लावायला कुणाला वेळ होता?जो,तो पोटापाण्याच्या पाठी.मग तू व्यासांना या कामासाठी बसवलस.सर्व बाजूंनी आपल्या अस्तित्वाचे प्रयत्न चालू ठेवलेस.नरनारायण रुपात येत राहिलास.अर्जूनाला प्रश्न विचारायला भाग पाडून गीता ऐकवलीस!

  आता या कलीयुगात त्या गीतेचा अर्थही लावण्यात कमी पडतात की काय माणसं?,अशी शंका आल्यावर ज्ञानोबा माऊलींना पाठवलस.सातशे वर्षांनंतर आता ज्ञानेश्वरीचा अर्थ लावतानाही दमछाक होते आहे हे पाहिल्यावर लोकमान्य टिळक,विनोबाजी,समर्थ रामदास,स्वामी स्वरुपानंद…किती,किती अनुयायी तयार केलेस तू?ग्रेट!मानलं बुवा!खरच या राजकारणी लोकांनी तुझ्याकडूनच संघटन कौशल्य आणि भाटगिरीचे धडे गिरविले असतील.

    अरे किती भुलवशील?किती फसवशील?तू कुणालाच कसा आहेस ते कळत नाही म्हणे!वेदही नेति,नेति म्हणजे असाही नाही,तसाही नाही असं वर्णन करतात तुझं.

याच्यापुढची मेख अशी की जो तुला जाणतो त्याचा मी”पणा,अहं निघून जातो.त्यामुळे जाणणारा,जाणायचे असे काहीच शिल्लक रहात नाही.ज्ञान ,ज्ञाता,ज्ञेय ही त्रिपुटी सांडून जाते.मग रहाते काय?तर तेच ते परब्रह्म!अद्वैत!अगम्य आणि अतर्क्य!

    तशी हार मानायचीच नाही ठरवून दासबोध वाचायला घेतला.तर त्यात “देवशोधन” दशक पाहून “हरवले ते गवसले”वाटू लागतं.पण शेवटी ओम् फस्स!

  माया समजून घेतली की परब्रह्म कळतं.चौदा ब्रह्मे जाणून घ्या.ती नश्वर आहेत.जे जे दिसते,वाटते,भासते,निर्माण होते,जन्मते ते ते नष्ट होते.ही सर्व माया,खोटे भास!ठीक आहे.गणितात x मानतो तसं हे मानायला हरकत नाही उत्तर हवं असेल तर!पुढे?पुढे ?ब्रह्म?तुझं स्वरुप कसं आहे? तर म्हणे निराकार,निर्गुण,निश्चल,निर्मल,शाश्वत,सूक्ष्म ,सत्य,नित्य,अलक्ष,अभंग,अनादी,अनंत….

सगळे शब्द घासून,पुसून घेतले.त्यात तैलबुद्धी घातली,भक्तीची वात लावली.पण काजळी धरण्या पलीकडे काहिही प्रकाश पडला नाही.

  असो!तरी म्हटलं चिकाटी सोडायची नाही.पुढे,पाठी वाचत राहू.सृष्टीकथन वाचलं.गुरु शिष्याला सांगतात की,”मूर्ख लोक दगडाधातूच्या मूर्तीत देव पहातात,पुजतात”,शिष्य विचारतो,मग सगुण भजन कशाला करायचे?”तर म्हणाले,फार वाद घालू नको.सगुणाकडून निर्गुणाकडे जायचे मनात पक्के कर.”

     कप्पाळ! काय पक्के कर?तो काय साखरेचा पाक आहे का पक्का गोळीबंद करायला?ती साधी रेसिपीसुद्धा जमत नाही कीत्येकांना!

तू बोलण्यात ऐकणार थोडाच?तू म्हणशील की अहं सोड किंवा सर्व धर्म परित्यज्यं मामेकं शरणं व्रज।

अहं त्यागलेला बरा,हे पटतं.राग,लोभ,दुःखं त्यातूनच येतात. पण त्याचा त्याग केल्यावर तू प्राप्त होशील याची काय हमी?यती,सती,संत महात्मे,संन्यासी सगळ्यांना फसवतोस.इंद्रादी देवच नव्हे तर ज्याच्या खनपटीला बसून सृष्टी निर्माण केलीस त्या ब्रह्म्यालाही तू ठकवलस,तिथे मला किरकोळीत काढायला कितीसा वेळ?

तुला मिळविण्याच्या नादात जगण्यातला आनंदही घेणार नाही आणि तुलाही प्राप्त करुन काय ते परमानंद स्थितीत जाता येणार नाही,त्याचं काय?,बरं ती परमानंद स्थिती,शांती म्हणजे काय मिळेल त्याची झलक तरी दाखवशील?आमच्या जगात अननोन प्रॉडक्ट सुरुवातीला फ्री द्यायची पद्धत आहे.एकदा पसंत पडलं की माणूस महाग असलं तरी घेणारच!

    आता म्हणशील की,”कर्म करीत रहा,मा फलेषु कदाचन।”

तुझं एक मात्र आवडतं हं मला,तुझ्याकडे सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तरं असतात.निरुत्तर करणारी!

वस्त्रहरणाच्या प्रसंगावरुन द्रोपदीने तुला विचारलं,”सख्या,कान्हा,अरे हा प्रसंग दिलास?तूआधीच का नाही धावत आलास? तर तू म्हणालास की,” अगं मी द्वारकेत होतो सखी,तू बोलावल्यावर लगेच आलो.पण द्रौपदी,तू आधी का नाही हाक मारलीस?तू आधी स्वतःवर जास्त विश्वास ठेवलास.दोन्ही हातांनी पदर घट्ट धरलास,मग शक्ती कमी पडल्यावर तू तुझ्या बुद्दिवर विश्वास ठेवलास,द्रोणाचार्य,भीष्माचार्य,धृतराष्ट्र यांना प्रश्न विचारलेस.त्याचा उपयोग झाला नाही तेव्हा मला हाक मारलीस.हाक मारल्याबरोब्बर मी धावलोच.”

वा रे व्वा!अरे आम्ही माणसं बरी मग! बोलावण्याची वाट न बघता धावतो मदतीला,कुणाच्याही.

असो!तुला जाणण्याचा मी अथक प्रयत्न करणारच!पण दरवेळी तुझ्यावरचा विश्वास दृढ होण्याऐवजी डळमळीत न होऊदे,म्हणजे झालं!

अहंहं!आत्ताच्या करोना,वादळ ,पूर याबद्दल नाही बोलत मी.आमच्या पूर्वजांनीही ही संकटं झेलली.प्लेग आला,दुष्काळ आला आणि गेला.त्या कुंतीबाईंनी तुझ्याकडे दुःखच मागितलं ना?तुझं स्मरण रहायला?आणि तू अगदी आत्त्याबाईंच्या आज्ञेत रहाणारा!दुःखच दुःख देत राहिलास.आपल्या लाडक्या मैत्रीणीला ,द्रौपदीला सहा मुलं मेल्याचं दुःख दिलस!

छे,छे!तू नाहीसच रे जबाबदार!कर्मभोग ,प्राक्तन काय ते भोगावच लागतं ना!तुझी सर्व उत्तर पाठ आहेत मला.

पण एवढच विचारायचय तुला की ,तुझा नक्की  रोल काय आहे रे आमच्या जीवनात?कसा वागतोस नक्की  तू?भक्तांच्या संकटात धावून जातोस?अंबरीषासाठी दहा जन्म घेतोस?मी तुझ्या पाठीशी आहे “म्हणत आधार देतोस?योगक्षेम वहाम्यहम म्हणणारा तू खरा?सहस्रनामं म्हणायला लावणारा तू त्या नामातील सगुणरुपात आहेस की नाहीस?सगुणरुपात तुला पहाणारे आम्ही मूर्ख?मग ती वर्णनं कशासाठी?भागवतातली वर्णन?ध्यानश्लोक?

आणि एकेक गोंधळ! तुझं वर्णन,भगवान शंकरांचं वर्णन,अथर्वशीर्षातलं श्रीगणेशाचं वर्णन आणि तुझ्या शक्तीचं!देवीचं वर्णन सारखच की रे!तुम्ही सगळे एकच की वेगळे?की हाच अद्वैतवाद?गोलमाल आहे झालं!

बरं,मी काय म्हणते ऐक.तुला साधं शिक्षक होता येईल का?म्हणजे गुरुरुपात तू शिक्षकच आहेस.पणतसा नव्हे.प्राज्ञ पातळीच्या विद्यार्थ्यांचा स्पेशल कोचिंग क्लास घेणारा शिक्षक इथे उपयोगी नाही.आणि पाठांतरावर मार्क मिळवून देणाराही  नकोच.सगळी उदाहरणं,उपमा पाठ आहेत मला.स्वप्न,जागृती,सोनं आणि दागिने,तंतू आणि वस्त्र,समुद्र आणि लाटा,कासवी आणि पिल्लं,अवकाशाची व्याप्ती,कोळी आणि कोळीष्टक…निव्वळ शब्दब्रह्म!पण यातून तुला कसा शोधायचा रे?म्हणून म्हणते आमच्यासारख्या सामान्यांसाठी तू शिकवू शकशील का?म्हणजे अ” तुकडीला शिकविणे सोप्पे पण “फ” तुकडीला शिकविता आलं पाहिजे.बघ,प्रयत्न करुन!

तू माझा नाद सोडलास तरी मी नाही तुझा नाद सोडणार!हा नाद खुळा!वंशपरंपरा म्हण,संस्कार म्हण किंवा थोरामोठ्यांवरचा विश्वास म्हण,हवं तर मनाचा दुबळेपणा म्हण,पण मला तुझ्याशिवाय या जगाचा आणि जीवनाचा विचारच नाही करता येणार!तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना हेच खरं रे बाबा!

   आता नवरात्रात तुझ्या शक्तीची पूजा करणार,दिवाळीत तुझं तुळशीशी लग्न लावणार,मार्गशीर्ष,माघी गणेश,रामनवमी,हनुमान जयंती,श्रावणातली व्रतंवैकल्य आणि भाद्रपदमासातला भोळा तू!सगळ्या सणावारात तुला शोधणारच!तुला खूश करायला धडपडणारच!दार ठोठावीत रहाणार,कधीतरी उघडशीलच! ( विष्णू पुराण )

विष्णू पुराण - सौ.अंजली दीपक बर्वे
विष्णू पुराण – सौ.अंजली दीपक बर्वे चिपळूण

 

 

One thought on “विष्णू पुराण – सौ.अंजली दीपक बर्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *