आपण आणि ते- १ -शुभांगी थोरात

आपण आणि ते ….

     मध्यंतरी एका जुन्या मित्राचा फोन आला. आमचं बोलणं होत असतांना त्याच्या पत्नीची चौकशी केली, तिला जरा बरं नव्हतं म्हणून बोलले तिच्याशी. मी कोण हे कळल्यावर तिचा मधूनच प्रश्न, “तुझ्याकडे काय स्वैपाकाला बाई असेल ना, आम्हाला काय कितीही दुखलंखुपलं तरी करावं लागतं गं.”गृहिणी असलेल्या बायकांचा नोकरी करणाऱ्या बायकांविषयी हाच समज असतो अगदी की यांना काय सगळ्या कामांसाठी नोकरचाकर असतील, ऐटीत कामावर जायचं, घरी आयतं जेवायचं, शिवाय पैसे कमवीत असल्याने नवरेही मान देणार यांनाच, आम्हाला कोण विचारतो. आपल्याकडे घरी रहाणाऱ्या बायकांच्या श्रमांना खरंच काही किंमत नसते आणि त्यांना फार कष्ट करावे लागतात ही फार खेदाची गोष्ट आहे, पण नोकरी करणाऱ्या बायका या सगळ्यातून सुटतात हा समजही खरा आहे का?

     खरं तर नोकरी करणाऱ्या बायका एक गंड मनात बाळगून असतात. आपलं घराकडे, विशेषतः मुलांकडे दुर्लक्ष होतं असा आरोप केला जाऊ नये यासाठी तर फारच सावध असतात. त्यामुळे त्या घरातला स्वैंपाक (काहीजणी तर नुसताच स्वैंपाक नाही तर साग्रसंगीत स्वैंपाक), मुलांचा अभ्यास, घरातल्या सासूसासऱ्यांच्या जबाबदाऱ्या, बाहेरची कामं हे सगळंच सांभाळू पहातात. ओढाताण व्हायला लागली की तडजोड म्हणून पोळ्यांना बाई ठेवणं, मग हळूहळू भाजी चिरणं, पीठ मळणं, मसाला वाटून ठेवणं अशा सगळ्या वरकामाला बाई ठेवणं असं सुरु होतं. आजकाल धुणंभांड्याला घरकामगारांची मदत तर गृहिणीही घेतात. त्याही दिवसभर कामात असल्या तरी नोकरी करणाऱ्या बायकांचं दुःख समजून घेत नाहीत. वर घरातले पुरुष नोकरी करणाऱ्या बायका कशा ‘टाइमपास करायला’ नोकरी करतात, कशा गप्पा मारतात इ. मिथ्यकथा पसरवीत असल्याने त्यांचाही हा समज होणं स्वाभाविक आहे. आणखी एक भयानक समज एका कोळणीकडून ऐकला, “तुना सायबाम्होरं XXX पडाया जायाचं..” बायकांना डोकं नसतं. त्यामुळे त्या नोकरी करतात, मोठी पदं मिळवतात, मोठा पगार खातात हे सगळं त्या साहेबाची नको ती चाकरी करुनच मिळवतात हा एक घृणास्पद समज त्या शेऱ्यामागे होता. लोकलमधल्या कोळणी, भाजीवाल्या इत्यादी कष्टकरी बायकांचा हा नेहमीचा सूर असतो. सुदैवाने कोरोनाकाळात बऱ्याच बायकांना घरून काम करायला लागल्यावर घरच्यांच्या आणि इतरांच्या ध्यानी यायला लागलंय त्यांना किती काम पडतं ते. नाहीतर याच गैरसमजात राहिले असते. उलटपक्षी नोकरी करणाऱ्या बायकांचेही घरी रहाणाऱ्या बायकांविषयी गैरसमज असतात. यांना काही आपल्यासारखं ताणतणावांना तोंड द्यावं लागत नाही. सकाळी गडबड उरकली, नवरामुलं आपापल्या कामाला गेली की या टीव्ही पहायला, झोपायला, चकाट्या पिटायला मोकळ्या असं नोकरी करणाऱ्या बायकांना वाटतं. खरं तर घरात रहाणाऱ्या बायकांच्या कामाला अंत नसतो, घरातले सगळेच त्यांच्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा बाळगत त्यांना राबवून घेतात खरे, पण त्यांना आदर वाटतो तो मात्र नोकरी करणाऱ्या ‘स्मार्ट’ बायकांचा. किंबहुना नोकरी करणाऱ्या बायका या स्मार्ट आणि घरी रहाणाऱ्या बावळट असाच समज असतो. त्यातून मग कमावणाऱ्या बायका आणि घरी रहाणाऱ्या बायका असं एक द्वंद्व उभं रहातं. (आपण आणि ते)

     असंच एक द्वंद्व उभं केलं जातं ते म्हणजे शहरी, शिकलेल्या बायका आणि ग्रामीण स्त्री यांच्यामध्ये. मध्यंतरी एका सुप्रसिद्ध कार्यकर्त्या, प्राध्यापकांनी त्यांच्या एका लेखात एका वृद्ध ग्रामीण स्त्रीचं चित्र रेखाटल्यावर शेवटच्या परिच्छेदात काही गरज नसतांना “पण मुक्तीवाल्या बायकांना त्याचं काय” असा शेरा मारला. वास्तविक पहाता स्त्री मुक्तीचा लढा देणाऱ्या शहरी संघटना असोत की ग्रामीण भागातल्या संघटना असोत त्या शहरी, ग्रामीण, आदीवासी सर्वच स्त्रियांनी आपल्या पायावर उभं राहून सन्मानाने स्वतंत्र आयुष्य जगावं, त्यांना न्याय मिळावा यासाठीच लढत असतात. पण बरेचदा कारण नसतांना असं द्वंद्व उभं केलं जातं. सामाजिक माध्यमांवर तर आजकाल जुन्या परंपरांचं आणि त्यातल्या स्त्रियांच्या कष्टांचं उदात्तीकरण करण्याची स्पर्धाच लागलेली असते. एका मित्राने आपल्या आईने केलेल्या गोधडीचं छायाचित्र टाकलं होतं. तर दुसऱ्या मित्राने त्यावर म्हटलं या शिकलेल्या बायांना सांगा बरं अशी गोधडी शिवून दाखवायला. आणखी एके ठिकाणी एका शेतकरी कवियित्रीने शेतातल्या खुडलेल्या भुईमूगाविषयी लिहिल्यावरही अगदी वरच्याप्रमाणे शेरा आलाच. या शहरातल्या बायांना सांगा करायला असा. खरं तर शहरातल्या कित्येक सुशिक्षित बायका शिवणटीपण हौसेने करतात, त्यात नवेनवे प्रयोग करतात. मला आठवतंय माझ्या भाच्याचा जन्म झाला तेव्हा आम्ही बहिणींनी तऱ्हेतऱ्हेच्या गोधड्या शिवल्या होत्या. आता कदाचित ती पद्धत अस्तित्वात आहे की नाही माहीत नाही, पण आमच्या पिढीतही असं चाले की कोकणातलं एकादं कुटुंब शहरात असेल तर गावची शेती सांभाळायला आलटून पालटून एक एक भाऊ जात असे, सोबत त्याची शहरातली बायकोही नवऱ्याला आणि गडीमाणसांना करुन घालायला जात असे. शिकलेल्या बायांचीही गावी गेल्या तर विहिरीतून पाणी काढणं, चुलीवर स्वैंपाक करणं, शेतीची कामं करणं यातून सुटका नसे. (आपण आणि ते)

     आता खरं तर परिस्थितीत खूप बदल होताहेत. पूर्वी मी गावी गेले की माझं सलवार कमीझमध्ये वावरणं, नवऱ्याला अरेतुरे करणं, त्याच्या बरोबरीने चालणं याला नावं ठेवणाऱ्या बायका आता स्वतः सुटसुटीत कपड्यांत नवऱ्याला खेटून फटफटीवर बसून जातांना पहाते तेव्हा छान वाटतं. आता बायकांना विविध माध्यमांतून जग समजायला लागलंय. ग्रामीण स्त्रीही आता स्वावलंबी होऊ लागलीय. इतकंच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी बायका ग्रामपंचायत, जिल्हा परिषद इथे महत्त्वाची पदं भूषवताहेत. तंत्रज्ञान साक्षर होताहेत. त्याही शहरी, सुशिक्षित बायकांच्या बरोबरीने समाजात समर्थपणे आपली जबाबदारी पार पाडताहेत. आता खरं तर त्यांना सुशिक्षित, नोकरीपेशा बायकांची दुःखं कळायला हरकत नाही. खरं तर आपणदुसऱ्याच्या जागी उभं राहून त्या व्यक्तीची दुःखं समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. आपण आपल्या मनाने एखाद्या व्यक्तींसंबंधी, एखाद्या विशिष्ट समाजाविषयी, समाजातल्या एखाद्या विशिष्ट घटकाविषयी ऐकीव माहितीवर विसंबून आपली मतं बनवत रहातो. शतकानुशतके, पिढ्या न् पिढ्या काही समज झिरपत आलेले असतात. आपल्या आजूबाजूचं सगळं वातावरण, त्यातले वेगवेगळे घटक या समजांना खतपाणी घालीत असतात. मग अशा ठाम समजातून सुटका व्हायला वेळ लागतो. बायका खरं तर समजून घेणाऱ्या असतात, पण वर म्हटलं तसे  पुरुषी मानसिकतेने आणि पितृसत्ताक व्यवस्थेने त्यांच्यासाठी उभे केलेले सापळे त्या ओळखत नाहीत तोवर बायकाबायकांमधली ही ‘आपण’ आणि ‘त्या’ ही द्वंद्व मिटणार नाहीत.

 

आपण आणि ते
शुभांगी थोरात

5 thoughts on “आपण आणि ते- १ -शुभांगी थोरात

  1. स्त्रिया स्रियांमध्येच भेद करतात हे वास्तववादी चित्रण आहे . ग्रामीण, शहरी, सुसंस्कृत, असंस्कृत, कमावती, गृहीणी अशा सर्व स्तरातील बायका आपापल्या जागी वेगवेगळ्या तऱ्हेचं कष्टप्रद जीवन जगतात . त्यात त्याग ,सेवा, समर्पण शीलताही दिसते .
    उत्तम लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *