आजची युवा पिढी काय विचार करते ?

आजचा चर्चाविषय :    “जात “

(आजची पिढी बेफिकीर आहे, वर्तमानाचे भान नसलेली आहे, समाज-संस्कृतीविषयी या पिढीला देणेघेणे नाही, वाचन आणि विचार याविषयी आस्था नाही, असे नेहमी बोलले जाते. मात्र याला अपवाद ठरावेत असे अनेक युवकयुवती आपल्या आसपास वावरत आहेत. अशांपैकीच हे काही. आजची पिढी समाजातील विविध गोष्टींकडे कशी पाहते आहे, काय विचार करते आहे, हे या चर्चेतून पाहता येईल असे वाटते.)

आजची युवा पिढी काय विचार करते ?

१.

देव, धर्म, जात ही सामान्यजनांची दिशाभूल करुन शोषण करण्यासाठी अनेक वर्षांपासून वापरण्यात आलेली प्रभावी हत्यारे आहेत. धर्म स्वतः चे हितसंबंध जपण्याकरीता, वाढविण्याकरीता माणसाची विचार करण्याची शक्ती नष्ट करून, भयाची पेरणी करतो. आणि या सगळ्याल्या एका गुढ तत्वज्ञानाचा आधार देतो, त्यामुळे धर्म माणसांची मुलभूत गरज किंवा जीवन-मरणाचा प्रश्न आहे, असा भास होतो.

कोणत्याही अंधश्रद्धेचा पाया हा अज्ञान आणि भीती हाच असतो. धर्माचाही हाच पाया आहे. त्यामुळे धर्म ही एक अंधश्रद्धाच आहे, जात हे धर्माचेच अपत्य असल्याने ती सुद्धा अंधश्रद्धाच आहे. हिंदू जाती व्यवस्थेला मनुस्मृतिचा आधार आहे. या ‘मनुस्मृति’ नामक  धर्मग्रन्थात कोणी कोणावर किती अत्याचार करावे, किती शोषण करावे, कोणी मुकाट्याने सहन करावे याचे समर्थन आहे.

 ‘ढोल, गवार, शुद्र, पशु, नारी सकल ताडन के अधिकारी’ असे रामचरित मानसात म्हटले आहे. माणसाला तुच्छ लेखणार्‍या या प्रथांचे उघडपणे सर्मथन केलेले आहे ते आतोनात क्रुर आहे. मध्य युगात कबीर, तुकाराम यांसारख्या संतानी माणसांतील उच्च निचभाव कमी व्हावा यासाठी  काम केले. स्वातंत्रपुर्व -उत्तर काळात अनेक सुधारकांनी धर्माचा-जातीचा पगडा कमी व्हावा म्हणून कष्ट सोसले. तरी आजही समाजाचे जाती धर्माचे व्यसन सुटलेले नाही. हल्ली भारतात जातीभेदा विरोधी अनेकजण   बोलतात मात्र जातीभेद काही कमी होताना दिसत नाही. आपल्या देशात भ्रष्टाचाराविषयीही असेच आहे. त्यामुळे आपण जातीभेदा विषयी पण प्रत्यक्षात तसे वागतो आहोत का? हा सवाल स्वतःला विचारणे गरजेचे आहे. जातीभेदाच्या परिणामाविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहीतात,” समाज ही नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीत प्रवास करणाऱ्या उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा, किंवा त्यांची त्रेधा कशी उडते ही गंमत पाण्यासाठी म्हणा, किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा, जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान करण्यार्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकुल शंका नाही. म्हणूनच स्वहित-साधुनी इतरांचे नुकसान करुन आपले हित करायचे पढतमुर्खाचे लक्षण शिकू नये”.

सारांश: रक्ता-रक्तातील कोसळोत भींती माणसाचे अंती एक गोत्र.

सौरभ bagadesaurabh14@gmail.com २.
सौरभ
bagadesaurabh14@gmail.com

आजची युवा पिढी काय विचार करते ?

२.

       नुकताच अनाहिता मुखर्जी यांनी लिहिलेला ‘द वायर’मधला ‘सिलिकॉन व्हॅलीतील जातिभेद’ हा लेख वाचला. जातीभेद ही भारताची कमजोरी आहे हे सर्वांना माहीत असताना, अमेरिकेत राहणा-या सुशिक्षीत वर्गाने तो अमेरिकेतही पुढे आणावा? मला फार आश्चर्य वाटलं की जातीभेदाने अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनादेखील सोडले नाही. जातीवरून बोलणे, कमी लेखणे यासंबंधीच्या अनेक घटनांचा उल्लेख लेखात आहे. हा लेख वाचून माझी जातिभेदाबद्दल अस्वस्थता वाढली.

आधुनिक काळात अमेरिकेत ही स्थिती तर भारताबद्दल काय बोलावे. India untouched नावाची जवळपास दोन तासाची एक डॉक्युमेंट्री फिल्म युट्युब वर उपलब्ध आहे.  एकविसाव्या शतकात जगतानाही माणूस किती अंधश्रद्धा पाळतोय आणि त्यावरून जातिभेद करतोय हे यातून लक्षात येईल. असे मुळीच नव्हे की लहान गावे, खेडी यामध्ये असमानता दिसून येते, पण ‘जे एन यु’ सारख्या ठिकाणीदेखील अनेक विद्यार्थ्यांना जातीभेदाला सामोरे जावे लागते आहे. बहुजनांना शिक्षणाचा “अधिकार” च नाही असे एक पुजारी या फिल्ममध्ये म्हणताना दिसतो. मग जर आपण वैदिक नियम वापरणार असू तर आपल्याला संविधानाची काय गरज? ही सर्व मते पाहिल्यावर, वाचल्यावर काहीतरी केलं पाहिजे असं मनात आलं.

पण घरात बसून काहीतरी केलं पाहिजे असा विचार करणे आणि तो प्रत्यक्षात इतक्या मोठ्या आणि बंदिस्त विचार करणाऱ्या समूहासमोर ते मांडणे, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी याच संदर्भातला एक अनुभव आज तुमच्या पुढे मांडणार आहे.

दहावीत चांगले गुण मिळाले म्हणून मला संघाच्या सत्काराला बोलावले होते. माझ्या बाबांनी हा निर्णय माझ्यावर सोपवला, की एका ज्ञातीच्या सत्काराला जावे का? पण काही नातेाइकांनी ये म्हटल्यावर, मी कार्यक्रमात सहभागी झाले. मला तिथे स्टेज वर बोलायचे होते. त्याच्या तयारीसाठी पुन्हा बाबांची मदत घेतली! त्यात मी लिहिलेल्या भाषणात त्यांनी एक वाक्य वाढवलं,

“माझे बाबा जात मानत नाहीत, तरीसुद्धा या कार्यक्रमाला त्यांनी मला कसे पाठवले याचे आश्चर्य वाटते”

खरतर हे बोलणं सोपं होतं! ना हे माझं मत होतं, ना मी ज्ञातीच्या विरोधात होते. पण नाही बोलू शकले! अक्षरशः मी ते वाक्य गाळून टाकलं.

आणि तेव्हा लक्षात आलं, की जात या विरोधात लढा देणाऱ्याकडे अमाप धैर्य असावं लागतं. अगदी तसंच जे अमेरिकेतल्या जातीभेदाला सामोरे जाणाऱ्या भारतीयांमध्ये आहे.  या प्रश्नांबद्दल तुम्हाला काय वाटते, आपण जातीभेदाच्या विरोधात काय काय करू शकतो? यावर चर्चा करायला नक्कीच आवडेल. तुमच्या प्रतिक्रिया मला email मार्फत नक्की कळवा.

जिऊ निमकर nimkarjioo2001@gmail.com
जिऊ 
nimkarjioo2001@gmail.com

३.

जात म्हटलं ना की माझ्या मनात पहिल्यांदा एकच प्रसंग येतो, तो म्हणजे माझ्या शाळेतला. शाळेत  आठवी नववीत असताना मला काही पोरं अगदी काही दिवसांसाठी ‘बाटग्या ब्राह्मण’ म्हणायला लागलेली, का ?तर मी अंड खाल्लेलं म्हणून. या शिवाय जाती संदर्भात दूसरा कोणताही प्रसंग मला प्रामुखाने आठवत नाही. वर्गातल्या एका ब्राह्मण मुलाला वर्षभर पोरं ‘भट’ म्हणायची. पण यात कुठेही गममती शिवाय दुसरी भावना डोकावत नव्हती, आम्ही लहान असल्यामुळे असेल कदाचित पण त्यामुळे या गोष्टीच तेवढं वाईट आम्हाला वाटलं नाही. दुसरी एक गोष्ट म्हणजे वर्गातले जवळ जवळ सगळेच महणायचे की , “ आम्ही मराठे आहोत “ , का? तर मराठे म्हणजे काहीतरी शौर्‍याचं आहे असंचं आम्हाला सर्वांना वाटायचं, ती एक जात आहे बाबा आणि ती जन्मापासूनच असावी लागते याची आम्हाला थोडी पण जाणीव नव्हती.

वयाच्या पंधराव्या वर्षी चालणार्‍या या गोष्टींना अज्ञान म्हणावं की ‘स’ज्ञान. आठवी नववीत पण जाती बद्दल असणार हे अज्ञान चांगलं म्हणावं की वाईट हा वेगवेगळ्या दृष्टीकोनांचा विषय आहे. पण मला तरी ते आज बरोबरच वाटतं.

आमच्या या वयोगटामध्ये धर्मावरून चर्चा, भांडण होतील; पण जाती वरची चर्चा होण्याची शक्यता ही कमीच असते.

जातीबद्दल पहिल्यांदा डोक्यात आलं admission च्या वेळी. आणि काही लोकांच्या मनात तर त्याचा राग कायम असतो. आम्हाला पडलेले चांगले मार्क आणि न मिळालेली admission आणि काही जणांना कमी मार्क मिळालेले असूनही मिळालेली admission  यावर हमखास चर्चा व्हायच्याच. माझ्या बाबतीत त्या प्रश्नांचं स्वरूप बदललं पण काही जणांच्या बाबतीत अजूनही तसंच आहे. दोन वर्षापूर्वीच्या admission चा राग अजूनही काहींच्या मनात आहे. तो जाणार नाही असं नाही पण तो लक्षपूर्वक घालवाला पाहिजे. त्याकडे पुरेसं लक्ष दिलं पाहिजे. आम्ही, ज्यांच्या मनातून हा प्रश्न सुटलाय, त्यांच्या पालकांनी, सगळ्यांनीच…… कारण या प्रकारच्या छोट्या छोट्या घटनाच मोठा द्वेष जन्माला घालतात. जेव्हा आमच्यासारखी मुलं reservation असणार्‍या जातीच्या मुलांच्या लहानश्या घरात जातील, जेव्हा आम्ही त्यांच्या तोंडून त्यांचा संघर्ष, त्यांची लढाई ऐकू, जेव्हा आम्ही त्यांचे आई बाबा करत असलेलं काम पाहू तेव्हा हा राग नक्कीच जाईल. राग किंवा द्वेष स्वतःहून संण्याच्या प्रतिक्षेत न राहता तो घालवायच्या कामात पडू तर चांगलच , नाही का !

 

सृजन srujanhw@gmail.com
सृजन
srujanhw@gmail.com

 

(यातली मतं पूर्णपणे वैयक्तिक आहेत. तुम्हाला जर पटली तर आनंदच आहे आणि नाही पटली तर तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागतचं आहे.  प्रतिक्रिया तुम्ही लेखकाच्या mail-id वर  पाठवू शकता. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया महत्वाच्याच आहेत, त्यांची वाट बघतोय. तुम्हाला काही विषय सुचत असतील तुम्ही ते आम्हाला सुचवू शकता आणि तुम्हाला लिखाणाची आवड असेल तर आमच्या या टिम मध्ये पण तुम्ही सहभागी होऊ शकता )

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *